राखी चव्हाण
राज्यातील मानव-वन्यजीव संघर्षाला लगाम घालणे वनखात्याला जमलेले नाही. एकीकडे हा संघर्ष वाढत असताना माणसे मृत्युमुखी तर पडतच आहेत, पण वन्यप्राण्यांचाही बळी जात आहे. वन्यप्राण्यांकडून हल्ला झाल्यास, शेतपिकांचे नुकसान झाल्यास, माणूस किंवा जनावरे मृत्युमुखी पडल्यास नुकसानीचा मोबदला देणे, त्यात वाढ करणे यावरच खात्याचा भर राहिला आहे. आताही वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे शेतीच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई दुप्पट करण्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. मात्र, या नुकसान भरपाईतून हा संघर्ष थांबणार नाही, हे देखील तेवढेच खरे आहे.
शेतपिकाचे नुकसान कसे?
शेतपिकाचे नुकसान वाघ आणि बिबट्यांमुळे कमी, तर तृणभक्षी प्राण्यांमुळे अधिक होते. जंगलालगतच्या शेतांमध्ये पिके येण्यास सुरुवात झाली की रोही (नीलगाय), हरीण यांसारखे वन्यप्राणी धुडघूस घालतात. त्यांच्यामुळे संपूर्ण पिकाचे नुकसान होते. तर या तृणभक्षी प्राण्यांच्या मागावर वाघ आणि बिबटे येतात. त्यामुळे शेतकरी शेतात जाऊ शकत नाही. परिणामी येथेही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी वनखात्याने नुकसान भरपाई जाहीर केली, पण अजूनही प्रश्न सुटलेला नाही.
नुकसान भरपाई आधी किती व आता किती?
कोरडवाहू शेतीचे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात नुकसान झाले तर प्रती हेक्टर पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई मिळत असे. ती आता हेक्टरी पन्नास हजार रुपये प्रस्तावित करण्यात आली आहे. तर धानशेतीचे नुकसान झाल्यास हेक्टरी चाळीस हजार रुपये भरपाई दिली जात होती. ती आता हेक्टरी ऐंशी हजार रुपये करण्यात आली आहे. एका शेतकऱ्याला दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत ही मदत मिळू शकेल.
विश्लेषण: बेकायदा दस्त नोंदणीची व्याप्ती राज्यभर…समस्या फोफावण्यामागे काय कारण?
वनमंत्र्यांनी काय इशारा दिला?
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीस दिवसांच्या आत नुकसान भरपाई न मिळाल्यास त्यांना त्यावर व्याज द्यावे आणि ते व्याज संबंधित अधिकाऱ्याच्या पगारातून वसूल करता येईल का, असा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मात्र, नुकसान भरपाई देऊन किंवा ती वेळेत दिली नाही म्हणून अधिकाऱ्यांकडून ते वसूल करु, असा इशारा वनाधिकाऱ्यांना देऊन हा प्रश्न सुटणार नाही, असे या क्षेत्रातील विश्लेषकांचे मत आहे.
माणूस मृत्युमुखी पडल्यास, जखमी झाल्यास अनुदान किती?
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे व्यक्ती मृत झाल्यास पूर्वी १५ लाख रुपये अनुदान देण्यात येत होते. आता अनुदानात वाढ केल्याने २० लाख रुपये देण्यात येणार आहे. दहा लाख रुपयाचा धनादेश व दहा लाख रुपये संबंधिताच्या खात्यात फिक्स्ड डिपॉझिट करण्यात येईल. व्यक्ती कायमस्वरूपी अपंग झाल्यास पाच लाख रुपये, गंभीर जखमी झाल्यास १.२५ लाख रुपये, तर किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी २० हजार रुपये देण्यात येतील.
विश्लेषण : मुंबई महानगरपालिकेत राडा का झाला? बीएमसीमधील पक्ष कार्यालयांचं इतकं महत्त्व का?
पाळीव जनावर मृत्युमुखी, जखमी झाल्यास अनुदान किती?
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे गाय, म्हैस, बैल यांचा मृत्यू झाल्यास यापूर्वी ६० हजार रुपये देण्यात येत होते. आता अनुदानात वाढ केल्याने ७० हजार रुपये देण्यात येणार आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे मेंढी, बकरी व इतर पशुधन यांचा मृत्यू झाल्यास यापूर्वी १० हजार रुपये देण्यात येत होते, परंतु आता १५ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे गाय,म्हैस, बैल, मेंढी, बकरी व इतर पशुधन जखमी झाल्यास यापूर्वी चार हजार रुपये अनुदान देण्यात येणार होते. आता अनुदानात वाढ केल्याने पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
rakhi.chavhan@expressindia.com