आजकाल प्रत्येकजण आपण कसं दिसतो, याची काळजी घेताना दिसतात. त्यासाठी अनेक जण जिमिंग, योगासने आणि अनेक किलोमीटर धावायला जातात. अनेकांना व्यायामाचा कंटाळाही येतो. रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करणे किंवा धावायला जाणे, प्रत्येकाच्या गणितात बसत नाही. व्यायाम न करता अन् धावायला न जाता फिट राहण्याची जादू आपल्याकडेही असावी असे अनेकांना वाटते. खरं तर धावणे हा अगदी सोयीस्कर व्यायाम आहे, असे म्हणता येईल. त्यात जास्त उपकरणांची आवश्यकता नसते आणि एकूणच आरोग्यही सुधारते. परंतु, खरे सांगायचे तर काही लोकांसाठी विशेषत: एखादा आजार किंवा एखादी आरोग्याची समस्या असणार्यांसाठी धावायला जाणेही शक्य नाही. त्याच पार्श्वभूमीवर डेन्मार्कमधील संशोधकांनी एक नवीन गोळी तयार केल्याचा दावा केला आहे, या गोळीच्या सेवनाने स्नायुंची हालचाल न करताच शरीरात व्यायामाद्वारे मिळणारे फायदे आणि परिणाम दिसून येतील. संशोधकांच्या अभ्यासात काय? ही गोळी शरीरावर नक्की कसे कार्य करते? जाणून घेऊ.
अभ्यास काय सांगतो?
‘जर्नल ऑफ ॲग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्री’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जलद आणि लांब अंतर चालल्यावर शरीरावर जो सकारात्मक परिणाम होतो, तोच परिणाम नवीन औषधाच्या सेवनानेदेखील होतो. या नवीन गोळीचे नाव आहे ‘लेक’. प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या प्रयोगात या गोळीने उंदरांमधील विष काढून त्यांच्या हृदयाला बळकटी देण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले आहे. “आम्ही एक असे औषध तयार केले आहे, जे शरीरावर व्यायामाच्या आणि उपवासाच्या परिणामासारखेच परिणाम देऊ शकतात,” असे संशोधनाचे नेतृत्व करणारे आरहस विद्यापीठातील केमिस्ट डॉ. थॉमस पॉल्सेन म्हणाले.
हेही वाचा : अणुबॉम्बचा स्फोट होतो तेव्हा नक्की काय होते? आण्विक स्फोटाचे परिणाम किती भीषण असतात?
थॉमस पॉलसेन, फॉरेन्सिक मेडिसिन विभागातील प्राध्यापक मोगेन्स जोहानसेन आणि प्राध्यापक नील्स मोलर, क्लिनिकल मेडिसिन आणि स्टेनो डायबिटीज सेंटर, आरहस विभागातील मुख्य चिकित्सक या सर्वांनी अनेक वर्षे यावर संशोधन करून ‘लेके’ हे औषध तयार केले आहे. प्रत्येकाने याचा वेगवेगळ्या कोनातून अभ्यास केला आहे आणि त्या सर्वांना त्यांच्या स्वतःच्या आणि इतर संशोधनाच्या आधारे लैक्टेट आणि केटोन्सच्या फायद्यांची जाणीव आहे. “या संशोधनातील नावीन्य म्हणजे आम्ही आता एक रेणू तयार केला आहे, जो कृत्रिमरित्या शरीरातील लैक्टेट आणि केटोन्सचे प्रमाण सुरक्षितपणे नियंत्रित करेल,” असे थॉमस पॉल्सेन म्हणतात.
ही गोळी शरीरात कसे कार्य करते?
संशोधकांच्या मते, व्यायाम केल्यानंतर शरीरात अनेकदा दाहकता अनुभवली जाते; ज्या दरम्यान लैक्टेट आणि केटोन्सची पातळी वाढते. ही वाढ केवळ भूक कमी करणारे संप्रेरक सोडत नाही तर फॅटी ॲसिडचे शरीरातील प्रमाण कमी करून रक्तदेखील साफ करते, त्यामुळे शरीराच्या उपचार प्रक्रियेस गती मिळते आणि हृदयरोग, स्ट्रोक आणि टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होतो. शरीरातील चयापचय प्रक्रियेसाठी लैक्टेट सहाय्यक ठरते, तर यकृत केटोन तयार करते. संशोधकांच्या मते, केवळ आहाराद्वारे समान परिणाम साध्य करणे शक्य नाही, कारण शरीरात ॲसिड आणि मीठ तयार केल्याशिवाय लैक्टेट आणि केटोन्स जास्त प्रमाणात वापरता येत नाहीत. येथेच ‘लेक’ हे औषध सहाय्यक ठरते, कारण गोळीमध्ये अतिरिक्त प्रमाण नसलेले लैक्टेट आणि केटोन्स असतात.
याचा लोकांना कसा फायदा होईल?
कोणतेही परिश्रम न करता ही गोळी सेवन केल्याने अगदी समान फायदे मिळण्याचा दावा संशोधक करतात, त्यामुळे ज्यांना एखादा आजार आहे त्यांच्यासाठी ही गोळी अगदी गेम चेंजर असू शकते, असे संशोधकांनी सांगितले. “अनेक किलोमीटर वेगाने पळणे आणि उपवास करणे कठीण होते, कारण कमकुवत हृदय किंवा अशक्तपणा यांसारख्या शारीरिक व्याधी असलेल्या व्यक्तींसाठी पौष्टिक पूरक आहार उपयुक्त ठरू शकते,” असे डॉ. पॉल्सेन म्हणाले. गोळीमध्ये एकाग्रतेच्या अडचणी दूर करण्याची क्षमतादेखील आहे; ज्याचा वापर पार्किन्सन आणि स्मृतिभ्रंश यांसारख्या गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो.
हेही वाचा : ‘डेटिंग ॲप्स’चा वापर धोकादायक? या ॲप्सचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो?
तणावग्रस्त किंवा क्लेशकारक परिस्थितीत लैक्टेट मेंदूतील ग्लुकोजची भूमिका घेऊ शकते. जे व्यक्ती कठोर व्यायाम करू शकत नाहीत, त्यांना या पातळीला चालना देणाऱ्या औषधाचा खूप फायदा होईल,” असे थॉमस पॉल्सन स्पष्ट करतात. या गोळीचा आतापर्यंत फक्त उंदरांवरच अभ्यास केला गेला आहे, परंतु आरहस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल आता मानवावर पहिला क्लिनिकल अभ्यास करणार आहेत. मानवावरील प्रयोग पूर्णपणे यशस्वी झाल्यास लवकरच बाजारातही ही गोळी मिळू शकेल.