देशभरात गेल्या काही वर्षांत डिजिटल व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे. युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच यूपीआयमुळे तुमच्या हाताच्या बोटावर आर्थिक व्यवहार आले आहेत. हे व्यवहार अतिशय जलद आणि सोप्या पद्धतीने होतात. या व्यवहारांचा स्वीकार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत झाला आहे. अगदी भाजीवाल्यापासून भंगारवाल्यापर्यंत सर्वजण यूपीआय व्यवहार करीत आहेत. मात्र, या व्यवहारांच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन आर्थिक गुन्हेगार वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून नागरिकांची आर्थिक फसवणूक करीत आहेत. यामुळे यूपीआयची मातृकंपनी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला (एनपीसीआय) नागरिकांच्या जागरूकतेसाठी पावले उचलावी लागली आहेत. यूपीआयचा वापर किती? युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) देशातील डिजिटल व्यवहारांना चालना देणारा प्रमुख घटक बनला आहे. गेल्या वर्षी (२०२४) एकूण डिजिटल व्यवहारांपैकी ८३ टक्के यूपीआयच्या माध्यमातून झाले. यंदा जानेवारी महिन्यात यूपीआयने १६.९९ अब्ज व्यवहारांवर प्रक्रिया केली. गेल्या वर्षांतील याच महिन्याच्या तुलनेत या व्यवहारांमध्ये ३९ टक्के वाढ आणि व्यवहार मूल्यात २८ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांत यूपीआयचा स्वीकार वार्षिक ७४ टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे व्यवहारांच्या बाबतीत ती सर्वांत मोठी किरकोळ देयक यंत्रणा बनली आहे. यूपीआयच्या स्थापनेपासून आतापर्यंत ग्राहकसंख्या ४६ कोटींवर पोहोचली आहे. देशातील विविध स्तरातील लोकांपर्यंत डिजिटल आर्थिक व्यवहार पोहोचविण्याचे काम यूपीआयने केले आहे.

बहुस्तरीय सुरक्षा काय?

यूपीआय यंत्रणा केवळ ग्राहकांच्या सोयीचीच नव्हे तर मजबूत सुरक्षा जाळे असलेली आहे. यात प्रत्येक व्यवहाराची गोपनीयता कायम राखली जाते. एनपीसीआयने अत्याधुनिक सुरक्षा प्रणालींची वापर केला आहे. यामुळे ग्राहकाच्या खात्याला विशिष्ट मोबाइल उपकरणाशी जोडण्यात येते. त्यात त्रयस्थ व्यक्ती मोबाइल क्रमांकाची नोंदणी केल्याशिवाय प्रवेश करू शकत नाही. याचबरोबर यूपीआयमध्ये द्विस्तरीय प्रमाणीकरणाचा समावेश आहे. त्यामुळे ग्राहकाला समोरच्या व्यक्तीला पैसे पाठविण्याआधी संबंधित व्यक्तीची खातरजमा त्याच्या मोबाइल क्रमांकावरून करता येते. याचबरोबर ही खातरजमा केल्यानंतर प्रत्यक्षात व्यवहार करताना सांकेतिक क्रमांक म्हणजेच पिन टाकल्याशिवाय हा व्यवहार पूर्ण होत नाही.

सुरक्षित कसे राहाल?

डिजिटल व्यवहार वाढत असताना एनपीसीआयने ग्राहकांना दक्ष राहण्याचे आणि फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे. ‘थांबा, विचार करा मग कृती करा’ या तत्त्वाचा पुरस्कार करून डिजिटल व्यवहारांमध्ये ग्राहकांनी त्यांची सुरक्षितता जपावी, असे कंपनीने म्हटले आहे. वैयक्तिक अथवा बँकिंग तपशिलाची विनंती करणाऱ्या अनपेक्षित कॉल, संदेश, ई-मेलला प्रतिसाद देण्यापूर्वी थांबा. एखाद्या कंपनीचे संकेतस्थळ अथवा ग्राहक सेवा हेल्पलाइन अधिकृत असल्याची खात्री करून तिथून आलेल्या विनंतीचा विचार करा. संशयास्पद विनंत्या टाळून आणि फसवणुकीच्या प्रयत्नांची तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार करून हुशारीने काम करा, असा सल्लाही एनपीसीआयने ग्राहकांना दिला आहे.

डिजिटल अरेस्टचा वाढता धोका?

डिजिटल व्यवहारांचा वापर वाढू लागल्यापासून फसवणुकीच्या प्रकारांमध्येही बदल घडत आहे. सध्या डिजिटल अरेस्टचे प्रकार वाढू लागले आहेत. एखाद्या तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवितात. त्यांच्याशी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला जातो. या गुन्हेगारांचा वेष आणि त्यांच्यामागे व्हिडीओ कॉलमधून दिसणारी पार्श्वभूमी तपास यंत्रणांसारखी असते. यामुळे नागरिक घाबरतात. नागरिक घाबरल्याने लक्षात येताच त्यांच्याकडून वैयक्तिक तपशील मिळविले जातात. त्यांच्या खात्यावरील पैशांसह मालमत्तेचे तपशील गुन्हेगार मिळवितात. नागरिकांना सर्व पैसे एका बँक खात्यात जमा करण्यास सांगितले जातात. अशा प्रकारच्या डिजिटल अरेस्टच्या प्रकरणांमध्ये फसवणूक झालेल्यांमध्ये सुशिक्षित वर्गातील नागरिकांची संख्या लक्षणीय आहे.

तक्रार कशी करावी?

ग्राहकाला डिजिटल व्यवहारात फसवणुकीचा संशय आल्यास त्याने तातडीने तक्रार करावी. ही तक्रार राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन : १९३० अथवा नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल : https://cybercrime.gov.in येथे नोंदविता येते. ग्राहकाने आपल्या फसवणुकीची तक्रार त्याच्या बँकेकडेही करायला हवी. याचबरोबर ग्राहकांनी फसवणूक करणाऱ्या व्यक्तींकडून आलेले संदेश जतन करून ठेवावेत. यात मोबाइलवरील संदेशाचे स्क्रीनशॉट्स अथवा संवाद जतन करून ठेवल्यास या सायबर गुन्हेगारांवर कारवाई करताना यंत्रणांना मदत होते.

sanjay.jadhav@expressindia.com

Story img Loader