भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समांथा रुथ प्रभू अलीकडेच तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे वादात सापडली. इन्स्टाग्रामवरील तिच्या पोस्टमध्ये, समांथाने व्हायरल इन्फेक्शनवर उपचार करण्यासाठी हायड्रोजन पेरॉक्साइड नेब्युलायझेशन या उपचार पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला होता. समंथाने या पोस्टमध्ये व्हायरल इन्फेक्शनसाठी औषधांचा अवलंब करण्याऐवजी हायड्रोजन पेरोक्साइड आणि डिस्टिल्ड वॉटरचा वापर करून नेब्युलायझिंग करण्याचा पर्याय सुचवला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समांथाच्या या पोस्टवर डॉ. सिरीयक ॲबी फिलिप्स यांनी जोरदार टीका केली. सोशल मीडियावर त्यांना ‘द लिव्हर डॉक’ म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी समांथाला आरोग्य आणि विज्ञान विषयातील अडाणी व्यक्ती म्हटलं आणि हायड्रोजन पेरोक्साइड नेब्युलायझेशनच्या संभाव्य धोक्यांबद्दल कठोर चेतावणीदेखील जारी केली. हायड्रोजन पेरोक्साईड नेब्युलायझेशन म्हणजे नक्की काय? आणि त्यावरून वाद कसा सुरू झाला? या वादग्रस्त उपचार आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांविषयी सविस्तर जाणून घेऊ.

हेही वाचा : लाखोंची ‘Dior’ बॅग तयार होते चार हजारात? कामगारांचं होतंय शोषण; काय आहे बड्या ब्रॅंडमागचे सत्य?

हायड्रोजन पेरोक्साइड नेब्युलायझेशन म्हणजे काय?

हायड्रोजन पेरोक्साइड नेब्युलायझेशनमध्ये नेब्युलायझरद्वारे पातळ हायड्रोजन पेरॉक्साइडची वाफ दिली जाते. ही पद्धत सामान्यतः अस्थमासारख्या परिस्थितीसाठी थेट फुफ्फुसांपर्यंत औषध पोहोचविण्यासाठी वापरली जाते. हायड्रोजन पेरॉक्साइड हे हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून तयार करण्यात आलेले एक अँटिसेप्टिक आहे, जे ऑक्सिडायझिंग आणि जंतुनाशक म्हणून वापरले जाते. हे रासायनिक कंपाऊंड ब्लीच, रंग, अँटीसेप्टिक्स आणि जंतुनाशकांमध्ये आढळते. परंतु, जेव्हा हे रासायनिक कंपाऊंड नेब्युलायझेशन आणि इनहेल केले जाते, तेव्हा ते संभाव्यपणे हवेतील पदार्थांशी किंवा नेब्युलायझर उपकरणांमधील काही कणांच्या संपर्कात येऊ शकते. एजन्सी ऑफ टॉक्सिक सबस्टंसेस अँड डिसीजच्या नोंदणीनुसार, हे रसायन हवा किंवा उपकरणांमधील कणांच्या संपर्कात आल्याने घातक वायू तयार होऊ शकतो; ज्यामुळे फुफ्फुसांना नुकसान होते आणि श्वसन मार्गात जळजळ निर्माण होते.

या पद्धतीचा अवलंब करणारे लोक दावा करतात की, या उपचार पद्धतीमुळे श्वसनमार्ग स्वच्छ होतो, श्वसन मार्गातील अडथळा दूर करते. परंतु, या दाव्यांना आरोग्य तज्ज्ञांचे समर्थन नाही. यूएस फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (एफडीए) नेदेखील संभाव्य आरोग्य धोक्यांचा हवाला देत कोणत्याही वैद्यकीय वापरासाठी रासायनिक कंपाऊंडच्या नेब्युलिस्टेशनला मंजुरी दिलेली नाही, असे ‘मेडिकल न्यूज टुडे’च्या वृत्तात म्हटले आहे.

