मंगल हनवते
गोरेगाव, उन्नतनगर येथील जय भवानी इमारतीला लागलेल्या आगीत आठ जणांचे बळी गेल्यानंतर अखेर राज्य सरकार आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण खडबडून जागे झाले आहेत. एकीकडे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील झोपु योजनेतील सर्व इमारतींची अग्निसुरक्षा तपासणी केली जाणार आहे. तर दुसरीकडे आगीच्या घटना रोखण्यासाठी आता २५० इमारतींना संकटकालीन जिने (लोखंडी जिने) बसविण्यात येणार आहेत. संकटकालीन जिने बसविण्याची ही योजना नेमकी आहे तरी काय? एकूणच झोपु योजनेची स्थिती याचा आढावा…
झोपु पुनर्वसन योजना काय आहे?
मुंबईचा मोठा भाग झोपड्यांनी व्यापला आहे. या झोपड्यांमुळे मुंबईच्या सौंदर्यात बाधा येत असून बकालपणा येत आहे. झोपडपट्टीतील नागरिक अपुऱ्या सोयीसुविधांमध्ये राहात आहेत. या पार्श्वभूमीवर झोपडपट्टीवासीयांचे जीवनमान उंचविण्यासाठी तसेच मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणली. या योजनेद्वारे झोपडपट्टीवासीयांना इमारतीत मोफत पक्की घरे देण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची स्थापना केली. या प्राधिकरणाच्या माध्यमातून मागील काही वर्षांपासून झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन केले जात आहे.
आणखी वाचा-विश्लेषण: चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ला उतरती कळा का लागली?
आतापर्यंत किती झोपड्यांचे पुनर्वसन?
झोपु प्राधिकरणाने मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र मुंबईतील झोपडपट्ट्यांची संख्या आणि झोपु योजनांची गती पाहता हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पुढील आणखी कित्येक वर्षे लागण्याची शक्यता आहे. कारण झोपु प्राधिकरणाची स्थापना होऊन अंदाजे २५ वर्षे लोटली तरी आतापर्यंत केवळ अडीच लाख झोपड्यांचे पुनर्वसन झाले आहे. आतापर्यंत अंदाजे चार हजार इमारती उभारत या अडीच लाख झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. आज मोठ्या संख्येने झोपु योजना राबविल्या जात असल्या तरी विविध कारणाने शेकडो योजना रखडल्या आहेत. रखडलेल्या योजना मार्गी लावण्यासाठी झोपु प्राधिकरणाकडून प्रयत्न केले जात आहेत. असे असले तरी झोपडपट्टीमुक्त मुंबई करण्यासाठी आणखी बरीच वर्षे वाट पाहावी लागणार आहे.
झोपु इमारती की उभ्या झोपडपट्ट्या?
मुंबईतील अडीच लाख झोपड्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. झोपु योजनेचा मुख्य उद्देश झोपडपट्टीवासीयांचे जीवनमान उंचाविणे हा आहे. मात्र हा उद्देश म्हणावा तसा पूर्ण करता आला नसल्याचे चित्र आहे. कारण अनेक इमारतींत सोयीसुविधांचा अभाव दिसून येतो. इमारतींच्या बांधकामापासून ते त्यातील सोयीसुविधांबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होताना दिसतात. या इमारती म्हणजे उभ्या झोपडपट्ट्याच असल्याचा आरोप होताना दिसतो. विकासक बांधकामात अनेक त्रुटी ठेवत असल्याच्याही तक्रारी आहेत. झोपु योजनेअंतर्गत सात मजलीपासून २२ मजल्यापर्यंतच्या इमारती बांधल्या गेल्या आहेत. तर महालक्ष्मी येथे ४२ मजली इमारत उभी आहे. आतापर्यंत उभारण्यात आलेल्या अनेक इमारतींमध्ये पाणी, उद्वाहक आणि अग्निरोधक यंत्रणा अशा सुविधांचा अभाव दिसून येतो. अशात गोरेगावमध्ये झोपु योजनेतील इमारतीला लागलेल्या आगीमुळे झोपु योजनेतील इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आणखी वाचा-भारत-श्रीलंका प्रवास आता आणखी सोपा; नव्याने सुरू झालेल्या जलवाहतुकीची विशेषता काय?
गोरेगाव आग दुर्घटना नेमकी काय?
गोरेगाव पश्चिम येथील उन्नत नगरमध्ये झोपु योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या जय भवानी इमारतीला आग लागली. ६ ऑक्टोबरला लागलेल्या या आगीत सात जणांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. या इमारतीतील अनेक जण जुन्या कपड्यांचा व्यवसाय करणारे असून मोठया प्रमाणावर जुने कपडे इमारतीखाली वाहनतळामध्ये ठेवण्यात आले होते. त्याच कपड्यांना आग लागली आणि ती पसरली. अशा वेळी एकच जिना असलेल्या या इमारतीतून अनेकांना बाहेर पडता आले नाही त्यामुळे जीवितहानी झाली. या घटनेमुळे झोपु इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.
झोपु इमारतींची अग्निसुरक्षा तपासणी?
गोरेगाव आग दुर्घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारने अशा घटना रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तर सर्व झोपु इमारतींची अग्निसुरक्षा तपासणी करण्याचेही आदेश दिले. या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून या इमारतींची अग्निसुरक्षा तपासणी केली जाणार आहे. तर तपासणी अहवालानुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे. या तपासणीसह इतरही उपाययोजना करण्यात येणार आहेत.
आणखी वाचा-रुग्णवाहिका चालक ते सिनेमॅटोग्राफर; डिस्नेलँडची निर्मिती कशी झाली ?
संकटकाळात उपाय काय?
झोपु योजनेतील सात मजली इमारतींना एकच जिना आहे. अशा वेळी आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत रहिवाशांना बाहेर पडणे अवघड होते. मोठ्या इमारतींना मात्र एकपेक्षा अधिक जिने असल्याचा तसेच अग्निरोधक यंत्रणा असल्याचा दावा झोपु प्राधिकरणाकडून केला जात आहे. अशा वेळी सात मजली इमारतींची सुरक्षा महत्त्वाची ठरताना दिसत आहे. त्यामुळेच यावर उपाय म्हणून झोपु प्राधिकरणाने सात मजली इमारतींना संकटकालीन जिने अर्थात लोखंडी जिने बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सात मजली इमारती नेमक्या किती आहेत याची नेमकी आकडेवारी झोपु प्राधिकरणाकडे नाही. मात्र अशा अंदाजे २५० इमारती असल्याचे प्राथमिक स्तरावर सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या २५० इमारतींना असे जिने बसविण्याचे झोपु प्राधिकरणाने निश्चित केले आहे. सात मजली इमारतींचे सर्वेक्षण करून पुढे इमारतींची संख्या निश्चित करून जिने बसविण्याची कार्यवाही केली जाणार आहे. सात मजली इमारतींच्या मागील बाजूस काही जागा मोकळी ठेवण्यात आलेली असते. या बाजूला अर्थात इमारतीच्या बाहेरील बाजूस लोखंडी जिने बसविले जाणार आहेत. या जिन्याद्वारे रहिवाशांना संकटकालीन स्थितीत बाहेर पडता येणार आहे. हे जिने बसविण्याचा सर्व खर्च झोपु प्राधिकरण करणार आहे. प्राधिकरणाचा हा निर्णय अशा इमारतीतील रहिवाशांना नक्कीच दिलासा देणारा ठरेल.