ज्ञानेश भुरे
भारतीय फलंदाजीचा कणा राहिलेला विराट कोहली २०१९पासून अचानक अपयशाच्या गर्तेत अडकला होता. सततचे क्रिकेट, कर्णधारपदाची काढून घेण्यात आलेली जबाबदारी, ढासळलेली मानसिकता या सगळ्याचा कोहलीच्या खेळावर परिणाम झाला. मात्र नैसर्गिक गुणवत्ता लाभलेले खेळाडू अपयशाला मागे सारतातच. आशिया चषक आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतून कोहलीने हे सिद्ध करून दाखवले. कोहलीचा हा गवसलेला सूर त्याच्यासह भारतीय क्रिकेटसाठी आनंदाची बाब आहे.
कोहलीसारखे खेळाडू अपयशातून कसे बाहेर पडतात?
सध्याचे क्रिकेट पूर्वीपेक्षा खूप व्यग्र झाले आहे. खेळाडू कुठे ना कुठे खेळतच असतो. क्रिकेटपटूच्या शब्दकोशातून विश्रांती हा शब्दच गायब झाला आहे. त्याचा परिणाम क्रिकेटपटूच्या कामगिरीवर होतो. पण, विराट कोहली असा खेळाडू आहे की, फार काळ तो या अपयशाच्या गर्तेत अडकू शकत नाही. अशा खेळाडूंची नैसर्गिक गुणवत्ताच इतकी अफाट असते की, त्यांना एखादी खेळीदेखील यातून बाहेर पडण्यासाठी पुरेशी असते. अशा खेळीसाठी कोहलीसारखे खेळाडू संधी शोधत असतात आणि ती मिळाली की, ते त्याचा फायदा घेतात.
कोहलीच्या अपयशाचा कालावधी लांबला का?
कोहली हा कमालीचे सातत्य राखणारा फलंदाज होता. कोहलीने २०१६ ते २०१८ या कालावधीत १४० डावांत २९ शतके आणि ३२ अर्धशतके झळकावली. त्याची सरासरी ७३.४० इतकी राहिली आणि तीन वर्षांत त्याच्या नावावर ८,१४८ धावा नोंदल्या गेल्या. पण, २०१९पासून कोहलीच्या खेळावर परिणाम होण्यास सुरुवात झाली. जवळपास तीन वर्षे कोहलीच्या बॅटमधून धावांचा ओघ आटला होता. कोहलीच्या अधूनमधून धावा करत असला, तरी त्याचा दरारा दिसून येत नव्हता. कर्णधारपदावरून दूर करण्यात आल्याचाही परिणाम त्याच्या खेळावर निश्चितपणे झाला. यामुळे कोहलीचे फलंदाजीतील अपयश हे लांबले असे म्हणता येईल.
लय मिळवण्यासाठी कोहलीने काय केले प्रयत्न?
कोहलीला धावांसाठी झगडावे लागत होते. त्यामुळे तो संपल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. या चर्चेचे अतिरिक्त दडपण कोहलीवर येऊ लागले. तसेच इतकी वर्षे खेळल्याने त्याचे शरीरही थकले असेल. चाहत्यांच्या अपेक्षेने येणारे मानसिक दडपण हे वेगळेच. या सगळ्यासाठी कोहलीनेच त्यावर उत्तर शोधून काढले आणि आशिया चषक स्पर्धेपूर्वी विश्रांती घेतली. लय परत मिळविण्यासाठी कोहलीने झिम्बाब्वेचा दौरा करावा असे अनेक जणांना वाटत होते, पण कोहलीने मनाचे ऐकले आणि विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे कोहलीला शारीरिक आणि मानसिक बाबींवर काम करता आले.
केवळ मानसिकता राखल्याचाच कोहलीला फायदा झाला का?
