संदीप नलावडे
अमेरिकेतील प्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठाच्या वैद्यकीय विभागातील शवागारात मानवी अवशेषांची विक्री केली जात असल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी शवागाराचे माजी व्यवस्थापक आणि अन्य तिघांवर आरोप ठेवण्यात आले असून मानवी अवयवांचा व्यापार करणारी साखळीच समोर आली आहे. मानवी अवयवांचा व्यापार करणाऱ्या या प्रकरणाविषयी…
हार्वर्ड विद्यापीठात काय प्रकार घडला आहे?
‘मृतदेहाच्या टाळूवरचे लोणी खाणे’ ही मराठीमध्ये प्रसिद्ध असलेली म्हण प्रत्यक्षात व्यवहारात आणण्याचे काम हार्वर्ड विद्यापीठाच्या वैद्यकीय शिक्षण विभागात झाले आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शवागारात दान करण्यात आलेल्या मृतदेहाचे अवयव विकून पैसे कमावण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या शवागाराचा व्यवस्थापक सेड्रिक लॉज आणि त्याची पत्नी डेनिस हे या प्रकरणातील मुख्य आरोपी असून २०१८ पासून मृतदेहांच्या अवयवाचा व्यापार ते करत आहेत. संशोधनासाठी आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा यासाठी या विद्यापीठाला अनेक जण मृतदेह दान करतात. मात्र या मृतदेहांचे अवयव आणि हाडे विकण्याचे काम या दाम्पत्याने सुरू केले. ऑनलाइनच्या माध्यमातून या दोघांनी अवयव विक्री सुरू केली आणि त्याचे मोठे जाळे उभे केले. या अवयव विक्रीतून या दाम्पत्याने लाखो डॉलर कमावले.
या प्रकरणात आरोपी कोण कोण आहेत?
सेड्रिक लाॅज व त्याची पत्नी डेनिस यांच्यावर तर आरोप आहेत, पण त्याचबरोबर मानवी अवयवाची वाहतूक करणे, ऑनलाइन प्रसिद्धी देणे, अवयव विकत घेणे आणि या प्रकरणाशी संबंधित अनेकांवर आरोप करण्यात आले आहेत. मॅसॅच्युसेट्स राज्यातील सॅलेम शहरातील कॅटरिना मॅक्लीन आणि पेनसिल्व्हेनिया राज्यातील वेस्ट लॉनमधील जोशुआ टेलर यांनी हे अवयव खरेदी केल्याचा आरोप आहे. मॅक्लीन ही ‘कॅट क्रिपी क्रिएशन्स’ नावाच्या दुकानाची मालकीण आहे. तिच्या समाज माध्यमावरील माहितीनुसार ती हॉरर नॉव्हेल्टी बाहुल्या तयार करण्यात कुशल असून अशा बाहुल्यांची आणि हाडांपासून तयार केलेल्या वस्तूंची जाहिरातही तिने केली आहे. तिने लॉजकडून मानवी अवयव विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. जोशुआ टेलरने गेल्या चार वर्षांत मृतदेहांच्या अवयवाच्या बदल्यात लॉजला ३९ वेळा ई-पेमेंट केल्याचे समोर आले आहे. एकूण ३७ हजार डॉलर लॉजला पाठविण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. पूर्व बेथेल शहरातील मॅथ्यू लॅम्पी याच्यावर कट रचणे आणि चोरीच्या मालाची आंतरराज्यीय वाहतूक करणे असे आरोप ठेवण्यात आले आहे. मृतदेहाचा गैरवापर करण्याचा आरोप जेरमी ली पॉली हिच्यावर ठेवण्यात आला आहे. पॉलीने एका महिलेकडून हृदय, मेंदू, फुप्फुसे आणि दोन गर्भाचे नमुने खरेदी केले होते. हे अवयव हार्वर्डच्या शवागारातून नेण्यात आले होते.
Manipur Violence : मणिपूरमध्ये महिलांची निर्वस्त्र धिंड; संपूर्ण प्रकरण काय आहे?
हा प्रकार उघडकीस कसा आला?
केंटकी राज्यातील माऊंट वॉशिंग्टनमधील जेम्स नॉट नावाव्या व्यक्तीने फेसबुकवर जेरेमी पॉलीबरोबर संवाद साधला होता. मानवी कवटी व मणक्याच्या विक्रीबद्दल त्याने विचारणा केली होती. बेकायदा बंदूक बाळगल्याच्या आरोपावरून फेडरल अधिकारी जेम्सच्या मागावर होते. फेसबुकवरील या संवादानंतर अधिकाऱ्यांनी जेम्सच्या घरावर छापे टाकून झडती घेतली. त्याच्या घरात ४० मानवी कवट्या, पाठीचा कणा, फेमर (मांडीचे हाड) व कंबरेची हाडे आढळली. एक कवटी स्कार्फमध्ये गुंडाळलेली आणि दुसरी कवटी जेम्सच्या पलंगावर आढळली. विशेष म्हणजे ‘हार्वर्ड मेडिकल स्कूल’ असे लिहिलेली बॅगही तिथे सापडली. या धाग्यावरून फेडरल अधिकारी हार्वर्ड विद्यापीठात पोहोचले आणि या प्रकरणाचा उलगडा झाला.
