अमोल परांजपे
गाझा पट्टीची तब्बल तीन आठवडे नाकेबंदी केल्यानंतर अखेर इस्रायलने हल्ल्यात जखमी झालेले परदेशी नागरिक किंवा दुहेरी पारपत्र धारक (ड्युएल पासपोर्ट होल्डर्स) आणि विदेशी स्वयंसेवी संस्था तसेच संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना इजिप्तमध्ये येण्याची परवानगी दिली. यामध्ये पश्चिम आशियातील छोटेसे सुलतानी राष्ट्र, कतारने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जे अमेरिका-रशिया-चीनसारख्या बड्या राष्ट्रांना, भारतासारख्या इस्रायल-पॅलेस्टाईनच्या संयुक्त मित्रराष्ट्राला किंवा अगदी संयुक्त राष्ट्रांनाही जमले नाही, ते एका छोट्याशा देशाने कसे घडवून आणले, त्याचे हे विश्लेषण…
वाटाघाटी कुणामध्ये आणि काय झाल्या?
गाझामध्ये जीवनावश्यक मदत पोहोचविण्यासाठी युद्धबंदी करण्यास ठाम नकार देणाऱ्या इस्रायलने अखेर तेथे अडकलेल्या व जखमी असलेल्या परदेशी नागरिकांना इजिप्तमध्ये आश्रय-उपचार घेण्याची परवानगी दिली. इस्रायल-हमास-इजिप्त यांच्यात चाललेल्या दीर्घ वाटाघाटींनंतर मंगळवारी अखेर या तिघांमध्ये करार झाला. त्यानुसार बुधवारी गाझामध्ये अडकलेल्या जखमी परदेशी नागरिकांची पहिली तुकडी इजिप्तमध्ये दाखल झाली. राफा सीमेवरून अत्यंत बारकाईने कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर एकेक करून विस्थापितांना सोडले जात होते. पहिल्या दिवशी ८१ जखमी नागरिक व अत्यंत जखमी लोकांचे नातलग अशा १३० जणांनी इजिप्तमध्ये आश्रय घेतला. आता गुरुवारपासून दररोज १००० प्राधिकृत नागरिकांना युद्धग्रस्त गाझामधून बाहेर पडता येईल. विशेष म्हणजे, हा करार झाल्यानंतर हमासच्या प्रवक्त्याने सुमारे २०० परदेशी ओलिसांची लवकरच सुटका केली जाईल, असेही जाहीर केले आहे. वाटाघाटी यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका कतारने बजावली आहे.
आणखी वाचा-विश्लेषण: निवडणूक रोखे योजनेविषयी आक्षेप काय आहेत? अपारदर्शितेच्या आरोपावर सरकारचे म्हणणे काय?
वाटाघाटींमध्ये कतारची भूमिका काय?
गाझा पट्टीवर ताबा असलेली हमास ही अतिरेकी संघटना व इस्रायलचा सर्वात मोठा पाठीराखा अमेरिका या दोघांशीही कतारचे चांगले संबंध आहेत. पर्शियाच्या आखातामध्ये कतार हा अमेरिकेचा सर्वात जवळचा मित्र मानला जातो. कतारच्या सुलतानी राजवटीचे हमासच्या नेत्यांशीही चांगले संबंध आहेत. या संबंधांमुळेच कतारपासून पाश्चिमात्य राष्ट्रे हातचे राखून मैत्री करत असली, तरी ताज्या घटनेमध्ये या संबंधांचाच फायदा झाल्याचे दिसते. त्यांच्या मध्यस्थीमुळेच अखेर इस्रायल जखमींना गाझाबाहेर जाऊ देण्यास राजी झाला. याचे कारण कतारने मागच्या दाराने इस्रायलबरोबरही संबंध प्रस्थापित केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाटाघाटींसाठीच मोसादचे प्रमुख डेव्हिड बर्नी शनिवार-रविवारी कतारची राजधानी दोहा येथे तळ ठोकून होते.
कतार-हमासचे संबंध कसे आहेत?
गाझा पट्टीवर ताबा असलेल्या व संयुक्त राष्ट्रांनी अतिरेकी संघटना घोषित केलेल्या हमासबरोबर २०१२ साली कतारने राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. इराणचे समर्थन असलेल्या हमासचे एक कार्यालय दोहामध्ये आहे आणि ते आजही सुरू आहे, ही बाब उल्लेखनीय म्हणावी लागेल. गाझामधील ‘सरकारी’ कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा एक हिस्सा कतार अदा करतो. तेथील कुटुंबांना मदत, इंधनाचा खर्च यापोटी महिन्याला सुमारे ३ कोटी डॉलर कतारकडून दिले जात असल्याची आकडेवारी ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिली आहे. एका अर्थी हमासला आर्थिक मदत करणारा कतार यशस्वी वाटाघाटींमुळे पाश्चिमात्य देशांनाही जवळचा वाटू लागल्यास नवल नाही.
आणखी वाचा-हमासच्या हल्ल्यात भारतीय वंशाच्या सैनिकाचा मृत्यू; हॅलेल सोलोमन कोण आहे?
यशस्वी मध्यस्थीचा कतारला फायदा काय?
तेलावर श्रीमंत झालेला कतार गेली अनेक वर्षे अरब राष्ट्रांमध्ये एकाकी पडला होता. ‘अरब स्प्रिंग’ या नावाने प्रसिद्ध झालेल्या अनेक राष्ट्रांमधील बंडांना कतारची चिथावणी असल्याचा आरोप झाला. त्यामुळे २०१७मध्ये सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि इजिप्त या तीन बड्या राष्ट्रांनी कतारशी संबंध तोडले. आता पुन्हा या देशांचे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले असले, तरी कटुता कायम आहे. ताज्या वाटाघाटींमुळे ही कटुता कमी होण्यास मदत होऊ शकेल. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे इस्रायल-हमास संघर्षातून मार्ग काढायचा असेल, तर कतारला विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे अधोरेखित झाले आहे. परदेशी नागरिकांच्या, कदाचित ओलिसांच्याही सुटकेसाठी यशस्वी प्रयत्न केल्यामुळे अमेरिकेमध्ये कतारचे वजन वाढले आहे. दोन दगडांवर पाय ठेवण्याचा कधीकधी फायदा होतो तो असा…
amol.paranjpe@expressindia.com