फेब्रुवारी २०२२ पासून युक्रेनमध्ये युद्ध भडकले आहे. रशिया आणि युक्रेनमधील हा संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या देशाच्या विध्वंसाच्या प्रतिमा जगाने पाहिल्या आहेत. परंतु असे असूनही, काही लोक युक्रेनला भेट देत आहेत. कारण- त्यांना तेथील परिस्थिती प्रत्यक्षात पाहायची आहे. युद्धग्रस्त भागांना भेट देणाऱ्या पर्यटकांना युद्ध पर्यटक म्हटले जाते. रशियाने बॉम्बफेक केलेल्या किंवा ड्रोनने हल्ला केलेल्या ठिकाणांना भेट देण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करीत आहेत. डार्क टुरिझम म्हणजे काय? युद्धग्रस्त युक्रेनमध्ये पर्यटनात वाढ होण्याचे कारण काय? जगभरात ‘डार्क टुरिझम’चा ट्रेंड वाढण्याचे कारण काय? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

युक्रेनमध्ये पर्यटकांची संख्या वाढण्याचे कारण काय?

‘युक्रेन टुडे’च्या म्हणण्यानुसार, २०२२ मध्ये युक्रेन-रशिया संघर्षाला सुरुवात झाली आणि पर्यटकांची संख्या कमी झाली. परंतु, त्यानंतर ही संख्या पुन्हा वाढली आहे. २०२३ मध्ये जवळपास २.५ दशलक्ष परदेशी नागरिकांनी युक्रेनला भेट दिली. एकट्या या वर्षी जानेवारी ते जुलै या कालावधीत या देशाला १० लाखांहून अधिक परदेशी नागरिकांनी भेट दिल्याची नोंद आहे. त्यापैकी ५,००,००० हून अधिक नागरिक मोल्दोव्हामधून, २,००,००० नागरिक रोमानियामधून आले आणि आणखी १,००,००० नागरिक पोलंडमधून आले. हंगेरी, स्लोव्हाकिया, तुर्की, इस्रायल, अमेरिका, जर्मनी व सीरिया येथील नागरिकांनीही देशाला भेट दिली.

हेही वाचा : हिंदू धर्मगुरूंच्या अटकेनंतर बांगलादेश ‘ISCKON’वर बंदी घालणार का? ‘इस्कॉन’ला लक्ष्य करण्याचे कारण काय?

डार्क टुरिझम

अलीकडे ‘डार्क टुरिझम’चा ट्रेंड वाढला आहे. जेथे लोकांना जीव गमवावा लागला किंवा एखादी दुःखद घटना घडली, अशा ठिकाणी लोकांना भेट द्यायला आवडते. त्यालाच डार्क टुरिझम म्हणून ओळखले जाते. स्पेनमधील २३ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता अल्बर्टो ब्लास्को व्हेंटास यांनी युक्रेनच्या इरपिन ब्रिजची निवड केली. २०२२ मध्ये रशियन सैन्याला रोखण्यासाठी हा पूल उद्ध्वस्त करण्यात आला होता. हा पूल देशाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक हॉट स्पॉट ठरत आहे. लोक सुट्टी व्यतीत करण्याचे ठिकाण म्हणून युक्रेनच्या राजधानीला भेट देत आहेत. या भागात जवळपास दररोज क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ले सुरू आहेत. “युद्ध क्षेत्रात येण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे,” असे व्हेंटास यांनी सांगितले. त्यांनी या भागात आल्यानंतर भीती वाटत असल्याचेही सांगितले.

अलीकडे ‘डार्क टुरिझम’चा ट्रेंड वाढला आहे. जेथे लोकांना जीव गमवावा लागला किंवा एखादी दुःखद घटना घडली, अशा ठिकाणी लोकांना भेट द्यायला आवडते. (छायाचित्र-रॉयटर्स)

अनेक युक्रेनियन कंपन्या डार्क टुरिझमची ऑफर देत आहेत. त्यातीलच एका कंपनीद्वारे अल्बर्टो ब्लास्को व्हेंटास यांनी युक्रेनला भेट देण्यास आल्याचे सांगितले. युक्रेनला जाण्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबाने व्यक्त केलेल्या चिंता दूर केल्या आणि मोल्दोव्हाला जाण्यासाठी ते विमानाने निघाले. त्यानंतर त्यांनी १८ तासांचा रेल्वे प्रवास केला. एका पर्यटकाने प्रत्येक टप्प्याचे चित्रीकरण केले, जे त्याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट करण्याचे ठरवले. त्यांच्या भेटीचे आयोजन करणाऱ्या वॉर टूर्सने सांगितले की, त्यांनी जानेवारीपासून सुमारे ३० पर्यटकांना ‘डार्क टुरिझम’मध्ये सहभागी करून घेतले. प्रामुख्याने युरोपियन आणि अमेरिकन लोक संपूर्ण दौऱ्यासाठी १५७ ते २६२ डॉलर्स यादरम्यान पैसे देतात. नफ्याचा काही भाग सैन्याला दिला जातो. कंपनीचे सह-संस्थापक दिमिट्रो न्याकीफोरोव्ह म्हणाले की, हा उपक्रम पैशासाठी नाही; तर तो युद्धाच्या स्मारकासाठी आहे. कॅपिटल टूर्स कीव या पर्यटन कंपनीचे व्यवस्थापक स्वितोझार मोइसेव्ह म्हणाले की, नफा नगण्य आहे; परंतु भेटींचे शैक्षणिक मूल्य आहे. ते म्हणाले, हे पुन्हा होऊ नये, असा संदेश यातून जातो.

