केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पाळीव कुत्र्यासोबत रेल्वेच्या एसी डब्यात प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा व्हिडीओ ट्वीट केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ आधी इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता. त्याला काही लाखांमध्ये व्ह्यूज मिळाल्यानंतर ट्विटरवरदेखील हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला. एका प्रवाशाने ट्विटरवर टाकलेला व्हिडीओ रिट्वीट करत असताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कॅप्शन लिहिले की, भारतीय रेल्वे २४/७ आपल्या सेवेत आहे. या ट्वीटखाली अनेक लोकांनी कमेंट करून कुत्र्यासोबत रेल्वेत प्रवास करू शकतो का? याबद्दल प्रश्न विचारले आहेत. दूरवरील अंतराचा प्रवास करताना पाळीव प्राण्यांना आपण रेल्वेतून घेऊन जाऊ शकतो का? त्याचे नियम काय आहेत? आणि किती शुल्क द्यावे लागते? याबद्दल घेतलेला हा आढावा.

प्रवासी पाळीव प्राण्यांसोबत प्रवास करू शकतात?

एअर इंडिया आणि आकासा एअर देशांतर्गत विमान प्रवासादरम्यान पाळीव प्राण्यांसोबत प्रवासास परवानगी देत होते. पण पाळीव प्राणीप्रेमी रेल्वेने प्रवास करण्याला पसंती देतात. एका अभ्यासानुसार महिन्याला जवळपास अडीच हजार पाळीव प्राणी भारतीय रेल्वेमधून प्रवास करतात.

पाळीव प्राण्यांना ट्रेनमध्ये कसे नेणार?

रेल्वेकडून याबाबत विविध पर्याय देण्यात आले आहेत. कुत्र्यांसाठी तुम्ही डॉग बॉक्सेस बुक करू शकता. बहुतेक रेल्वेमध्ये पार्सल डबा जोडलेला असतो. या डब्यात डॉग बॉक्सेस ठेवले जातात. ज्या स्थानकापासून प्रवास सुरू करायचा आहे, त्या स्थानकावरील पार्सल ऑफिसमध्ये तुम्ही डॉग बॉक्सेस उपलब्ध आहेत का? याबाबत चौकशी करू शकता. तसेच छोटे पपीज आणि किटन्स जे बास्केटमध्ये मावू शकतात, अशा बास्केटना प्रवासी ट्रेनच्या डब्यात नेऊ शकता. पण त्यासाठी तिकीट बुक करताना अधिक शुल्क भरावे लागेल. शुल्काची माहिती रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

काय करावे आणि काय करू नये?

पाळीव कुत्रा किंवा मांजर यांना घेऊन प्रवास करायचा असल्यास फक्त एसी प्रथम श्रेणीच्या डब्यातूनच प्रवास करता येऊ शकतो. त्यासाठीदेखील काही अटी आहेत. रेल्वेच्या नियमाप्रमाणे प्रथम श्रेणी डब्यातील चार बर्थ किंवा दोन बर्थ असलेल्या केबिनचे बुकिंग एकाच प्रवाशाने केलेले असेल तरच आपल्यासोबत पाळीव प्राणी घेऊन जायची परवानगी दिली जाते.

पाळीव प्राण्याचे प्रवास शुल्क हे पार्सल कार्यालय ठरविते. प्राण्याचे वजन आणि प्रवासाचे अंतर पाहून हे शुल्क ठरविले जाते. जर तिकीट प्रतीक्षा यादीत असेल तर प्रवासी स्थानिक क्षेत्रीय रेल्वे मॅनेजर किंवा जनरल मॅनेजरच्या कार्यालयात जाऊन एसी प्रथम श्रेणी डब्यातील चार बर्थ किंवा दोन बर्थ कम्पार्टमेंट मागून घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना प्रवासाच्या आधीच अशी विनंती करावी लागेल. या कार्यालयाचा पत्ता रेल्वेच्या संकेतस्थळावर मिळेल.

याआधी प्रवाशांना पाळीव प्राण्यासोबत प्रवास करण्याची परवानगी कुठे मागावी, याबाबत कोणतीही माहिती नव्हती. व्हिडीओमधील मुलीने स्वतःसोबत पाळीव प्राणी आणल्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळाली आणि त्यांनी सदर प्रवाशाला बर्थ देताना ही बाब ध्यानात घेऊन बर्थ दिला. जर पाळीव प्राणी सोबत घेऊन जाणाऱ्या प्रवाशाने पूर्ण केबिन आरक्षित केलेली नसेल तर अशा वेळी प्रवाशाने सोबत असणाऱ्या प्रवाशांची लेखी ना-हरकत परवानगी घ्यावी लागेल.

या प्रक्रियेमध्ये वेळ जात असल्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांनी पाळीव प्राण्यासोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे सुटण्याच्या काही तास आधी स्थानकावर येण्याची विनंती केलेली आहे. जेणेकरून रेल्वे सुटण्याआधी सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. रेल्वे स्थानकाशी संबंधित अधिकारी सांगतात की, प्रवाशांनी आपल्यासोबत ओळखपत्र घेऊन प्रवास करावा. जसे की, आधार कार्ड आणि पाळीव प्राण्याचे लसीकरण प्रमाणपत्र.

एसीच्या प्रथम श्रेणी डब्यात जास्तीत जास्त पाळीव प्राणी नेण्याचादेखील नियम आहे. पाळीव प्राण्यांची संख्या ही तिकीट बुक केलेल्या प्रवाशांच्या संख्येपेक्षा जास्त असायला नको. याचा अर्थ एक प्रवासी स्वतःसोबत एकच पाळीव प्राणी आणू शकतो.

शुल्क किती आहे?

जर डॉग बॉक्समधून कुत्र्याचा प्रवास होत असेल तर ३० रुपये प्रतिकिलो आणि जर एसी प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करत असाल तर प्रतिकिलो ६० रुपये शुल्क आकारले जाते.

एसीच्या द्वितीय आणि तृतीय, एसी चेअर, स्लीपर आणि द्वितीय श्रेणी डब्यातून पाळीव कुत्र्यांना नेण्यास मनाई आहे. मात्र छोटे पपीज आणि किटन्स हे बास्केटमधून सर्व श्रेणीच्या डब्यातून नेता येतात. त्यासाठी पार्सल कार्यालयात बुकिंग करावे लागेल. पपीज आणि किटन्ससाठी वाहतूक शुल्क प्रतिकिलो २० रुपये आहे. काही ट्रेनमध्ये फक्त एकच डॉग बॉक्स उपलब्ध असतो. अशा वेळी प्रथम येणाऱ्यांनाच प्राधान्य देण्यात येते.
पाळीव कुत्र्यांसाठी आगाऊ बुकिंग करण्याची कोणतीही सुविधा नाही. पाळीव प्राण्याच्या मालकासमोरच डॉग बॉक्स बंद करण्यात येतो. प्रवासादरम्यान पाळीव प्राण्याला भरविण्याची जबाबदारी ही त्याच्या मालकाची असेल.

Story img Loader