देशातील यंदाचा साखर हंगाम नोव्हेंबर मध्यापासून सुरू होणार आहे. यावेळचा हंगाम कसा असेल, किती टन गाळप होईल, किती साखर उत्पादन होईल या सगळ्या मुद्द्यांचा आढावा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशातील साखर हंगाम कधी सुरू होणार?

उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक ही देशातील प्रमुख साखर उत्पादक राज्ये आहेत. कर्नाटक, महाराष्ट्रातील यंदाचा साखरेचा गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपासून होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने अद्याप घोषणा केलेली नाही, तरीही दिवाळीनंतरच हंगाम सुरू होण्याचा अंदाज आहे. गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्राने साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. त्याआधी उत्तर प्रदेश आघाडीवर होता. कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात, तमिळनाडू, बिहार, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल आदी राज्यांतही साखर कारखाने असले तरी एकूण उत्पादनात त्यांचा वाटा अल्प आहे.

गाळपासाठी किती ऊस उपलब्ध?

देशात २०२२- २३ च्या पावसाळ्यात मोसमी पाऊस जेमतेम झाला होता. त्यामुळे २०२३ मध्ये ऊस लागवडीखालील क्षेत्रात घट झाली होती. गेल्या वर्षी लागवड केलेला ऊस यंदा गाळपासाठी तयार झाला आहे. लागवड कमी झाल्यामुळे गाळपासाठी उसाची उपलब्धताही कमी आहे. गेल्या वर्षी सुमारे ५९.४४ लाख हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होता. यंदा सुमारे ५६.०४ लाख हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. उत्तर प्रदेशात २३.३२ लाख हेक्टर, महाराष्ट्र १३.१० लाख हेक्टर, कर्नाटक ६.२० लाख हेक्टर, तमिळनाडू २ लाख हेक्टर, गुजरात २.३१ लाख हेक्टर आणि देशाच्या उर्वरित राज्यात ९.९५ लाख हेक्टर, असे एकूण ५६.०८ लाख हेक्टरवरील उसाचा गाळप होणार आहे.

हेही वाचा : स्टार्ट-अप्ससाठी रतन टाटा नेहमीच कसे ठरले ‘देवदूत’?

एकूण किती साखरेचे उत्पादन होईल?

अमेरिकेच्या कृषी विभागाच्या (यूएसडीए) परराष्ट्र सेवा विभागाने भारतात २०२४-२५ मध्ये इथेनॉलकडे साखर वळविण्यापूर्वी एकूण ३५५ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. इंडियन शुगर मिल्स अॅण्ड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चर्स असोसिएसनने (इस्मा) देशात यंदाच्या गळीत हंगामात एकूण साखर उत्पादन ३३३ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे. याशिवाय साखर उद्याोगातील जाणकार देशात यंदा ३४० लाख टनांपर्यंत साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त करीत आहेत. राज्यनिहाय विचार करता उत्तर प्रदेशात ११३, महाराष्ट्रात १११, कर्नाटकात ५६.११, तमिळनाडूत ८.८४, गुजरातमध्ये ९.९८ आणि देशाच्या उर्वरित राज्यांत ३३.७५ लाख टन, असे एकूण ३३३ लाख टन उत्पादनाचा अंदाज आहे.

दमदार पावसाळ्यामुळे हंगाम दमदार?

यंदा सरासरीच्या तुलनेत कमी क्षेत्रावरील ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. तरीही पावसाळ्यातील चारही महिन्यांत देशात सर्वदूर चांगली पर्जन्यवृष्टी झाली आहे. त्यामुळे उसाच्या वाढीसाठी चांगले वातावरण मिळाले, सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता चांगली राहिली. देशाच्या विविध भागांत पूरस्थिती निर्माण झाली असली तरीही उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटकात पूरस्थिती नव्हती. त्यामुळे नदीकाठांवरील उसाचे फार नुकसान झाले नाही. कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थिती होती. पण, पाणी फार काळ शेतात थांबून राहिले नाही. त्यामुळे ऊस पिकांचे फार नुकसान झाले नाही. महाराष्ट्राचा विचार करता सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड परिसरातही चांगला आणि संततधार पाऊस झाला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्वच भागात प्रतिहेक्टरी ऊस उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज आहे. हंगाम सुमारे पंधरा दिवस उशिराने सुरू होणार आहे. त्यामुळे साखर उताराही सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा : Ratan Tata And Indica : रतन टाटांची इंडिका: भारतीय बनावटीची पहिली यशस्वी कार टाटांनी कशी घडवली?

महाराष्ट्रातील साखर हंगाम कसा असेल?

राज्यात यंदा साखर उत्पादनात सुमारे दहा लाख टनांनी घट होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी ११० लाख साखर उत्पादन झाले होते. यंदा ९० ते १०२ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी सुमारे सात लाख टन साखरेचा वापर इथेनॉल उत्पादनासाठी करण्यात आला होता, तर ११० लाख साखर उत्पादन झाले होते. यंदा १२ लाख टन साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्यात येणार असून, निव्वळ साखर उत्पादन ९० ते १०२ लाख टन होण्याचा अंदाज आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, राज्यात यंदा ११.६७ लाख हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. सरासरी प्रतिहेक्टर ८६ टन उत्पादनाचा अंदाज आहे. लागवड, चारा, गुऱ्हाळघरे आणि रसवंतीसाठी उपयोग होणारा ऊस वगळून एकूण ९०४ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल. सरासरी ११.३० टक्के उतारा मिळून एकूण १०२ लाख टन साखर उत्पादन होईल. त्यापैकी १२ लाख टन साखरेचा वापर इथेनॉलसाठी होईल आणि निव्वळ साखर उत्पादन ९० लाख टन होईल. मिटकॉन या संस्थेने १०२ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे.
dattatray.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How will be the upcoming sugar production season in india print exp css