गौरव मुठे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेअर बाजारात करोना काळात विक्रमी डीमॅट खाती उघडली गेली आणि गेल्या वर्षीच ऑक्टोबर (२०२१) महिन्यात सेन्सेक्सने ६२,००० अंशांची ऐतिहासिक पातळी गाठली त्यावेळी नवगुंतवणूकदारांनी जोमात गुंतवणूक केली. मात्र चालू वर्षात रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेली भू-राजकीय परिस्थिती आणि परिणामी जागतिक पातळीवर प्रमुख देशांच्या मंदावलेल्या अर्थव्यवस्था आणि महागाईमुळे देशांतर्गत भांडवली बाजारात पडझड झाली. त्यामुळे गेल्या वर्षी जोमात असलेले नवगुंतवणूकदार सध्या खालावलेल्या पोर्टफोलिओच्या मूल्यामुळे चिंतित आहेत. आपल्या आजूबाजूला वॉरन बफे, राकेश झुनझुनवाला यांनी शेअर बाजारात उभे केलेल्या साम्राज्याबद्दल आपण ऐकतो. त्याने भारावून जाऊन आपणदेखील शेअर बाजारातील यशस्वी गुंतवणूकदार होऊ पाहतो आणि नेमकी तितेच चूक करतो. कारण ते बाजारात काम करताना अगदी सावधगिरीने आणि अभ्यासपूर्वक व्यवहार करतात.

गुंतवणूकदार व्हायचेय की ट्रेडर?

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याआधी आपल्याला एक गुंतवणूकदार व्हायचे आहे की ट्रेडर हे निश्चित केले पाहिजे. गुंतवणूकदार आणि ट्रेडर यांमधील फरक प्रथम समजून घेणे आवश्यक आहे. काही लोक सतत शेअर खरेदी-विक्री करतात आणि त्यातून नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात. असे ट्रेडिंग केले जाते. मात्र काही लोक यालाच गुंतवणूक समजतात. आता गुंतवणूकदार म्हणजे एखादी व्यक्ती दीर्घकालावधीसाठी भविष्यातील आर्थिक परताव्याच्या अपेक्षेने किंवा फायदा मिळवण्यासाठी शेअर बाजारात आर्थिक कामगिरीने सुदृढ असलेल्या चांगल्या कंपन्यांचे समभाग विकत घेते. यासाठी गुंतवणूक करताना दीर्घ कालावधीचे ध्येय निश्चित करून गुंतवणूक केल्यास दीर्घकाळात हमखास फायदा होतो.

शेअर बाजारात गुंतवणूक करताना काय काळजी घ्याल?

शेअर बाजारात गुंतवणूक करताना कायम स्वतः एखाद्या कंपनीचा अभ्यास त्यामध्ये गुंतवणूक करणे हिताचे आहे. हे शक्य नसल्यास अधिकृत आणि नोंदणीकृत आर्थिक सल्लागाराकडून सल्ला घेऊन शेअर बाजारातील गुंतवणुकीचे नियोजन करावे. मित्राच्या, नातलगांच्या किंवा कुणाच्या सांगण्यावरून कधीच शेअर बाजारात गुंतवणूक करू नये. कारण समोरच्या व्यक्तीचा त्याबाबतीत अभ्यास किंवा मिळालेली माहिती योग्य असेलच असे नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी फायदा होईल असे नाही.

विश्लेषण : UPI आणि UPI Lite मध्ये नेमका फरक काय? ग्राहकांना कोणत्या सुविधा मिळणार? जाणून घ्या सविस्तर

सातत्य आणि नियमितता आवश्यक…

शेअर बाजारात स्वतःची एक योजना बनविणे आवश्यक आहे. म्हणजेच शेअर बाजारात शेअर खरेदी करताना एकाच कंपनीच्या शेअरमध्ये सगळी गुंतवणूक करणे टाळले पाहिजे. किमान शेअर बाजारात उपलब्ध असलेल्या माहिती तंत्रज्ञान, धातू, ऊर्जा, वाहन निर्मिती, गृह निर्माण, रसायने, औषध निर्मिती अशा विविध क्षेत्रातील ठराविक कंपन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करायला हवी. म्हणजेच एखाद्या क्षेत्राची कामगिरी ढेपाळल्यास इतर क्षेत्राची कामगिरी समाधानकारक राहू शकते. शिवाय अशा चांगल्या कंपन्यांचा शोध घेण्यासाठी आर्थिक विषयातील अनेक संकेतस्थळे उपलब्ध आहेत, जिथे भूतकाळातील एखाद्या कंपनीचा इतिहास आणि सद्यःस्थिती आणि त्याच क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीशी तुलना करून दाखविले जाते. अशा ठराविक कंपन्यांची निवड केल्यास त्यात नियमितपणे गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. म्हणजेच बाजारातील समभागांच्या किमतीतील चढ-उताराचा फायदा मिळतो.

