गणेशोत्सव हा कोकणवासीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण. नोकरीनिमित्त मुंबई, पुणे, नागपूर व जगाच्या कानाकोपऱ्यात गेलेला कोकणी माणूस गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मूळगावची वाट धरतो. मुंबई महानगरात कोकणवासीय बहुसंख्येने राहत असून, गणेशोत्सव काळात मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. कोकणातील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतील कोकणवासीयांची रेल्वे तिकीट काढण्यासाठी लगबग सुरू असते. रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण सकाळी ८ ला सुरू होत असले तरी, तिकीट खिडकीवर रात्रीपासून रांगा लावून आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असतो. मात्र, आरक्षण सुरू झाल्यानंतर अवघ्या एका मिनिटात प्रतीक्षा यादी ५०० पार जाते. तर, काही मिनिटांत प्रतीक्षा यादीची मर्यादा संपल्याचे संदेश प्रवाशांना येतात. गणेशोत्सव, शिमगा या कालावधीतील गाड्यांचे आरक्षण चर्चेत येत असले तरी पावसाळ्याचे दोन – तीन महिने वगळल्यास कोकणात जाणाऱ्या गाड्या या भरलेल्या असतात. अवघ्या काही सेकंदात तिकिटांची प्रतीक्षा यादीची क्षमता संपणे यामागे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची शंका व्यक्त केली जाते. त्यात खरेच तथ्य आहे की, आणखी काही कारणे आहेत. तसेच प्रवाशांच्या मागणीनुसार कोकण रेल्वे मार्गावरून जादा रेल्वेगाड्या का चालवल्या जात नाहीत, याबाबत जाणून घेऊया…
कोकणवासी नोकरदार मुंबईत वाढले?
नोकरी, व्यवसायानिमित्त कोकणातील अनेक तरुण मुंबई महानगरात येत आहेत. काही दशकांपूर्वी कोकणातील कुटुंबातील एक-दोन जण शहरांत असायचे. आता गावातील ८० टक्के नागरिक शहरात आलेत. यामागे कोकणातील सामाजिक परिस्थिती कारणीभूत आहे. तसेच मुंबईस्थित कोकणवासीय गणपती, शिमग्याला गावी जातात. त्या कालावधीत तिकिटे मिळवणे बहुतेकांसाठी जिकिरीचे ठरते. या काळात गर्दीचा फुगवटा वाढल्याने मागणी-पुरवठ्यात तफावत होऊन तिकिटे लगेच संपतात. वर्षभर इतकी मागणी नसली तरी कोकण पट्ट्यातील राज्यातील जिल्हे, पुढे गोवा, केरळमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी गाड्यांना कायम असते.
हेही वाचा >>>‘कॅन्सर’ हे नाव आलं कुठून? प्राचीन काळात कर्करोगावर कोणते उपचार केले जायचे?
गणेशोत्सवातील रेल्वे तिकिटे मे महिन्यात?
यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. साधारण गणेश चतुर्थीच्या तीन दिवस आधीपासून कोकणातील मूळगावी जाण्याचे कोकणवासीयांचे नियोजन असते. मात्र, सप्टेंबर महिन्यातील रेल्वे तिकिटे मे महिन्यातच कशी काढली जातात, असा प्रश्न अनेकांना पडतो. भारतीय रेल्वेच्या नियमित गाड्यांचे तिकीट आरक्षण रेल्वे सुटण्याच्या १२० दिवसापासून सुरू होते. त्यामुळे १ सप्टेंबर रोजी मुंबईवरून कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाडीचे तिकीट ४ मेपासून काढण्यास सुरुवात झाली. तर, गणेश चतुर्थीच्या तीन दिवस आधीचे म्हणजे ४ सप्टेंबर रोजीचे तिकीट काढण्यासाठी कोकणवासीयांची प्रचंड लगबग सुरू झाली. मात्र ४ सप्टेंबरचे आरक्षण ७ मे रोजी सकाळी ८ वाजता सुरू झाल्यानंतर ६३ सेकंदांत कोकणकन्या एक्सप्रेसची प्रतीक्षा यादी ५८० च्या पुढे गेली. त्यानंतर इतर कोकणात जाणाऱ्या एक्स्प्रेसची तिकिटे काढण्यास गेल्यास ‘रिग्रेट’ म्हणजेच प्रतीक्षा यादीतही जागा नसल्याचा संदेश मिळतो.
कोकण रेल्वेवर गाड्यांची नेमकी संख्या किती?
कोकण रेल्वेचा विस्तार हा रोहा ते ठोकूर एकूण ७४० किमीपर्यंत पसरलेला आहे. उत्तरेकडून विविध विभागांतून आलेल्या रेल्वेगाड्यांना दक्षिणेत कोकण रेल्वे मार्गावरून जावे लागते. त्याशिवाय कोकण रेल्वेच्या आठवड्याला ४३ ते ४५ नियमित रेल्वेगाड्या सुटतात. प्रत्येक गाडीतून साधारणपणे ३,५०० ते ४,००० प्रवाशांचा प्रवास होतो. उन्हाळा, सुट्टीच्या हंगामात दररोज १ किंवा २ विशेष रेल्वेगाड्या धावतात. तसेच गणेशोत्सव काळात दररोज ६ ते ११ विशेष रेल्वेगाड्या धावतात. यावेळी प्रत्येक विशेष रेल्वेगाडीमधील प्रवाशांची संख्या ४ ते ५ हजारांवर जाते.
हेही वाचा >>>‘या’ राज्यातील मंदिराच्या प्रसादात ऑलिंडरच्या फुलांवर बंदी; नेमके कारण काय?
तिकिटांचा काळाबाजार होतो का?
रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची अनेक प्रकरणे उजेडात आली आहेत. रेल्वे प्रशासनाच्या संबंधित विभागाने तिकीट आरक्षणात गैरप्रकार करणाऱ्यांना पकडले आहे. कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्येही असाच प्रकार घडण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवाची तिकिटे काढताना कोकणकन्या एक्सप्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या दीड मिनिटांतच एक हजारांपार गेली होती. त्यानंतर तिकीट आरक्षणात गैरप्रकार झाल्याची शंका प्रवाशांकडून व्यक्त केली होती. तपासअंती यात अनेक तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड झाले होते. तसेच तिकिटांची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असे गणित बिघडत असल्याने प्रतीक्षा यादीची मर्यादा संपत असते.