मुंबई-अहमदाबाद तसेच मुंबई-नाशिक या दोन्ही महत्त्वाच्या महामार्गांसाठी जोडरस्ता ठरत असल्याने घोडबंदर मार्गावरील वाहतूक दिवसागणिक वाढू लागली आहे. शिवाय या मार्गाच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणावर नागरी वसाहती उभ्या रहात असल्याने ठाण्यातील अंतर्गत वाहतुकीचा भारही या रस्त्यावर आहेच. वडाळा-घाटकोपर-कासारवडवली-गायमुख या मार्गावर मेट्रो मार्ग सुरू झाल्यावर घोडबंदरवर असलेला वाहनांचा भार कमी होईल असे ठामपणे कुणालाही सांगत येत नाही. या पार्श्वभूमीवर कोंडीग्रस्त घोडबंदरला पर्यायी रस्ता म्हणून खारेगाव ते गायमुख असा खाडी किनारी मार्ग उभारणीसाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. या नव्या मार्गामुळे ठाणे आणि घोडबंदर भागातील महामार्गांवरील अवजड वाहनांचा भार कमी होऊ शकेल असा दावा केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकल्पाची आवश्यकता का आहे ?

घोडबंदर भागातून मुंबई-अहमदाबाद महामार्ग जातो. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. या परिसरात गेल्या काही वर्षांत मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. येथील नागरिकांचीही घोडबंदर मार्गेच वाहतूक सुरू असते. यामुळे या मार्गावर कोंडी वाढली आहे. ही समस्या सोडविण्यासाठी घोडबंदरला पर्यायी असा ठाणे खाडीकिनारी मार्ग उभारण्यात येणार आहे. खारेगाव ते गायमुख असा १३ किमी लांबीचा खाडीकिनारी मार्ग उभारण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पाची उभारणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत केली जात आहे. ठाणे महापालिकेने प्रकल्पाचे आराखडे तयार करून एमएमआरडीएला सादर केले. या प्रस्तावास २०२१ मध्ये प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पासाठी १३१६.१८ कोटी रुपये इतका खर्च गृहीत धरण्यात आला होता. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराने आराखडा सादर केल्यानंतर या खर्चात दुपटीने वाढ झाली आहे. ठाणे खाडी किनारा रस्ता प्रकल्पासाठी २६७४ कोटी रुपये इतका निधी लागणार आहे. या प्रकल्पाच्या सुधारित खर्चाच्या प्रस्तावास ‘एमएमआरडीए’च्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

हेही वाचा – विश्लेषण: राष्ट्रीय हळद मंडळ का आणि कशासाठी?

प्रकल्पाची सद्यःस्थिती काय आहे?

या प्रकल्पासाठी भूसंपादन कार्यवाही तसेच पर्यावरणविषयक मंजुरी घेण्याचे निर्देश एमएमआरडीएने ठाणे महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिकेने या विभागांकडून आवश्यक मंजुरी घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रकल्पासाठी भूसंपादनही सुरू केले आहे. या मार्गातील कांदळवन क्षेत्रात बाधित होणाऱ्या वन जमिनीच्या बदल्यात वनविभागाला पर्यायी १५ हेक्टर इतकी जागा हस्तांतरित करावी लागणार आहे. त्यासाठी महापालिकेने जागेचा शोध सुरू केला होता. सुरुवातीला गडचिरोली आणि नंतर सातारा येथील जमिनीचा पर्याय शोधण्यात आला होता. परंतु वनविभागाने तेथील जागा नाकारली. अखेर चंद्रपुर जिल्ह्यात वनविभागाला जागा देण्याचे निश्चित झाले असून ही जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू आहे. या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्याच्या सागरी हद्द नियमन क्षेत्र प्राधिकरणाची (सीआरझेड) मंजुरी आवश्यक आहे. राज्याच्या सागरी हद्द नियमन क्षेत्र प्राधिकरणाकडून या मार्गाच्या उभारणीसाठी मंजुरी मिळालेली आहे. केंद्राच्या सागरी हद्द नियमन क्षेत्र प्राधिकरणाची मंजुरी मिळवण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.

कसा असेल हा मार्ग?

खारेगाव-गायमुख ठाणे खाडी किनारा मार्ग १३.१४ किमी लांबीचा आहे. या मार्गावर एकूण सहा मार्गिका असून ४०/४५ मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी २६७४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एक उड्डाणपूल, एक भुयारी मार्ग, ३ किमीचा स्टील्ट रस्ता असे प्रकल्पाचे स्वरूप आहे. खारेगाव येथून हा रस्ता सुरू होऊन तो गायमुख येथे संपेल. बाळकुम, कोलशेत, वाघबीळ, ओवळा, कासारवडवली, मोघरपाडा येथून हा मार्ग जाईल. या प्रकल्पासाठी ५,८९,१५२.७० चौरस मीटर क्षेत्र संपादित करण्याची गरज आहे. खाडीकिनारी मार्ग आता खारेगाव आणि बाळकुम येथील जुना आग्रा रस्त्याला जोडून तेथे जंक्शन तयार करण्यात येणार आहे. यासंबंधीचा सविस्तर आराखडा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तयार केला आहे. रस्ता आणि जंक्शन तयार करण्यासाठी महापालिकेने येथील जमिनीचे आरक्षण बदल्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यानुसार खारेगाव येथील रस्ते आणि जंक्शन कामात एकूण २२१३२.२२ चौ.मी क्षेत्र बाधित होणार आहे. तसेच बाळकुम येथील येथील रस्ते आणि जंक्शन कामात ११९६० चौ.मी क्षेत्र बाधित होणार आहे. याठिकाणी बगीचा, रहिवास विभाग, नाला, एमसीजीएम वाहिनी आणि एचसीएमटीआर कारशेड असे जागेचे आरक्षण आहे. या दोन्ही ठिकाणचे आरक्षण बदलून त्याठिकाणी पूल आणि रस्ते असे नवे आरक्षण अस्तित्वात येईल.

हेही वाचा – विश्लेषण : रिअल टाइम अपडेट, संवाद आणि बरेच काही… अद्ययावत चॅटजीपीटी किती उपयुक्त?

मार्गाचा फायदा कसा होईल?

घोडबंदर येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. खाडीकिनारी मार्गाची उभारणी झाल्यावर मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अवजड वाहनांचा भार कमी होईल. मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव येथून माजिवाडामार्गे घोडबंदरच्या दिशेने अवजड वाहतूक सुरू असते. खाडी किनारी मार्ग खारेगाव येथून सुरू होणार असून त्याठिकाणी जंक्शनची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे माजिवाडा, कापुरबावडी भागातील कोंडी कमी होणार आहे. शिवाय, खारेगाव येथून माजिवाडामार्गे कापुरबावडी येथून बाळकुम येथील जुना आग्रा रस्त्याने अवजड वाहतूक सुरू असते. त्यामुळे कोंडी होते. ही कोंडीदेखील कमी होईल. मुंबई-नाशिक महामार्गावरून भिवंडी-चिचोटी मार्गे गुजरातच्या दिशेने सुरू असलेल्या अवजड वाहनांना खारेगाव आणि बाळकुम येथून खाडीकिनारी मार्गे वाहतूक करणे शक्य होणार असून यामुळे भिवंडी शहरातील अवजड वाहतुकीचा भार कमी होण्याची शक्यता आहे. भिवंडी शहरासाठीसुद्धा हा मार्ग फायदेशीर ठरणार आहे.