अलीकडेच बिकानेर जिल्ह्यातील कोलायत भागात भीषण आगीची घटना घडली आहे. या घटनेत एका शेतकऱ्याची आयुष्यभराची कमाई जळून खाक झाली आहे. संबंधित शेतकऱ्यानं घरातील पेटीत ठेवलेली १५ लाख रुपयांची रोकड आणि १८ लाख रुपयांचे दागिने जळून खाक झाले आहे. आगीसारख्या घटनेत झालेल्या नुकसानीची भरपाई आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळत असली, तरी ती भरपाई मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. आर्थिक मदत मिळवण्यासाठी करावी लागणाऱ्या कागदोपत्री कारवाईमुळेच पीडित व्यक्तीला नाकीनऊ येऊ शकतं.
तर पीडित व्यक्तीने कितीही पैसे जळाल्याचा दावा केला तरी, आरबीआयकडून जास्तीत जास्त ५० टक्के रक्कम भरपाई म्हणून मिळते, अशी माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली. बिकानेरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर, आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत मिळणाऱ्या मदतीबाबत शाहनिशा केली असता, मदत मिळवण्याचे नियम अत्यंत क्लिष्ट असल्याचं समोर आलं आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांच्या मते, पक्कं घर पूर्ण जळल्यास ९५ हजार रुपयांची मदत मिळते. तर घर अर्धवट जळाल्यास केवळ ५२०० रुपये दिले जातात. दुसरीकडे, झोपडी जळाल्यास ४१०० रुपयांची मदत मिळते आणि कपडे किंवा भांडी यांसारख्या दैनंदिन वस्तूंचं नुकसान झाल्यास ३८०० रुपये नुकसान भरपाई मिळते.
पशुधनाचं नुकसान झाल्यास किती मदत मिळते?
आगीच्या घटनेत गाय किंवा म्हशीसारखी दुभती जनावरं जिवंत जळून मेल्यास प्रति जनावर ३० हजार रुपये आणि जास्तीत जास्त ९० हजार रुपये नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद आहे. तर शेळ्या-मेंढ्यांसाठी प्रति जनावर ३ हजार रुपये आणि जास्तीत जास्त ३० हजार रुपये देण्याची तरतूद आहे. तर दूध न देणाऱ्या पण आगीत मृत पावलेल्या जनावरांसाठी २५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. आगीमुळे जीवितहानी झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाकडून ४ लाखांची मदत मिळते. यासाठी गुन्हा दाखल झालेल्या प्रतसह ग्रामसेवकाचा अहवाल आवश्यक असतो.
हेही वाचा- विश्लेषण : लढत राष्ट्रपतीपदाची; कसोटी २०२४ साठी विरोधकांच्या एकजुटीची?
जळलेल्या नोटांच्या केवळ पन्नास टक्के रक्कम परत मिळते
बँकेशी संबंधित तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आगीच्या घटनेत रोख रक्कम जळाल्यास परतावा मिळवण्यासाठी आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागते. त्यानुसार तुम्ही कितीही रोकड जळाली असल्याचं सांगितलं तरी त्यातील केवळ पन्नास टक्केच भरपाई मिळते. नोटा किती जळाल्या आणि आता कोणत्या अवस्थेत आहेत, यावरही नुकसान भरपाई अवलंबून असते. आरबीआय जळलेल्या नोटांची स्वतःच विल्हेवाट लावते.
भरपाई करणे कठीण
बिकानेरमधील शेतकरी हरमन सिंग यांच्या घराला बुधवारी रात्री आग लागली, यामध्ये शेतात बांधलेल्या पाच झोपड्यांसह सुमारे ४२ लाख रुपयांचं नुकसान झालं. आगीच्या घटनेनंतर ग्रामसेवक रामलाल आणि कोलायत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. हरमन सिंगच्या पाच झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. ग्रामसेवकानं आपल्या अहवालात एकूण ४२ लाख ७५ हजार रुपयांचं नुकसान झाल्याचं नमूद केलं आहे. पण याची भरपाई मिळणं कठीण आहे.