जगात पहिल्यांदाच डॉक्टरांनी १२ हजार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या रुग्णावर शस्त्रक्रिया केली. फ्रेंच डॉक्टरांनी चीनमध्ये बसून १२ हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरोक्कोमधील एका रुग्णावर प्रोस्टेट कॅन्सरची शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेसाठी चिनी बनावटीच्या रोबोटचा वापर केला. १६ नोव्हेंबर रोजी सर्जन युनेस अहलालने केवळ १०० मिलिसेकंदांच्या एकतर्फी विलंबाने दोन तासांत ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. या शस्त्रक्रियेने आतापर्यंत केलेल्या जगातील सर्वांत लांब रिमोट शस्त्रक्रियेचा विक्रम केला आहे. या शस्त्रक्रियेत राउंड-ट्रिप ट्रान्स्मिशनचे (नेटवर्क कनेक्शनच्या गुणवत्तेचे आणि कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी हे महत्त्वाचे मेट्रिक आहे. हे सहसा मिलिसेकंदमध्ये मोजले जाते) अंतर ३० हजार किलोमीटरहून अधिक होते. ही शस्त्रक्रिया कशी शक्य झाली? काय आहे ‘ट्रान्सकॉन्टिनेंटल रिमोट सर्जरी’? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शस्त्रक्रिया कशी करण्यात आली?

तौमाई रोबोटच्या मदतीने ही शस्त्रक्रिया करण्यात आली; ज्यामुळे रिअल-टाइममध्ये रिमोट ठिकाणाहून अचूक नियंत्रण आणि हाय-डेफिनिशन इमेजिंग करता आली. ही ग्राउंडब्रेकिंग प्रक्रिया ऑक्टोबरमध्ये रेनल सिस्टच्या शस्त्रक्रियेनंतर करण्यात आली आहे. ऑक्टोबरमध्ये तोमाई रोबोटने बेनिनमधील शांघाय आणि कोटोनौदरम्यान केली होती. मोरोक्कोमधील रोबोटने शांघायमधील सर्जनच्या आदेशांचे पालन केले. प्रोस्टेट ट्युमर काढून टाकणे, अचूकतेने जखमेवर टाके मारणे, मूत्रमार्गाची आवश्यक तेवढी लांबी राखणे यांसारखे आदेश रोबोटला शस्त्रक्रियेच्या वेळी देण्यात आले होते. या शस्त्रक्रियेत 5G तंत्रज्ञानाऐवजी मानक ब्रॉडबॅण्ड कनेक्शनचा वापर करण्यात आला असला तरी व्हिडीओ स्पष्ट होते.

तौमाई रोबोटच्या मदतीने ही शस्त्रक्रिया करण्यात आली; ज्यामुळे रिअल-टाइममध्ये रिमोट ठिकाणाहून अचूक नियंत्रण आणि हाय-डेफिनिशन इमेजिंग करता आली. (छायाचित्र-QuinDuox/एक्स)

हेही वाचा : राहुल गांधींकडे ब्रिटनचे नागरिकत्व आहे का? दुहेरी नागरिकत्व म्हणजे काय? भारतात त्याविषयीचे नियम काय?

ही जटिल शस्त्रक्रिया पार पाडण्यासाठी रोबोटच्या कामातील अचूकता आणि स्थिरता महत्त्वपूर्ण होती, असे सर्जन युनेस अहलाल यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. विशेष म्हणजे दूरस्थ शस्त्रक्रियेच्या या प्रकारामुळे जगभरातील कुशल शल्य चिकित्सकांपर्यंत रुग्णांना पोहोचता येणार आहे आणि त्यामुळे परदेशात जाऊन शस्त्रक्रिया करण्याची गरज नसणार आहे. त्याबरोबरच या प्रक्रियेद्वारे वरिष्ठ शल्यचिकित्सक जटिल प्रक्रिया हाताळण्यासाठी कनिष्ठ सहकाऱ्यांना दुरून मार्गदर्शनही करू शकतील.

या शास्त्रक्रियेचा वापर नेहमी होणार का?