मैदानाबाहेरील परिस्थितीचा क्रिकेटपटूच्या खेळावर परिणाम होत असतो. यासाठी खेळाडूची मानसिकता खंबीर असणे खूप महत्त्वाचे असते. अर्थात, हा एक भाग झाला. खेळाडूने मैदानावर धावा करणे किंवा खेळपट्टीवर उभे राहणे हे सर्वांत महत्त्वाचे असते. कोहलीसारखा सातत्याने धावा करणारा फलंदाज अपयशी होतो, तेव्हा मानसिकता ढासळण्याबरोबर त्याच्या तंत्रात काही तरी कमतरता निर्माण होत असते. कोहली सातत्याने एकाच पद्धतीने बाद होत होता. त्याची हालचाल योग्य पद्धतीने होत नव्हती. कोहलीच्याही नजरेतून ही गोष्ट चुकली नाही आणि त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु या आपल्या ‘आयपीएल’ संघाचे प्रशिक्षक संजय बांगर यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. विश्रांतीच्या कालावधीत त्याने मुंबई येथे बांगर यांच्याबरोबर सराव केला. हा सरावदेखील त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला.
कोहलीला सूर गवसल्याचे संकेत कधी मिळाले?
मैदानापासून दूर राहून मिळवलेली मानसिकता, विश्रांती आणि प्रशिक्षकांबरोबरच्या सरावानंतर कोहली आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी सज्ज झाला. या स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध झळकावलेले शतक हे कोहली परतला याची साक्ष देण्यासाठी पुरेसे होते. कोहलीसारखे खेळाडू फार वेळ अपयशाच्या गर्तेत अडकू शकत नाहीत. त्यांना आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी एका खेळीची आवश्यकता असते. आशिया स्पर्धेतील त्या एका खेळीने कोहलीच्या बॅटला जणू धार आली आणि त्याच्या धावा पुन्हा होऊ लागल्या. त्यानंतर विश्वचषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत कोहलीने तीन अर्धशतकी खेळी केल्या आहेत.
कोहलीला या उंचावलेल्या कामगिरीचा किती फायदा होणार?
खंबीर स्वभाव ही कोहलीची खरी ताकद आहे. या ताकदीच्या जोरावर कोहलीने कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० अशा तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे समर्थपणे नेतृत्व केले. नेतृत्वाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर त्याच्याकडून अधिक चांगल्या फलंदाजीची अपेक्षा बाळगली जात होती. मात्र ज्या पद्धतीने कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली, त्यामुळे कोहली दुखावला गेला होता. त्याची मानसिकता ढासळली. पण याच मानसिकतेला खंबीर करून कोहली पुन्हा उभा राहिला आहे. त्याने आपली कामगिरी उंचावली. सातत्याने मोठ्या धावा करण्यास सुरुवात केली. याचा भारतीय संघाला खूप फायदा होतो आहे. त्याने ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये पुन्हा दमदार कामगिरी करण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्येही सातत्याने धावा करण्यास तो उत्सुक असेल.
ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांचा फायदा कितपत?
ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्या आणि सध्याचे वातावरण गोलंदाजीस पोषक असताना कोहलीच्या बॅटमधून धावा बरसत आहेत हे विशेष. याचे आणखी एक कारण म्हणजे कोहलीसारख्या सहसा ‘थ्रू-द-लाइन’ खेळणाऱ्या फलंदाजासाठी चेंडू बॅटवर येणे महत्त्वाचे असते. ऑस्ट्रेलियन ठणठणीत खेळपट्ट्यांवर हे जमून येत आहे. विराट कोहली टी-२० क्रिकेटमध्येही तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जातो. बिनचूक तंत्राला मानसिक कणखरपणाची जोड आणि या दोहोंना साह्यभूत खेळपट्ट्या लाभल्यामुळे या स्पर्धेत कोहली सातत्याने धावा करत आहे. ‘फॉर्म इज टेम्पररी, क्लास इस पर्मनंट’ या वचनाची प्रचीती त्याच्या खेळातून सध्या येत आहे.