पर्यटनातून आर्थिक फायदा

२०२२ च्या सुरुवातीस रशियन सैन्याकडून हल्ले करण्यात आलेल्या कीव आणि त्याच्या उपनगरांच्या आसपासची ठिकाणे पर्यटकांच्या केंद्रस्थानी आहेत. ‘टाइम्स’ने वृत्त दिले आहे की, रशियाच्या युद्ध गुन्ह्यांच्या ठिकाणांभोवती मार्गदर्शक सहली हा एक मोठा व्यवसाय ठरत आहे. आठवडाभर चालणाऱ्या युद्ध दौऱ्याच्या पॅकेजेसमुळे देशाला मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. टूर मार्गदर्शक स्वेत मोइसेव्ह यांनी ‘कीव इंडिपेंडंट’ला सांगितले की, त्यांनी अलीकडे पर्यटकांची संख्या वाढल्याचे पाहिले आहे. “२१ व्या शतकात हे युद्ध कसे होऊ शकते हे लोकांना समजून घ्यायचे आहे आणि अर्थातच, जे मारले गेले त्यांना श्रद्धांजली वाहायची आहे,” असे मोइसेव्ह म्हणाले. “युक्रेनमधील युद्ध अजूनही चालू आहे हे विसरणाऱ्यांसाठी ही शॉक थेरपी आहे, ” असेही त्यांनी सांगितले. डॅनियल होसी यांनीही इरपिन नदीला भेट दिली. “ तो पूल माझ्यासाठी संस्मरणीय आहे. कारण- मी तो पडताना पाहिला आणि ते मला आठवते. आज मी तिथे आहे,” असे स्कॉट यांनी वृत्तपत्राला सांगितले.

२०२२ च्या सुरुवातीस रशियन सैन्याकडून हल्ले करण्यात आलेल्या कीव आणि त्याच्या उपनगरांच्या आसपासची ठिकाणे पर्यटकांच्या केंद्रस्थानी आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

वाढती अस्वस्थता

पण, प्रत्येक जण आनंदी नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर ‘टाइम्स’ने म्हटले की, युद्ध पर्यटन आणि शोकांतिकेचे व्यापारीकरण याविषयीची अस्वस्थता वाढत आहे. ज्या भागातील रहिवाशांनी आपल्या अनेक गोष्टी गामावल्या आहेत, त्याच भागाचे व्यापारीकरण करून ते नफा कमावत आहेत. एका रहिवाशाने सांगितले की, बूच या ठिकाणाच्या पुनर्बांधणीच्या मदतीची ही रक्कम आहे आणि लोक त्यातून पैसे कमवत असतील, तर ते योग्य नाही. होस्टोमेल रहिवासी सेरी अहीएव यांनी सांगितले की, त्यांना संशय आहे की, काही जण त्यांच्या दुःखाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. “कधी कधी ते यातून पैसे कमावण्यासाठी हेतुपुरस्सर पर्यटक आणतात,” असे त्यांनी ‘कीव इंडिपेंडंट’ला सांगितले. इरपिनमधील स्थानिक नगरसेवक व बूचचे माजी उपमहापौर मिखाइलिना स्कोरीक-शकारीव्स्का यांनी सांगितले की, बहुतेक रहिवासी ‘डार्क टुरिझम’चे समर्थन करतात; परंतु काही लोकांनी याचा उल्लेख ‘रक्ताचा पैसा’ म्हणून केला आहे.

हेही वाचा : नैसर्गिक शेतीसाठी केंद्र सरकारची नवीन योजना; शेतकऱ्यांना कसा फायदा होणार?

“लोकांचा याला विरोध मान्य आहे. हे लोकांचे जीवन, लोकांची घरे आहेत. हे सुट्टी व्यतीत करण्याचे ठिकाण नाही याची जाणीव आहे. काय चालले आहे ते पाहण्यासाठी आणि ते अनुभवण्यासाठी लोक इथे येत आहेत,” असे ‘नॅशनल एजन्सी फॉर टुरिझम डेव्हलपमेंट’च्या प्रमुख मारियाना ओलेस्किव्ह यांनी सांगितले. युद्ध पर्यटनाच्या विकासामुळे अनेक नैतिक प्रश्न निर्माण झाले आहेत; परंतु बाजारपेठ वाढण्यास मदत झाली आहे, असे त्यांनी सांगितले. “आम्ही आता अनेक कारणांमुळे कोणालाही आमंत्रित करीत नाही. कारण- विमा कंपन्या युक्रेनमधील जोखीम कव्हर करत नाहीत,” असेही त्यांनी सांगितले. रशियन आक्रमणामुळे पर्यटन उद्योग त्वरित कोसळला होता; परंतु या वर्षी या क्षेत्राचा महसूल २०२१ पेक्षा जास्त असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. या महसूलवाढीचे कारण म्हणजे युक्रेनियन पुरुषांनी देशांतर्गत सुरू केलेले पर्यटन. कारण- सामान्यतः मार्शल लॉमुळे पुरुषांना देश सोडण्याची परवानगी नाही. युक्रेन आधीच युद्धोत्तर कालावधीसाठी तयारी करीत आहे; ज्यात Airbnb आणि TripAdvisor सोबत करार करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How war tourism is on the rise in ukraine rac