स्मृतिभ्रंश प्रामुख्याने वृद्ध लोकांना प्रभावित करतो. वृद्धांमध्ये स्मृतिभ्रंश हा आजार वाढत्या वयानुसार मेंदूत होणार्या अतिरिक्त बदलांमुळे होतो. एकाकीपणामुळेही स्मृतिभ्रंश होण्याचा धोका वाढला आहे. ५० टक्के स्मृतिभ्रंश हा आजार वृद्धांना एकाकीपणामुळे होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. परंतु, दक्षिण कोरियन कंपनीने याच समस्येवर एक तोडगा काढला आहे. ह्योडोल (Hyodol) या दक्षिण कोरियन कंपनीने कृत्रिम बुद्धिमत्ते (एआय)चा वापर करुन वृद्धांमधील एकाकीपणावर मात करण्याचा मार्ग शोधून काढला आहे. त्यासाठी कंपनीने १८०० डॉलर्स (सुमारे १.५ लाख रुपये) किमतीचा ‘सोशल रोबो’ तयार केला आहे.
दक्षिण कोरिया सरकारने ज्येष्ठ नागरिकांचा एकटेपणा दूर करण्यासाठी, त्यांना औषधांची आठवण करून देण्यासाठी जवळ जवळ सात हजार ‘ह्योडोल’ रोबो तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. दक्षिण कोरियामध्ये ज्येष्ठ नागरिकांमधील एकटेपणा ही एक समस्या झाली आहे. त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने दक्षिण कोरियाच्या सरकारने हा उपाय शोधून काढला आहे.
‘ह्योडोल’ रोबो काय करू शकतात?
‘ह्योडोल’ रोबो अगदी मऊ, लवचिक आणि एखाद्या खेळण्यासारखे दिसतात. या रोबोतील तंत्रज्ञान संवादातून समोरील व्यक्तीच्या मनातील भावना ओळखण्यास सक्षम आहे. हे रोबो वृद्धांबरोबर चालू शकतात, संवाद साधू शकतात आणि संगीतदेखील वाजवू शकतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ह्योडोल नावाचा हा रोबो एक ‘एआय’ केअर रोबो आहे आणि तो ज्येष्ठांसाठी तयार करण्यात आला आहे.
“डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे डिजिटल जगतापासून वंचित व्यक्तींना आनंदी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी ‘ह्योडोल’ रोबो मदत करतो,” असे स्पष्टीकरण कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आले आहे. ह्योडोल ही कंपनी ‘इमोशनल एआय सिस्टीम’वर काम करते. या कंपनीने असा दावा केला आहे की, वापरकर्त्यांना हा रोबो अगदी जवळचा वाटेल आणि त्यांची कुटुंबीयांसारखीच काळजी घेईल.
ह्योडोल रोबो माणसांप्रमाणे संवाद साधू शकतो. या रोबोला हाताळण्यासाठी कंपनीच्या ॲपचा आणि वेब मॉनिटरिंग प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागतो. या रोबोमध्ये सुरक्षेचे फीचरदेखील देण्यात आले आहे. कोणतीही धोकादायक हालचाल आढळल्यास रोबो सतर्कतेचा इशारा देतो. रोबो २४ तास वापरकर्त्याकडे पाहत, त्याचे निरीक्षण करीत असतो आणि निरीक्षणात आढळणार्या गोष्टी आपल्या डेटाबेसमध्ये स्टोअर करीत असतो.
‘ह्योडोल’ रोबो स्पर्शाद्वारे संवाद साधू शकतो, आरोग्यविषयक सल्ले देऊ शकतो, व्हॉइस मेसेज पाठवू शकतो, दिनचर्येतील गोष्टींची आठवण करून देतो, व्यायामाची सूचना देऊ शकतो, संगीत ऐकवू शकतो, अशी अनेक वैशिष्ट्ये या रोबोमध्ये आहेत. त्याव्यतिरिक्त रोबोसाठी तयार करण्यात आलेल्या ॲपद्वारे व्हॉइस मेसेज पाठविण्यासह प्राप्त केले जाऊ शकतात. रोबोट दिवसातून दोन वेळा आपल्या वापरकर्त्याला आरोग्याशी संबंधित प्रश्न विचारत, त्याच्या आरोग्यावर लक्ष ठेवतो.
रोबो गोळा करीत असलेल्या डेटाचे काय होते?
कंपनीने सांगितले की, ‘ह्योडोल’ रोबो एआय तंत्रज्ञानाचा वापर करून, वापरकर्त्याकडून २४ तासांतील डेटा गोळा करतो. कंपनीने असे म्हटले आहे की, यात वापरकर्त्याची गोपनीयता आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल. तसेच डेटा संरक्षणाचे काटेकोरपणे पालन केले जाईल. परंतु, हे कसे केले जाईल? याचा उल्लेख कंपनीने केलेला नाही. हा चिंतेचा विषय आहे. कारण- रोबोद्वारे गोळा करण्यात आलेल्या महितीचा गैरवापरदेखील केला जाऊ शकतो.
हेही वाचा : साबरमती आश्रमाचा कायापालट होणार; १२०० कोटींच्या प्रकल्पात नेमके काय?
ह्योडोल रोबोतील तंत्रज्ञान काय आहे?
या एआय रोबोमध्ये लार्ज लँग्वेज मॉडेल (एलएलएम) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. भाषांचा मोठ्या प्रमाणात अभ्यास करण्यासाठी या मॉडेलचा वापर करण्यात येतो. एआय रोबोला स्मार्ट होम डिव्हाइसेसशीदेखील जोडले जाऊ शकते. त्यातून अनेक वापरकर्त्यांशी तो एकाच वेळी संवाद साधू शकतो. दक्षिण कोरियन कंपनीने तयार केलेला हा ‘ह्योडोल’ पहिला रोबो नाही. गेल्या दोन वर्षांत अशाच प्रकारचे अनेक रोबोट्स तयार करण्यात आले आहेत. ऑक्टोबर २०२३ मध्ये ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार एप्रिलमध्ये कझाक कंपनीने सोशल रोबो ‘नाओ’ला तयार केले होते. ऑटिझम थेरपीमध्ये मदत करण्यासाठी ‘नाओ’ रोबोला तयार करण्यात आले होते.