या प्रकरणातील आरोपींवर कोणते गुन्हे? काय शिक्षा होऊ शकते?
या प्रकरणात सेड्रिक लॉज, त्याची पत्नी डेनिस आणि मानवी अवयव खरेदी करणारे कॅटरिना मॅक्लीन व जोशुआ टेलर यांच्यावर गुन्हा नोंदविणत आला आहे. कट रचणे आणि चोरीच्या मालाची आंतरराज्यीय वाहतूक केल्याचा आरोप चारही आरोपींवर ठेवण्यात आला आहे. जर ते दोषी आढळल्यास त्यांना १५ वर्षांची शिक्षा होऊ शकते. इतर आरोपींची चौकशी करण्यात येत असून त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे नोंदविण्यात येणार आहे. मात्र या प्रकरणाशी संबंधित कायद्याचा अभ्यास करूनच गुन्ह्यांची नोंद व शिक्षा होऊ शकते, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
अमेरिकेतील यासंबंधीचे कायदे काय आहेत?
मानवी अवयवाची चुकीची हाताळणी किंवा विक्रीशी संबंधित कोणतेही ठोस कायदे अमेरिकेत नाही. त्याशिवाय बहुतेक राज्यांमध्ये मानवी अवयवांची विक्रीही बेकायदा नाही, असे वेक फॉरेस्ट विद्यापीठातील कायद्याचे प्राध्यापक तान्या डी. मार्श यांनी सांगितले. दफनभूमी आणि मानवी अवशेष कायद्याबाबत मार्श म्हणाल्या, मानवी अवशेषांसाठी एक व्यापक बाजारपेठ असून ती स्पष्टपणे कायदेशीर नाही. पण बऱ्याच राज्यांमध्ये ते स्पष्टपणे बेकायदाही नाही. त्या त्याला ‘ग्रे मार्केट’ असे म्हणतात. दफनभूमीतून मानवी अवयव चोरणे व त्याचा व्यापार करणे याबाबत अनेक राज्यांत ठाेस कायदे आहेत. मात्र दफन न करण्यात आलेल्या मृतदेहांच्या अवयवांबाबत कोणतेही कायदे नाही, असे तान्या म्हणाल्या.
विश्लेषण : व्हिक्टोरियाच्या माघारीनंतर राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन भारत करू शकतो का?
हार्वर्ड विद्यापीठाचे म्हणणे काय?
हार्वर्ड विद्यापीठाच्या औषध विभागाचे अधिष्ठाता डॉ. जॉर्ज क्यू. डेली यांनी सांगितले की, ‘‘आमच्या विभागात अशा प्रकारचे काहीतरी भयानक घडू शकते, हे समजल्यानंतर अस्वस्थ झालो आहेात. सेड्रिक लाॅजची नोकरी ६ मे रोजीच संपुष्टात आली होती. मात्र त्याच्यावर पुढील कारवाई नक्की करण्यात येईल.’’ लॉजने यापूर्वी विद्यापीठातील ‘ॲनॅटॉमिकल गिफ्ट्स प्रोग्रॅम’चा व्यवस्थापक म्हणून काम केलेले आहे. वैद्यकीय संशोधनासाठी देणगी मिळालेल्या मृतदेहांचे तुकडे करण्यासाठी त्याने आपल्या पदाचा गैरवापर केला. वैद्यकीय अभ्यास व संशोधनासाठी हार्वर्ड विद्यापीठाला मृतदेह दान केले जातात. जेव्हा मृतदेहाचा वापर पूर्ण होतो, त्यानंतर मृतदेहाच्या अवशेषांचे विद्यापीठाच्या वैद्यकीय दफनभूमीत दफन केले जातात किंवा त्यांचे अवशेष कुटुंबीयांना परत केले जातात. मात्र सेड्रिकने हे अवयव दफन करण्याऐवजी किंवा कुटुंबीयांना परत करण्याऐवजी त्यांची विक्री केली. त्याने वैद्यकीय विभागाच्या माहितीशिवाय किंवा परवानगीशिवाय शरीराचे अवयव हार्वर्डच्या शवागारात नेले, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.