मंगल हनवते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अब दिल्ली दूर नही’ असे म्हणण्याची संधी सर्वसामान्यांनाही लवकरच उपलब्ध होणार आहे. दिल्ली ते मुंबई प्रवास येत्या काही वर्षात केवळ १२ तासांत पूर्ण करता येणार आहे. आज दिल्ली ते मुंबई प्रवासासाठी २४ ते २५ तास लागतात. हा कालावधी कमी करून देशाच्या राजधानीला आणि आर्थिक राजधानीला जवळ आणण्याचे काम होणार ते मुंबई ते दिल्ली द्रुतगती महामार्गाच्या माध्यमातून. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) हा महामार्ग बांधण्यात येत आहे. तेव्हा हा महामार्ग नेमका आहे कसा, आणि यामुळे मुंबई तसेच दिल्ली अंतर कसे कमी होणार याचा हा आढावा…

एनएचआयच्या माध्यमातून महाराष्ट्रात महामार्गाचे जाळे?

ज्या देशातील दळणवळण व्यवस्था बळकट तो देश श्रीमंत या ऊक्तीप्रमाणे केंद्र सरकारने देशभरात महामार्गांचे जाळे विणण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रही या रस्त्यांच्या जाळ्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. देशाची आर्थिक राजधानीला देशाच्या विविध शहरांशी जोडण्याचा निर्णय एनएचएआयने घेतला आहे. मुंबईतील पर्यायाने महाराष्ट्रातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी एनएचएआयकडून अनेक महामार्ग हाती घेण्यात आले आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा महामार्ग आहे मुंबई ते दिल्ली द्रुतगती महामार्ग. अंदाजे १३५० किमीचा हा मार्ग असून महाराष्ट्रातून यातील अंदाजे १७१ किमी रस्ता जाणार आहे. तसेच औरंगाबाद-पुणे महामार्ग असा २७० किमी महामार्गही एनएचएआयने हाती घेतला आहे. तसेच सुरत ते चेन्नई महामार्ग महाराष्ट्रातून जाणार आहे. या महामार्गातील अंदाजे ४५० किमीचा रस्ता राज्यातून जाणार आहे. एकूणच १००० किमीहून अधिकचे रस्ते एनएचआयकडून महाराष्ट्रात नव्याने बांधले जात असून हे रस्ते देशातील विविध शहरांशी जोडण्यात येणार आहेत.

मुंबई ते दिल्ली द्रुतगती महामार्गाची गरज का?

मुंबई आणि दिल्ली ही देशातील सर्वात महत्त्वाची शहरे. मात्र या दोन शहरांमधील अंतर बरेच असल्याने ते दूर करत या दोन शहरांना जोडण्यासाठी एनएचआयने मुंबई ते दिल्ली द्रुतगती महामार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. सध्या मुंबई ते दिल्ली रस्ते प्रवासासाठी २४ ते २५ तास वा त्याहीपेक्षाही अधिक वेळ लागतो. पण आता मात्र या महामार्गामुळे हे अंतर केवळ १२ तासात पार करता येणार आहे. हा महामार्ग सुरू झाल्यास राजधानी आणि आर्थिक राजधानी थेट एकमेकांशी जोडली जाणार आहे.

महामार्गाची वैशिष्ट्ये काय?

मुंबई ते दिल्ली महामार्ग अंदाजे १३५० किमी लांबीचा आहे. हा महामार्ग हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातून जाणार आहे. हरियाणातील महामार्गाची लांबी १२९ किमी, राजस्थानमधील ३७३ किमी, मध्य प्रदेशमधील २४४ किमी, गुजरातमधील ४२६ किमी आणि महाराष्ट्रातील लांबी १७१ किमी अशी आहे. हरियाणातील गुड़गांव येथून हा महामार्ग सुरू होऊन राजस्थानच्या जयपूर आणि सवाई माधोपूरवरून जातो. पुढे तो मध्य प्रदेशमधील रतलाम आणि गुजरातमधील बडोद्यावरून महाराष्ट्रातील मुंबईजवळ येऊन संपणार आहे. या महामार्गासाठी या सर्व राज्यातील सुमारे १५,००० हेक्टर जागा संपादित करण्यात आली आहे. या महामार्गासाठी ८० लाख टन सिमेंटचा वापर करावा लागणार आहे. अंदाजे एक लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या हा आठ मार्गिका असून भविष्यात बारा मार्गिकांचे नियोजन आहे. या महामार्गावरील वेग ताशी १२० किमी असणार असून तेथे फूड प्लाझा, पेट्रोल पंपसह आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मात्र या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना भरमसाट टोल द्यावा लागणार आहे.

कामास सुरुवात कधी?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा महामार्ग उभारला जात आहे. त्यानुसार २०१९ मध्ये ५२ पॅकेजमध्ये (भाग) महामार्गाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. ५२ पॅकेजप्रमाणे ५२ कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली असून चार टप्प्यात काम सुरू आहे. या चार टप्प्यातही पुढे टप्पे आहे. दरम्यान नुकतेच या महामार्गातील सोहना-दौसा लालसोट अशा २४६ किमीच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. हा महामार्ग सुरु झाल्याने आता दिल्ली ते जयपूर अंतर आठ-साडे आठ तासावरून केवळ पाच तासांवर आले आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता एनएचएआयने उर्वरित कामाला वेग दिला आहे. टप्प्याटप्प्यात आता हा महामार्ग खुला करण्यात येणार आहे. दरम्यान मुंबई ते बडोदा द्रुतगती महामार्ग हा मुंबई ते दिल्ली महामार्गातीलच एक महत्त्वाचा भाग आहे. या मुंबई ते बडोदा महामार्गाचेही काम सध्या वेगात सुरू आहे. हा महामार्ग मुंबई ते दिल्ली महामार्गातील शेवटचा टप्पा असेल. मुंबई ते बडोदा महामार्गाचे काम दोन टप्प्यात करण्यात येत आहे. मुंबई ते बडोदा महामार्गाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याच महामार्गात माथेरानच्या डोंगराखालून ट्वीन ट्यूब टनेल (दुहेरी बोगदा) खणला जाणार आहे. चार किमीहून अधिक असा हा दुहेरी बोगदा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून नुकतीच या बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. अत्याधुनिक आणि नवीन अशा ऑस्ट्रियन एनएटीएम तंत्रज्ञानाचा वापर करत माथेरानच्या डोंगराखाली खोदकाम केले जाणार आहे.

मुंबई ते दिल्ली प्रवास केवळ १२ तासात नेमका कधीपासून?

मुंबई ते दिल्ली महामार्गाचे काम २०१९ मध्ये सुरू झाले आहे. यातील पहिला टप्पा नुकताच खुला झाला आहे. यातील पुढील टप्पे २०२४ पूर्ण होणार असून चौथा शेवटचा टप्पा जून २०२५ मध्ये पूर्ण होणार आहे. हा शेवटचा टप्पा मुंबईतील आहे. त्यामुळे शेवटचा टप्पा पूर्ण झाल्यानंतरच मुंबई ते दिल्ली असा थेट प्रवास जून २०२५ नंतर करता येणार आहे. हा महामार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबई ते दिल्ली प्रवास केवळ १२ तासात पूर्ण करता येणार आहे. त्याचवेळी वसई-विरारमधील वाहतूक कोंडी दूर होण्यासही मदत होणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to possible to travel from mumbai to delhi in just 12 hours print exp kvg
Show comments