इस्रायलने गाझा पट्टीत युद्ध सुरू केल्यापासून दर १५ मिनिटांनी एक या दराने दररोज सरासरी १०० पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू होत आहे. ‘द डिफेन्स फॉर चिल्ड्रेन इंटरनॅशनल – पॅलेस्टाईन’ (डीसीआयपी) या मानवाधिकार संस्थेने यासंबंधी माहिती जाहीर केली आहे. या युद्धामध्ये अक्षरशः नरसंहार पाहायला मिळत असल्याचेही या संस्थेने नमूद केले आहे. युद्ध सुरू झाल्यापासूनच नाही तर जवळपास दोन दशकांपासून येथील मुलांना सामान्य आयुष्य जगायला मिळालेले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामान्य पॅलेस्टिनी मुलांचे आयुष्य कसे आहे?

गाझा पट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांना अतिगर्दी, टंचाई, संघर्ष आणि धोका काही नवीन नाही. ही संकटे येथील पॅलेस्टिनी मुलांच्या पाचवीलाच पुजलेली आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. १८ वर्षांपूर्वी इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान एरियल शेरॉन यांनी गाझा पट्टीतून इस्रायली वसाहती आणि लष्करी जवान हटवले. यातून त्यांनी इस्रायलने गाझा पट्टीवरील आक्रमण मागे घेतले असल्याची अधिकृत भूमिका जाहीर केली. मात्र, दोन वर्षांनंतर हमासच्या निवडीनंतर इस्रायल सरकारने संपूर्ण गाझा पट्टीची नाकेबंदी केली. थोडक्यात सांगायचे तर आजही गाझामधील युवकांना जवळपास संपूर्ण आयुष्य हलाखीच्या परिस्थितीत व्यतीत करावे लागत आहे.

हेही वाचा – आझम खान खोट्या कागदपत्रप्रकरणी दोषी; बनावट जन्मप्रमाणपत्र प्रकरणी कोणती शिक्षा होते ?

युद्धामुळे मुलांवर कोणते संकट ओढवले आहे?

डीसीआयपीने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीनुसार इस्रायल १९४९ च्या जिनिव्हा कराराचे उल्लंघन करत नसल्याचे आढळले आहे. या करारानुसार, युद्धामध्ये मुलांचे संरक्षण केले पाहिजे आणि त्यांना मानवतेने वागवले पाहिजे. सध्याच्या युद्धामध्ये तसे काहीही घडताना दिसत नाही. युद्ध लांबत चालले आहे तसे आता पॅलेस्टिनी लोकांना अन्न, औषधे आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तू मिळणे कठीण झाले आहे. त्यांना पाव आणि दूषित पाण्यावर दिवस काढावे लागत आहेत. त्याचा लहान मुलांवर होणारा परिणाम अधिक गंभीर आहे.

युद्धात रुग्णालयाची अवस्था कशी आहे?

गाझा पट्टीतील रुग्णालयांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असताना आजारी पडणाऱ्या किंवा हवाई हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्या मुलांना तिथेच उपचार घ्यावे लागत आहेत. औषधे आणि योग्य उपचारांअभावी मुलांना दीर्घकालीन अपाय होत आहे किंवा त्यांचा मृत्यू ओढवत आहे. ‘बीबीसी’च्या अहवालानुसार, रुग्णालयात उपचारांसाठी येणाऱ्या युद्ध जखमींपैकी ४० टक्के लहान मुले आहेत. अनेक मुलांचे आई-वडील युद्धामध्ये मारले गेले आहेत आणि मागे केवळ जखमी मुले उरली आहेत.

मुलांवर युद्धाचे काय परिणाम झाले आहेत?

पॅलेस्टाईनमध्ये २००८ पासून तब्बल सहा युद्धे झाली आहेत. प्रत्येक युद्धानंतर गाझा पट्टीतील सर्वसामान्य नागरिकांसाठी नियम अधिक कठोर केले गेले आहेत. त्यामुळे सामान्य पॅलेस्टिनी लोकांची कुचंबणा आणि घुसमट वाढत गेली. त्याचा थेट परिणाम मुलांवर झाला आहे. या युद्धांमुळे मुलांचे जीवन व आरोग्य यांना दीर्घकालीन धोका निर्माण झाला आहे. २००८-०९, २०१२, २०१४, २०२१, २०२२ आणि २०२३ अशा ठराविक अंतराने गाझा पट्टीत युद्ध झाले आहे. सततचे युद्ध, संघर्ष, तणाव आणि अशांतता याचा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. इस्रायलने २००७ मध्ये नाकेबंदी लादल्यापासून सध्याचे युद्ध सुरू होईपर्यंत डीसीआयपीने केलेल्या मोजणीमध्ये इस्रायलच्या लष्करी हल्ल्यांमध्ये गाझामधील एक हजार १८९ पॅलेस्टिनी मुलांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा – विश्लेषण: कौशल्यविकासाच्या गरूडभरारीत दर्जा टिकविण्याचे आव्हान

युद्धाचा पर्यावरणावर काय परिणाम झाला आहे?

२००८-०९ च्या युद्धानंतर संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण उपक्रम संस्थेने केलेल्या पाहणीच्या अहवालात युद्धानंतर उद्ध्वस्त झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यामुळे मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. त्याशिवाय दूषित पाणी, दूषित जमीन, मोठ्या प्रमाणात इमारतींचे ढिगारे, त्यातील उघड्या पडलेल्या धातूंच्या सळ्या या सर्वांमुळे मुलांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे.

गाझा पट्टीत पायाभूत सुविधांची परिस्थिती कशी आहे?

गाझा पट्टीत पायाभूत सुविधा, पिण्याचे स्वच्छ आणि पुरेसे पाणी, सांडपाणी व कचरा विल्हेवाट यंत्रणा या सर्वांचा सातत्यपूर्ण अभाव निर्माण झाला आहे. या पायाभूत सुविधांसाठी भरपूर गुंतवणूक हवी आणि युद्धग्रस्त भागामध्ये सध्या तरी अशी कोणतीही गुंतवणूक दृष्टीक्षेपात नाही. परिणामी राहण्यासाठी अत्यंत अयोग्य परिस्थितीत येथील लोकांना आणि मुलांना राहावे लागते. मुलांसाठी खेळण्याची मैदाने आणि आवश्यक क्रीडा सुविधा तर दूरच राहिल्या. रँड कॉर्पोरेशनने २०१८ मध्ये केलेल्या पाहणीच्या अहवालानुसार, जलजन्य आजार हे मुले आणि नवजात बालकांच्या मृत्यूचे मुख्य कारण आहे.

nima.patil@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How war affects the physical and mental health of children in the gaza strip print exp ssb