तौमाई रोबोट तयार करणाऱ्या मायक्रोपोर्ट मेडबॉटचे अध्यक्ष हे चाओ यांनी ‘सिन्हुआ’ वृत्तसंस्थेला सांगितले की, हे तंत्रज्ञान भविष्यात वैद्यकीय सेवांमधील व्यत्यय दूर करण्यासाठी सज्ज आहे. “अशा शस्त्रक्रियेचा नियमित सराव करणे हे आमचे ध्येय आहे,” असेही ते म्हणाले. अलीकडच्या वर्षांत चिनी टेक स्टार्टअपसाठी सर्जिकल रोबोट्स हे प्रमुख क्षेत्र ठरत आहे. अलीकडील उद्योग अहवालानुसार, चीनचे सर्जिकल रोबोट मार्केट २०२६ पर्यंत ३८.४ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे; ज्याचा वार्षिक वाढीचा दर जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे. चीनमधील 5G ​​नेटवर्कच्या जलद विस्तारामुळे रिमोट शस्त्रक्रियेचा अवलंब करण्यास गती मिळण्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळे ते आरोग्य सेवांसाठी अधिक व्यावहारिक होईल. हे चाओ यांनी उघड केले की, तौमाई रोबोट आतापर्यंत २५० पेक्षा जास्त यशस्वी 5G अल्ट्रा-लाँग-डिस्टन्स शस्त्रक्रियांमध्ये सहभागी झाले आहेच. त्यांच्या यशाचा दर १०० टक्के आहे आणि एकूण प्रसारण अंतर ४,००,००० किलोमीटरपेक्षा जास्त आहे. देशाच्या उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानुसार, ऑगस्टपर्यंत चीनमध्ये चार दशलक्ष 5G बेस स्टेशन्स होती. तौमाई रोबोटला आता युरोलॉजी, सामान्य शस्त्रक्रिया, थोरॅसिक शस्त्रक्रिया आणि स्त्रीरोगविषयक एण्डोस्कोपीसह विविध शस्त्रक्रियांमध्ये वापरण्यासाठी अधिकृत करण्यात आले आहे.

जगातील पहिली ट्रान्सकॉन्टिनेंटल रिमोट शस्त्रक्रिया

या वर्षाच्या सुरुवातीला, एका चिनी शल्यचिकित्सकाने जगातील पहिले थेट ट्रान्सकॉन्टिनेंटल रिमोट रोबोटिक प्रोस्टेट काढून इतिहास घडवला. बीजिंगमध्ये असलेल्या रुग्णावर रोममधून शस्त्रक्रिया केली गेली. ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या म्हणण्यानुसार, आठ हजार किलोमीटर अंतरावरून ही शस्त्रक्रिया करण्यात आली. शल्यचिकित्सक झांग झू इटलीमधून रोबोटला शस्त्रक्रियेसाठी आदेश देताना रुग्णाच्या मदतीसाठी एक वैद्यकीय पथक आणि एक बॅकअप सर्जन, अशी सर्व मंडळी चीनमध्ये उपस्थित होती. चीनमधील रोबोटिक शस्त्रे कर्करोगाच्या उतकांना काढून टाकण्यासाठी झांग यांच्या प्रत्येक हालचालीचे अनुकरण करत होते. कॉन्फरन्स संचालकांपैकी एक आणि रोबोटिक शस्त्रक्रिया तज्ज्ञ व्हिटो पानसाडोरो यांनी राज्य प्रसारक सीसीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान या कार्यक्रमाचे ‘ऐतिहासिक अनुभव, एक ऐतिहासिक क्षण’ असे वर्णन केले. पीपल्स डेलीनुसार, प्रोस्टेट टेलीसर्जरी करण्यापूर्वी झांग आणि त्यांच्या टीमने प्राण्यांवर १०० हून अधिक प्रायोगिक रिमोट शस्त्रक्रिया केल्या, तसेच संशोधनात्मक आणि लहान प्रमाणात मानवी रुग्ण चाचण्याही केल्या.

हेही वाचा : पाकिस्तान का पेटलंय? इम्रान खान समर्थक आणि लष्करातील रक्तरंजित संघर्षाचे कारण काय?

भारतातील सर्जिकल रोबोट सिस्टीम

भारताचे सुधीर श्रीवास्तव यांनी डिझाईन केलेली ‘एसएसआय मंत्रा’ ही स्वदेशी सर्जिकल रोबोट प्रणालीदेखील विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे सर्जन रुग्णाच्या जवळ नसतानाही रोबोटिक शस्त्रक्रिया करू शकतो. ‘एसएसआय मंत्रा’ला हृदयाच्या शस्त्रक्रियेसह जटिल शस्त्रक्रियांसाठी डिझाईन केले गेले आहे. श्रीवास्तव यांनी यापूर्वी ‘दा विंची’ रोबोटिक प्रणालीवर काम केले होते. त्यांना भारतात परवडणारे आणि प्रवेशयोग्य असे उपकरण तयार करायचे होते. कारण- भारतात ९० टक्के अमेरिका आणि जपानमधील प्रणाली वापरल्या जात होत्या, असे त्यांनी ‘इंडिया टुडे’ला सांगितले. २०१२ मध्ये त्यांनी ‘एसएसआय मंत्रा’ हा भारतातील पहिला सर्जिकल रोबोट विकसित करण्यास सुरुवात केली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How worlds longest remote surgery was performed rac