महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात दहावीचा टप्पा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ म्हणजेच यंदाची अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी असेल, किती फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया होईल, अर्ज कसा भरावा, या अर्जात कोणकोणत्या गोष्टी नमूद करायच्या आहेत, महाविद्यालयांची निवड कशी करावी आदी बाबींचा आढावा.
प्रवेश प्रक्रियेची कार्यपद्धती कशी असेल?
विद्यार्थ्यांना केंद्रीय प्रवेश फेऱ्यांद्वारे किंवा विविध कोट्याअंतर्गत राखीव जागांवर संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधून, अशा दोन पद्धतीने प्रवेश घेता येईल. प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी वैयक्तिक माहिती असणारा ऑनलाइन अर्जाचा भाग १ भरून तो प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्येक केंद्रीय प्रवेश फेरीपूर्वी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे पसंतीक्रम अर्जाच्या दुसऱ्या भागात (भाग २) भरायचे आहेत. किमान १ व कमाल १० महाविद्यालयांचे पसंतीक्रम देणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांनी दिलेला पसंतीक्रम आणि आलेल्या अर्जातील गुणक्रमानुसार विद्यार्थ्यांना महाविद्यालय (अलॉटमेंट) देण्यात येईल. त्यानुसार विद्यार्थ्यांनी संबंधित मिळालेल्या महाविद्यालयाशी संपर्क साधून आपला प्रवेश दिलेल्या वेळेत निश्चित करायचा आहे. कोट्यातून प्रवेश घ्यायचा असल्यास संबंधित महाविद्यालयातील जागेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा ही विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिनमध्ये देण्यात येईल.
हेही वाचा >>>विश्लेषण: पॅलेस्टाइनला स्पेन, आयर्लंड, नॉर्वेची मान्यता किती महत्त्वाची?
किती प्रवेश फेऱ्या होणार?
यंदा तीन नियमित केंद्रीय प्रवेश फेऱ्या, दोन विशेष केंद्रीय प्रवेश फेऱ्या होणार आहेत. दुसऱ्या विशेष केंद्रीय प्रवेश फेरीत फेरपरीक्षा देऊन उत्तीर्ण झालेल्या (एटीकेटी) विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. त्यानंतरही जर काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही तर मात्र, विशेष आणि दैनिक गुणवत्ता फेऱ्या होतील. यंदा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (एफसीएफएस) ही फेरी होणार नाही. प्रत्येक नियमित फेरीबरोबरच विविध कोट्यांतील प्रवेश प्रक्रिया समांतर सुरू राहणार आहे.
ऑनलाइन अर्ज भरण्याचे टप्पे कसे?
विद्यार्थ्यांनी आपले शहर निवडून https://11thadmission.org.in या संकेतस्थळावरून ऑनलाइन नोंदणी करून लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करायचा आहे. त्यानंतर वैयक्तिक माहिती असणारा अर्जाचा भाग १ भरून झाल्यानंतर आपली माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शन केंद्राकडून अर्ज प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे. महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरून प्रवेश फेरीपूर्वी प्रवेशासाठी पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये ऑनलाइन निवडावी लागतील.
हेही वाचा >>>विश्लेषण : सेन्सेक्स @ ७५०००…शेअर बाजारात तेजीचा हा जोश कुठवर टिकणार?
प्रवेश प्रक्रियेचा कालावधी किती?
अकरावी केंद्रीय प्रवेश अर्जाचा पहिला भाग, शुक्रवार, २४ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ते राज्य मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत ऑनलाइन भरायचा आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यापासून पुढील साधारण पाच दिवस महाविद्यालय पसंतीक्रम असणारा अर्जाचा भाग २ भरता येणार आहे. अर्जाचा भाग २ हा प्रत्येक फेरीपूर्वी भरता येईल. विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यापासून ते प्रवेश निश्चित होईपर्यंतची पहिल्या नियमित केंद्रीय प्रवेश फेरीअंतर्गतची प्रक्रिया ही राज्य मंडळाच्या निकालानंतर १० ते १५ दिवस सुरू राहील. दुसरी व तिसरी नियमित केंद्रीय प्रवेश फेरी, तसेच पहिली विशेष केंद्रीय प्रवेश फेरीची प्रक्रिया ही ७ ते ८ दिवस सुरू राहील. दुसऱ्या विशेष केंद्रीय प्रवेश फेरीची प्रक्रिया एक आठवडा सुरू राहील.
महाविद्यालयाची निवड कशी करावी?
महाविद्यालय पसंतीक्रम भरताना म्हणजेच अर्जाचा भाग २ भरताना अनेक विद्यार्थी हे आपल्या टक्केवारीचा विचार न करता, नामांकित महाविद्यालयांची निवड करतात. तर काही विद्यार्थी हे संबंधित महाविद्यालयांची विविध क्षेत्रातील कामगिरी व आपली आवड लक्षात घेऊन निवड करतात. परंतु विद्यार्थ्यांचे गुण आणि संबंधित कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये मोठी तफावत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळू शकत नाही. परिणामी अनेकदा चांगले गुण असूनही शेवटच्या फेरीपर्यंत पसंतीचे महाविद्यालय न मिळाल्यामुळे विद्यार्थी गोंधळून जातात. त्यामुळे आपल्याला मिळालेले गुण व संबंधित महाविद्यालयातील गतवर्षीचे प्रवेश पात्रता गुण याची सांगड घालूनच महाविद्यालयाचा पसंतीक्रम द्यावा. तसेच पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाल्यास तेथे प्रवेश घेणे बंधनकारक असते. अन्यथा नियमित प्रवेश फेऱ्यांतून बाहेर पडावे लागते. त्याचाही विचार पसंतीक्रम देण्यापूर्वी करणे आवश्यक आहे.
यंदा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य फेरी होणार का?
विविध फेऱ्यांनंतरही बहुसंख्य विद्यार्थी हे अकरावी प्रवेशापासून वंचित राहतात. दरम्यान, पदविका व इतर प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी प्रवेश निश्चित न झाल्यास अनेक विद्यार्थी हे एक पर्याय म्हणून अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश फेरीअंतर्गत कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेसाठी नावनोंदणी करून ठेवतात. त्यातील अनेक विद्यार्थ्यांना केंद्रीय फेरीत महाविद्यालयही मिळते. परंतु याव्यतिरिक्त अभ्यासक्रमांसाठी प्रवेश निश्चित झाल्यावर विद्यार्थी कला, वाणिज्य किंवा विज्ञान शाखेसाठी महाविद्यालयांत मिळालेला प्रवेश रद्द करतात. त्यामुळे महाविद्यालयांतील अनेक जागा या रिक्त राहतात. या पार्श्वभूमीवर काही कारणास्तव अकरावी प्रवेशापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (एफसीएफएस) ही फेरी घेण्यात येत होती. मात्र, अगदी सप्टेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरूच असते. त्याचप्रमाणे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर शेवटच्या टप्प्यांत घेण्यात येणाऱ्या प्रवेश फेऱ्यांमध्ये अनेक गैरप्रकार होतात, अशा तक्रारीही शिक्षण विभागाकडे आल्या होत्या. त्यामुळे यंदा ही फेरी रद्द करून दैनंदिन गुणवत्ता फेऱ्या आवश्यकतेनुसार घेण्याचे शिक्षण विभागाच्या विचाराधीन आहे. मात्र, त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही, असे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.