हायड्रोजन पेरोक्साइड नेब्युलायझेशनचे दुष्परिणाम

श्वसनमार्गात इजा : हायड्रोजन पेरोक्साइड इनहेल केल्याने श्वसनमार्गात इजा होऊ शकते, त्यामुळेच ऊतींना (टिशू) ओलावा मिळतो आणि श्वसनमार्गाच्या श्वासोच्छवासातील धूळ, जंतूंपासून संरक्षण होते. जेव्हा जोराने आणि एकसारखा श्वास घेतला जातो तेव्हा श्वसनमार्गातील त्वचेवर जळजळ होऊ शकते. त्यामुळे सूज, वेदना, जळजळ, कोरडेपणा आणि गिळण्यात अडचण येऊ शकते. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (यूएस सीडीसी) सांगतात की, तीन टक्के रसायनही ऊतकांना हानी पोहोचवू शकते.

फुफ्फुसांचे नुकसान : हायड्रोजन पेरोक्साइड इनहेल केल्याने फुफ्फुसावर सूज येऊ शकते, श्वसनाची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. रक्तातील ऑक्सिजनची पातळीही धोकादायकपणे कमी होते, असे यूएस सीडीसी सांगते. याव्यतिरिक्त, यामुळे न्यूमोनिटिस होऊ शकतो. न्यूमोनिटिसचा त्रास फुफ्फुसाची जळजळ किंवा रसायनांच्या दीर्घ संपर्कामुळे उद्भवते, असे क्युरियस जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात म्हटले आहे. त्यामुळे श्वास भरून येणे, छातीत दुखणे आणि खोकल्यातून रक्त येणे आदी समस्या उद्भवू शकतात

सायटोटॉक्सिसिटी : ‘ओन्ली माय हेल्थ’मध्ये मुंबईतील जनरल फिजिशियन डॉ. रूही पिरजादा सांगतात, “हायड्रोजन पेरोक्साइड हे सायटोटॉक्सिक आहे, म्हणजे ते पेशी नष्ट करू शकते. हायड्रोजन पेरोक्साइड इनहेल केल्याने श्वसन प्रणालीमध्ये नुकसान होऊ शकते आणि मृत्यूदेखील होऊ शकतो. विशेषत: याचा फुफ्फुसांच्या नाजूक पेशींवर परिणाम होतो.

हेही वाचा : करोनाच्या नव्या प्रकारांचा अमेरिका आणि ब्रिटनमध्ये धुमाकूळ; भारतातील सद्यपरिस्थिती काय?

नेटकर्‍यांच्या टीकेवर समांथाचे प्रत्युत्तर

टीकेचा सामना केल्यानंतर, समांथाने तीन पानांच्या विधानासह प्रत्युत्तर दिले आणि स्पष्ट केले की तिने चांगल्या हेतूने नेब्युलायझेशन पद्धतीचा सल्ला दिला. स्वतःचा बचाव करत अभिनेत्रीने सांगितले की, तिने दिलेला सल्ला तिच्या २५ वर्षांच्या अनुभवावर आणि डॉक्टरांच्या सल्ल्यावरच आधारित होता. तर अभिनेत्री समांथाच्या पोस्टवर पुन्हा लिव्हर डॉकने टीका केली. “मी प्रदीर्घ काळ वैद्यकीय आणि आरोग्यविषयक चुकीच्या माहितीशी लढत आहे आणि ते संपेल असे वाटत नाही. मला समजले आहे की, वैद्यकीय चुकीच्या माहितीशी लढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याबद्दल सातत्याने बोलणे आहे,” असे त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले होते. याव्यतिरिक्त, तीन वेळा ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित आणि पर्यावरणवादी रिकी केज यांनीही द लिव्हर डॉक यांना समर्थन दिले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hydrogen peroxide nebulisation samantha ruth prabhu rac
Show comments