– भक्ती बिसुरे

कोव्हॅक्सिन या लशीची उत्पादक कंपनी असलेली भारत बायोटेक, करोना प्रतिबंधात्मक लस नाकावाटे फवारण्याच्या स्वरूपात आणण्यासाठी वेगवान प्रयत्न करत आहे. त्याबरोबरच आता करोना संसर्गावर उपचारांसाठी नाकामध्ये फवारण्यायोग्य पहिले औषधही भारतात उपलब्ध झाले आहे. ग्लेनमार्क या औषध उत्पादक कंपनीतर्फे भारतात उपलब्ध करून देण्यात आलेल्या या स्प्रेचे नाव नायट्रिक ऑक्साइड नेझल स्प्रे – फॅबिस्प्रे असे आहे.

नाकावाटे फवाऱ्याची लस

करोना प्रतिबंधासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लसनिर्मिती आणि त्यासाठीचे संशोधन यावर जगभर काम सुरू झाले. इंजेक्शनद्वारे देण्याच्या लशींबरोबरच नाकातून फवाऱ्याच्या स्वरूपात देण्याच्या लशी हा या संशोधनाचा एक प्रमुख पैलू राहिला आहे. हैदराबादस्थित भारत बायोटेक ही कंपनी नाकाद्वारे देण्याच्या लशीबाबत करत असलेले संशोधन अंतिम टप्प्यात आहे. करोना संसर्ग हा प्रामुख्याने श्वसनसंस्थेशी निगडित संसर्ग आहे. इंजेक्शनद्वारे टोचलेल्या लशीमधून पुरेशी रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली, तरी संसर्गाला प्रतिबंध करण्यात तेवढी प्रभावी ठरत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नाकातून दिली जाणारी लस महत्त्वाची आहे. फवारा (स्प्रे) स्वरूपात ही लस दिली जाणार असल्याने नाकपुड्या, श्वसन नलिका, फुप्फुसे यांमध्ये ती आपला प्रभाव निर्माण करणार आहे. करोनाचा संसर्ग हा नाकावाटे विषाणूशी संपर्क आल्याने होणारा संसर्ग असल्याने ही लस इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱ्या लशीच्या तुलनेत अधिक परिणामकारक ठरणार आहे. भारत बायोटेककडून आतापर्यंत करण्यात आलेल्या नाकातून घेण्याच्या लशीच्या चाचण्यांमधून या लशीचे कोणतेही दुष्परिणाम आढळलेले नाहीत.

आणि आता नाकावाटे औषधही…

एका बाजूला भारत बायोटेक ही भारतातील कोव्हॅक्सिन लशीची उत्पादक कंपनी सध्या करोना प्रतिबंधात्मक नाकातून देण्याच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करत आहे. त्याच वेळी ग्लेनमार्क या औषध उत्पादक कंपनीने फॅबिस्प्रे या नावाचे करोनावरील औषध बाजारात आणले आहे. हे औषध नाकामध्ये फवारण्याच्या स्प्रे स्वरूपात असून तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये पहिल्या २४ तासांमध्ये तब्बल ९४ टक्के तर ४८ तासांमध्ये ९९ टक्के एवढा विषाणूचा प्रभाव कमी करण्यात त्याला यश आले आहे. नायट्रिक ऑक्साइड नेझल स्प्रे असे या औषधाचे नाव असून फॅबिस्प्रे या नावाने त्याची विक्री करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रतिबंध आणि उपचार अशा दोन्हींसाठी लवकरच नाकामध्ये फवारण्याच्या स्प्रे स्वरूपातील उत्पादने भारतात उपलब्ध होणार आहेत.

स्प्रे कुणासाठी?

औषध उपचारांसाठी तयार करण्यात आलेला फॅबिस्प्रे हा प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये वापरण्यात येईल. ज्या रुग्णांमध्ये करोना संसर्गामुळे इतर गुंतागुंत ओढवण्याची शक्यता आहे, अशा जोखीम गटातील रुग्णांसाठी या औषधाचा वापर होईल. संसर्ग झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात श्वसनमार्गाच्या वरच्या भागातच विषाणूंचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी हा स्प्रे उपयुक्त ठरणार असल्याचे चाचण्यांमधून स्पष्ट झाले आहे. हा स्प्रे विषाणूच्या वाढीच्या मार्गात रासायनिक अडथळा निर्माण करेल, त्यामुळे त्याची वाढ थांबेल आणि फुप्फुसांमध्ये संसर्ग बळावण्याची शक्यता कमी होईल, असा दावा उत्पादक कंपनीकडून करण्यात आला आहे. या औषधाच्या उत्पादन आणि विक्रीसाठी केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाची मान्यताही ग्लेनमार्कला मिळाली आहे. या औषधाच्या अमेरिकेतील यूटा विद्यापीठात झालेल्या चाचण्यांतील निष्कर्षांनुसार अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि एप्सिलॉन या उपप्रकारांवर हा स्प्रे प्रभावी ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नाकामध्ये फवाऱ्याचे महत्त्व काय?

करोना संसर्ग हा प्रामुख्याने श्वसनसंस्थेशी निगडित संसर्ग आहे. इंजेक्शनद्वारे टोचलेल्या लशीमधून पुरेशी रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली, तरी संसर्गाला प्रतिबंध करण्यात ती लस तेवढी प्रभावी ठरत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नाकातून दिली जाणारी लस किंवा औषध हे महत्त्वाचे आहे. फवारा (स्प्रे) स्वरूपातील लस ही नाकपुड्या, श्वसन नलिका, फुप्फुसे यांमध्ये आपला प्रभाव निर्माण करणार आहे. त्याचप्रमाणे हे औषधही विषाणूंना नाकातच मारण्यात प्रभावी ठरेल, त्यामुळे ते विषाणू फुप्फुसांपर्यंत प्रभाव निर्माण करू शकणार नाहीत. त्यामुळेच प्रतिबंध असो की उपचार, नाकावाटे फवाऱ्याचा वापर परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे.

bhakti.bisure@expressindia.com

Story img Loader