वॉशिंग्टनमधील सेपियन लॅब्स या स्वयंसेवी संस्थेने जागतिक स्तरावर केलेले एक संशोधन सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. मोबाइल, स्मार्टफोन, टॅब याचा वापर आता इतका वाढला आहे की, लहान मुलांनाही सर्रास स्मार्टफोन वापरायला दिले जातात. पालकांनाही लहान मुलांना वेळ देता येत नाही, त्यामुळे स्मार्टफोन मुलांच्या हातात दिला जातो. ज्यामुळे मुले त्यात गुंतून राहतात आणि पालकांनाही आपापले सोपस्कार पार पाडता येतात. लहान मुले काही वेळातच स्मार्टफोन युजर फ्रेंडली बनतात, याचेही कौतुक अनेक पालकांना असते. आपला पाल्य लहान असून मोबाइल उत्तमरीत्या हाताळतो, असे काही पालक अभिमानाने सांगतात. पण ही अभिमानाने सांगण्याची गोष्ट नाही, असे सेपियनच्या संशोधनातून समोर आले आहे. तुम्ही जेवढ्या उशिरा मुलांच्या हातात स्मार्टफोन द्याल, तेवढे त्यांचे मानसिक आरोग्य स्मार्ट राहू शकते. जर कमी वयात लहान मुलांच्या हातात स्मार्टफोन गेला तर मोठे झाल्यानंतर त्या मुलांना गंभीर स्वरूपाचे मानसिक आजार जडू शकतात. त्यातही पुरुषांपेक्षा महिलांच्या मानसिक आरोग्यावर अधिक परिणाम झाल्याचे सेपियनच्या संशोधनातून समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“एज ऑफ फर्स्ट स्मार्टफोन ॲण्ड मेंटल वेलबिइंग आऊटकम्स” या नावाने हे संशोधन १४ मे रोजी प्रकाशित करण्यात आले. आता १८ ते २४ या वयोगटात असणाऱ्या मुला-मुलींना लहानपणी कितव्या वर्षात स्मार्टफोन देण्यात आला आणि आता त्यांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम झाला किंवा झाला नाही, याबाबतचे संशोधन करण्यात आले. ग्लोबल माइंड प्रोजेक्ट या अभियानांतर्गत सेपियन लॅब्सने हे संशोधन केले.

या वर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान १८ ते २४ या वयोगटांतील २७ हजार ९६९ मुलांच्या मानसिक आरोग्याचा अभ्यास या संशोधनासाठी केला गेला. उत्तर अमेरिका, युरोप, लॅटिन अमेरिका, दक्षिण आशिया आणि आफ्रिकेमधील ४१ देशांमधून हा सर्व्हे केला गेला. भारतामधील चार हजार युवकांचा या संशोधनात समावेश करण्यात आला होता.

सेपियन लॅब्सचे संस्थापक डॉ. तारा थियागर्जन या संशोधनाची माहिती देताना म्हणाल्या की, संशोधनातील निष्कर्षानुसार बालपणी जेवढ्या उशिरा मुलांच्या हाती स्मार्टफोन देण्यात आला. तेवढ्या प्रमाणात मोठे झाल्यावर मुलांच्या मानसिक आरोग्यात सुधारणा पाहायला मिळाल्या. तसेच या डिजिटल युगात मानसिक आरोग्याचा विकास करण्यासाठी या संबंधाचा अभ्यास करणे आणि परिणामकारक धोरणे आपल्याला साहाय्यभूत ठरू शकतात. अशा संशोधनामुळे समस्यांचा माग काढणे सोपे जाऊ शकते.

संशोधन करण्यासाठी कोणते निकष ठरविण्यात आले?

संशोधनात सहभागी झालेल्या युवकांकडून ४७ घटकांवर आधारित माहिती संकलित करण्यात आली. जीवनावर परिणाम करणारी मानसिक लक्षणे आणि क्षमतांचे मूल्यांकन करून त्याला विशिष्ट असे गुण देण्यात आले.