शेअर बाजारात एका दिवसात कोट्यधीश होता येते?

शेअर बाजार म्हणजे लॉटरी नव्हे. गेल्या काही दिवसांपूर्वी तुम्ही केरळच्या एका रिक्षा चालकाला २५ कोटी रुपयांची लॉटरी लागली हे वृत्त बघितले असेल. मात्र शेअर बाजार म्हणजे लॉटरी नव्हे. बाजारात एखाद्या कंपनीच्या किमतीतील चढ-उतार समजून घेऊन शेअरची खरेदी आणि विक्री करावी लागते. एका दिवसात शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करून त्यावर मोठा नफा मिळवू या आशेने बरेच लोक शेअर बाजारात येतात. पण आपण वस्तुस्थिती समजून घ्यायला हवी. या ठिकाणी अभ्यास न करता गुंतवणूक केल्यास गुंतवलेले भांडवल विनापरतावा जाऊ शकते.

शेअर बाजारात गुंतवणूक करताना कल (ट्रेंड) जाणून घेणे किती आवश्यक?

शेअर बाजारात नवशिके किंवा कमी अनुभव असलेले लोक अनेकदा भावनावश होऊन गुंतवणूक करतात. एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये हमखास फायदा होतोच किंवा एखाद्या घटनेचे पडसाद पूर्वी बाजारावर उमटले तसे यावेळेसदेखील होऊन अमूक शेअर वाढेल असा कयास वर्तविला जातो. मात्र बाजाराच्या बाबतीत असे समज चुकीचे ठरू शकतात.

विश्लेषण: तुम्ही Windows वापरताय? ‘ब्लॅकबाइट’ ठरू शकतो मोठा धोका; Anti Virus मधूनच कम्प्युटरमध्ये करतो शिरकाव

यासाठीच बाजाराचा अभ्यास आणि सखोल ज्ञान घेणे गरजेचे आहे. बाजारातील ट्रेंडला मित्र बनवणे आवश्यक आहे. कारण ‘Always follow the trend because trend is you true friend’ असे इंग्रजीमध्ये वाक्य आहे. ज्याचा अर्थ बाजारातील ट्रेंड हाच आपला खरा मित्र असून तो आपल्याला निश्चितच फायदा मिळवून देऊ शकतो. त्यामुळे बाजारातील ट्रेंड ओळखणे गरजेचे आहे.

शेअरमध्ये नव्हे तर व्यवसायात गुंतवणूक म्हणजे काय?

शेअर बाजारात जेव्हा आपण एखाद्या कंपनीचा शेअर घेतो त्यावेळी आपण ती गुंतवणूक कंपनीच्या व्यवसायात करत असतो. त्यामुळे एखाद्या कंपनीचा शेअर घेण्याआधी ती कंपनी कोणता आणि कशा प्रकारे व्यवसाय करते, कोणत्या वस्तू सेवांची विक्री करते, सध्या आणि भविष्यात कशी मागणी असेल, कोणकोणती आव्हाने निर्माण होऊ शकतात, याचा विचार करणे आवश्यक आहे. शेअर बाजारात दीर्घकालावधीसाठी गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार हे सर्वात श्रीमंत आहेत, असे आपणास दिसेल. राकेश झुनझुनवाला याच प्रकारे गुंतवणूक करायचे.

झुनझुनवालांचा ‘3F’ फॉर्म्युला काय आहे?

राकेश झुनझुनवाला शेअरची निवड करताना कायम ‘3F’ फॉर्म्युला लक्षात ठेवून गुंतवणूक करायचे. ‘3F’ फॉर्म्युला म्हणजे शेअरचे वाजवी मूल्य (फेअर व्हॅल्यू), कंपनीचे मूलभूत विश्लेषण (फंडामेंटल अनॅलिसिस) आणि भविष्यातील कंपनीच्या योजना (फ्युचर प्लॅन्स). जर सध्या शेअरची किंमत चांगली असेल म्हणजेच स्वस्त आणि योग्य पातळीवर आहे, तसेच कंपनीची भूतकाळातील आर्थिक कामगिरी चांगली असली पाहिजे आणि कंपनीच्या भविष्यातील योजना काय आहेत हे जाणून घेणे आवश्यक आहे. झुनझुनवाला यांनी अगदी पहिल्या दिवसापासून ही तत्त्वे पाळली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to invest in share market get success benefits precautions in sensex print exp pmw
Show comments