भंडाऱ्यात वाघीण मृत्युमुखी पडली, तीन महिन्यांपूर्वी गोंदियातही अशीच घटना घडली होती, त्याआधी चंद्रपूर जिल्ह्यात वाघ मृत्युमुखी पडला. राज्यात काही वर्षांत रेल्वेच्या धडकेत तब्बल १३ वाघांचा मृत्यू झाला…
‘आसाम पॅटर्न’ काय आहे?
आसाममध्ये सप्टेंबर २०२० मध्ये रेल्वेच्या धडकेत एक हत्तीण आणि तिच्या पिल्लाचा मृत्यू झाला. हे आसामच्या होजई जिल्ह्यातील लुमडिंग रेल्वे विभागाअंतर्गत पाथोरखोला रेल्वे स्थानकाजवळ घडले. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये आसाम वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित रेल्वे इंजिन जप्त केले. वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२च्या अनुसूची एक (१२ बी) अंतर्गत ही जप्ती करण्यात आली. त्यानंतर आवश्यक सेवा असल्यामुळे इंजिन परत केले. मात्र, हत्तींच्या मृत्यूचा मोबदला म्हणून १२ कोटी रुपये देण्याचे रेल्वने मान्य केले. चालक आणि साहाय्यकाला निलंबित करण्यात आले.
हेही वाचा :‘नासा’समोर नवं संकट, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर वायुगळती; नेमकी कशामुळे? परिणाम काय?
मध्य प्रदेशदेखील आसामच्या वाटेवर का?
जुलै २०२४ मध्ये मध्य प्रदेशातील रतापाणी वन्यजीव अभयारण्यातून जाणाऱ्या मध्य घाट-बुधनी रेल्वे मार्गावर वाघाच्या तीन बछड्यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला. एक बछडा जागीच मृत्युमुखी पडला, तर दोन बछडे १५ दिवसांनंतर मरण पावले. रेल्वेखाली येऊन होणारे वन्यप्राण्यांचे मृत्यू रोखण्यासाठी मध्य प्रदेश वन विभागानेही आसामच्या पावलावर पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तीन बछड्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेली रेल्वे जप्त करण्याचा विचार तेथील वन विभाग करत आहे.
जप्ती होऊ शकते का?
वाघ हादेखील वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत अनुसूची एकमधील वन्यप्राणी आहे. त्याअंतर्गत येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार घटकांवर कारवाई करता येणे शक्य आहे. वन्यजीव क्षेत्रातून जाणाऱ्या रेल्वेकडून ठरवून दिलेले गतिनियम पाळले जात नसतील आणि त्यामुळे वन्यप्राणी मृत्युमुखी पडत असेल किंवा जखमी होत असेल तर रेल्वे व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करता येतो. त्यामुळे मध्य प्रदेशातदेखील रेल्वेचालकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असे वन विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
वेगाची बंधने पाळली जातात का?
जंगलातून जाणाऱ्या रेल्वेच्या गतीवर बंधने आहेत. या भागांत रेल्वेची गती दिवसा ताशी ५० व रात्री ४० किलोमीटर असावी, असा नियम आहे. मात्र, तो पाळला जात नाही. जंगलातून जाणाऱ्या रेल्वेची गती ८० ते १०० किलोमीटर प्रति तास असते. रेल्वेकडून या गतीवर कधीच नियंत्रण ठेवले जात नाही. परिणामी वन्यप्राणी मृत्युमुखी पडतात. मुख्य मार्गावर रेल्वेचा वेग ताशी १३० किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे. जंगलालगत रेल्वेचा वेग ताशी २५ ते ३० किलोमीटरपर्यंत मर्यादित ठेवला तरच या घटना टाळता येतील, असे अभ्यासक सांगतात.
महाराष्ट्रातही अशीच स्थिती?
महाराष्ट्रातसुद्धा वाघांचे मृत्यू वाढत आहेत. जंगलालगतच्या प्रकल्पांना मान्यता मिळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे रेल्वेच्या धडकेत होणारे मृत्यूदेखील वाढले आहेत.
शमन उपाययोजनेत दिरंगाई का?
जिथे रेल्वेमार्ग पूर्वीपासून आहेत तिथेवन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी उपशमन योजना (मीटिगेशन मेजर्स) करण्याची म्हणजेच भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल बांधण्याचा पर्याय स्वीकारण्याची आवश्यकता आहे. भारतीय वन्यजीव संस्था, वन्यजीव संवर्धन संस्था यांसारख्या अनेक संस्था या उपशमन योजना आखतात. मात्र, अंमलबजावणीत सातत्य नसल्याने त्याचा फटका वाघ, बिबट यांसह इतरही वन्यप्राण्यांना बसत आहे. तीन वाघ आणि बिबट्यांचा बळी घेणाऱ्या यारेल्वेमार्गावर आता तरी उपशमन योजना होणार का, असा प्रश्न वन्यजीवप्रेमींनी उपस्थित केला आहे.
rakhi.chavhan@expressindia.com