सहभागी लोकांकडून गोळा केलेली माहिती मूल्यांकन वापरून संकलित केली जाते, ज्यात लक्षणे आणि मानसिक क्षमतांची विस्तृत श्रेणी समाविष्ट आहे आणि एकत्रित केलेल्या एकूण गुणांचा समावेश आहे. ज्याला मानसिक आरोग्य निर्देशांक (Mental Health Quotient or MHQ) असेही म्हटले जाते. संशोधकांनी सहभागी झालेल्या युवकांचे गुण आणि प्रत्येकाची वैयक्तिक माहिती तपासून त्याची तुलना मुला-मुलींना वयाच्या कोणत्या टप्प्यावर स्वतःचा स्मार्टफोन मिळाला, या घटनेशी केली.

संशोधनातील महत्त्वाचे निष्कर्ष काय आहेत?

  • आता १८ ते २४ वयोगटांत असलेल्या ज्या मुला-मुलींना अगदी कमी वयात स्वतःचा स्मार्टफोन मिळाला, त्या मुलांचे मानसिक आरोग्य सुदृढ नसल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. यातही महिलांना याचा अधिक फटका बसलेला दिसला.
  • सहाव्या वर्षी ज्या मुलांच्या हातात स्मार्टफोन आला, अशा मुलांध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचे प्रमाण ४२ टक्के एवढे आहे. तर ज्या मुलांनी १८ व्या वर्षी स्मार्टफोन वापरायला सुरुवात केली त्यांच्यामध्ये हे प्रमाण घसरून ३६ टक्क्यांवर आले आहे.
  • याचीच तुलना मुलींशी करायची झाल्यास, ज्या मुलींना वयाच्या सहाव्या वर्षी स्मार्टफोन मिळाला त्यांना मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या जडण्याचे प्रमाण ७४ टक्के असल्याचे आढळले. तर १८ व्या वर्षी स्मार्टफोन वापरणाऱ्या मुलींमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांचे प्रमाण ४६ टक्के असल्याचे आढळले.
  • या संशोधनात महत्त्वाची बाब समोर आली, ती म्हणजे जेवढ्या उशिरा मुलांच्या हातात स्मार्टफोन पडला, तेवढा त्यांच्यातील आत्मविश्वास, इतरांशी सकारात्मकतेने संबंध ठेवण्याची त्यांची क्षमता वाढल्याचे दिसून आले. तसेच ज्या मुलींना उशिरा स्मार्टफोन मिळाला, त्यांच्या स्वभावातील मूड, दृष्टिकोन, अनुकूलता आणि लवचिकता अधिक असल्याचे लक्षात आले.
  • याव्यतिरिक्त, जर मुलांना अतिशय लहान वयात स्मार्टफोन हाताळण्यास मिळाला तर त्यांच्यात आत्महत्येचे विचार, इतरांच्या प्रती आक्रमकतेची भावना, वास्तवापासून दूर राहणे, कल्पकतेमध्ये घट अशा अनेक मानसिक आरोग्याशी निगडित समस्या दिसून आल्या.

हे संशोधन भारतासाठी महत्त्वाचे का?

भारतातून केवळ चार हजार मुलांचा या संशोधनात सहभाग असला तरी हे प्रमाण सावधानतेचा इशारा देण्यासाठी पुरेसे आहे. भारतात १० ते १४ वयोगटांतील ८३ टक्के मुलांच्या हातात स्मार्टफोन आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाणापेक्षा ही संख्या ७६ टक्क्यांनी अधिक आहे, अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने मागच्या वर्षी मॅकॲफीच्या जागतिक कुटुंब अभ्यासातून दिली होती.

सेपियन लॅब्स सेंटरच्या ह्युमन ब्रेन ॲण्ड माइंडचे संचालक शैलेंदर स्वामिनाथन यांनी या संशोधनाबाबत एचटीशी बातचीत केली. ते म्हणाले, हे संशोधन कमी वयात तंत्रज्ञानाच्या होत असलेल्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. तंत्रज्ञानाचा अतिरेक लहान मुले आणि युवकांच्या मानसिक आरोग्यावर किती परिणाम करतोय, हे यातून दिसून आले आहे. भारतासारख्या देशासाठी हे संशोधन अतिशय महत्त्वपूर्ण आहे. भारतात १५ ते २५ या वयोगटांतील मुलांची संख्या २० कोटी एवढी आहे, त्या अनुषंगाने या संशोधनातील निष्कर्ष शाळा, पालक आणि इतरांसाठी दिशादर्शक ठरतील.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How using smartphones as kids can cause mental health issues what a new study says kvg