How To Find My Stolen Mobile Offline: सॅमसंगने अलीकडेच स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी तीन भन्नाट फीचर्स लाँच केले आहेत. यातील सर्वात प्रभावशाली वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही तुमचा हरवलेला, चोरीला गेलेला स्मार्टफोन आता अवघ्या काही मिनिटात शोधू शकता. इतकेच नव्हे तर फोन हातात नसतानाही आपण तो अनलॉक करून त्यातील उपलब्ध डेटा बॅकअप व रिस्टोर करू शकता. बहुतांश वेळा जेव्हा फोन चोरी होतो किंवा हरवतो तेव्हा सिमकार्ड काढून टाकले जाते किंवा एअरप्लेन मोडवर टाकल्याने फोन इंटरनेटशी जोडलेला नसतो मात्र अशावेळी सॅमसंगचे हे ऑफलाईन फीचर तुम्हाला कामी येऊ शकते. नेमकं हे फीचर आपण कसे वापरू शकता याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
सॅमसंगचे Find My Mobile- Offline फीचर कसे वापराल?
सॅमसंगने २०२० मध्ये फाईंड माय मोबाईल (माझा मोबाईल शोधा) हे फीचर ऑफलाईन वैशिष्ट्यासह उपलब्ध केले होते. आपण गॅलॅक्सी स्मार्टफोनमध्ये हे फीचर वापरू शकता. वर नमूद केल्याप्रमाणे जेव्हा आपण मोबाईल मध्ये फाईंड माय मोबाईल ऑफलाईन फीचर सुरु करता तेव्हा आपण प्रत्यक्ष फोन हातात नसतानाही ट्रॅक करू शकता.
जेव्हा आपण फोनमध्ये हे ऑफलाईन फाइंडिंग फीचर सुरु कराल तेव्हा आपल्याला थेट फाईंड माय मोबाईलच्या वेबसाईटवर नेण्यात येईल. इथे तुम्ही तुमचे सॅमसंग अकाउंट डिटेल्स देऊन लॉग इन करायचे आहे.
सॅमसंगचे Find My Mobile- Offline फीचर कसे काम करते?
सॅमसंगने दिलेल्या माहितीनुसार, तुमचा फोन चोरी झाला असेल किंवा हरवला असेल तरी जोपर्यंत स्विच ऑफ केला जात नाही तोपर्यंत तुम्ही त्याला सहज ट्रॅक करू शकता. इंटरनेट नसतानाही गॅलक्सी नेटवर्कच्या मदतीने अन्य डिव्हाईसच्या माध्यमातून तुमचा हरवलेला स्मार्टफोन शोधता येतो. हे अन्य डिव्हाईस एका कॉमन प्रणालीच्या माध्यमातून सॅमसंगच्या सर्व्हरला हरवलेला फोन कोणत्या भागात आहे हे सांगतात. एकदा का तुमच्या फोनशी सिग्नल जोडणी पूर्ण झाली की सर्व्हर तुम्हाला फोनचे ठिकाण कळवते.
स्मार्टफोनमध्ये Offline Finding- Find My Mobile कसे सुरु कराल?
१) गॅलॅक्सी डिव्हाईसवर ऑफलाईन फाइंडिंग सुरु करण्यासाठी सेटिंग्स मध्ये जा
२) इथे बायोमेट्रिक & सिक्युरिटी पर्यायावर क्लिक करा
३) Find My Mobile वर क्लिक करा
४) फीचर सुरु करा.
इथे तुम्हाला तुमच्या सॅमसंग अकाउंमध्ये लॉगइन करायला सांगितले जाईल. लॉग इन होताच पुन्हा फाईंड माय मोबाईल या पेजवर जा व इथे ऑफलाईन फाइंडिंग फीचर सुरु करा.