-मंगल हनवते
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दक्षिण मुंबईतून पारबंदरला (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) पोहोचणे सोपे व्हावे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतून थेट शिवडीला, सागरी सेतूच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचता येणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला आता वेग देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर हा प्रकल्प नेमका कसा आहे, त्यामुळे मुंबईकरांना कसा दिलासा मिळणार आहे याचा आढावा…
मुंबई पारबंदर प्रकल्प आहे काय?
मुंबई ते नवी मुंबई अंतर केवळ २० ते २५ मिनिटांत पार करता यावे यासाठी २२ किमीचा मुंबई पारबंदर प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या कामास २०१८ मध्ये सुरुवात झाली असून त्यासाठी १७ हजार ८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करून हा प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. आतापर्यंत प्रकल्पाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामाला एमएमआरडीएने वेग दिला आहे. या सागरी मार्गापर्यंत पोहोचणे सोपे व्हावे यासाठी एमएमआरडीएने शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. हे दोन्ही प्रकल्प एकाच वेळी पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.
उन्नत रस्त्याची गरज का?
मुंबई ते नवी मुंबई प्रवास अतिजलद करण्यासाठी शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू बांधण्यात येत आहे. त्यामुळे नवी मुंबईतून मुंबईत, शिवडीपर्यंत वाहतुकीचा वेग वाढेल. त्यानंतर वरळी, नरिमन पॉईंट अशा ठिकाणी जाणाऱ्या वाहनांची गर्दी विविध भागांत होईल. दुसरीकडे दक्षिण मुंबईतून सागरी सेतूपर्यंत पोहोचणाऱ्या वाहनांनाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेच्या सागरी किनारा मार्गाशीही जोडला जाणार आहे. त्यामुळे नरिमन पॉईंटपासून सागरी सेतूपर्यंत पोहोचण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्प कसा आहे?
शिवडी-वरळी उन्नत रस्ता प्रकल्प ४.५ किमीचा असून त्याची रुंदी १७ मीटर आहे. शिवडी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडून सुरू होऊन हार्बर रेल्वे मार्ग पार करून आचार्य दोंदे मार्ग, डॉ. आंबेडकर मार्ग, प्रभादेवी रेल्वे स्थानकाजवळील मध्य आणि पश्चिम मार्ग, सेनापती बापट मार्ग, जगनाथ भातणकर मार्ग, कामगार नगर १ आणि २, ॲनी बेझंट मार्ग पार करून नारायण हर्डीकर मार्ग येथे संपणार आहे. हा मार्ग जमिनीपासून १५ ते २७ मीटर इतका उंच आहे. प्रकल्पाच्या कामासाठी १०५१.८६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जानेवारी २०२१ मध्ये उन्नत रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून मे. जे. कुमार या कंत्राटदाराच्या माध्यमातून काम सुरू आहे. त्यात प्रभादेवी आणि शिवडी रेल्वे स्थानकावरील ओलांडणी पुलाचाही समावेश आहे. प्रभादेवी येथील रेल्वे ओलांडणी पूल द्विस्तरीय असेल तर या पुलाचे बांधकाम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून केली जाणार आहे. तसेच या उन्नत रस्त्याच्या कामात एक हजारहून अधिक रहिवासी बाधित होणार आहेत.
आतापर्यंत किती काम पूर्ण?
या प्रकल्पाचे काम पावणेदोन वर्षांपूर्वी सुरू झाले आहे. आतापर्यंत बऱ्यापैकी काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक आणि आर्थिक अडचणींमुळे प्रकल्प वेग घेऊ शकला नाही. आता या प्रकल्पाच्या कामाला वेग देणे गरजेचे आहे. सागरी मार्ग डिसेंबर २०२३मध्ये पूर्ण होणार असून त्यामुळे या दरम्यान प्रकल्प पूर्ण करण्याचे आवाहन एमएमआरडीएसमोर आहे. त्यामुळे आता कामाला वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत २८.८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. दरम्यान या प्रकल्पात भूसंपादनाचा मोठा प्रश्न होता. प्रकल्पासाठी ८५० झोपड्या हटविण्यासह आणि १९ इमारतींच्या पुनर्वसनाचेही आव्हान होते. ही दोन्ही आव्हाने एमएमआरडीएने यशस्वीपणे पेलली आहेत. झोपड्या हटवून जागा संपादित केली आहे तर १९ इमारतींच्या पुनर्वसनासाठी ४०० कोटींच्या खर्चाचा प्रश्नही मार्गी लावला आहे. पालिका आणि एमएमआरडीए ५०-५० टक्के खर्च करणार आहेत. एकूणच प्रकल्पातील अडचणी दूर झाल्याने कामानेही वेग घेतला आहे.
प्रकल्प कधी पूर्ण होणार?
सागरी सेतू डिसेंबर २०२३मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सागरी सेतू सेवेत दाखल होण्यापूर्वी रस्ता पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र डिसेंबर २०२३ पर्यंत रस्ता पूर्ण होणे शक्य नसल्याने जानेवारी २०२४ चा मुहूर्त एमएमआरडीएकडून सांगितला जात आहे. त्यानुसार २०२४मध्ये हा रस्ता सेवेत दाखल होणे अपेक्षित आहे.