भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हंगामात चेंडूवर लाळेचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. करोना काळात चेंडूवर लाळ लावण्यास बंदी घालण्यात आली होती. ‘बीसीसीआय’ परवानगी दिली असली, तरीही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या नियमात अजूनही सूट दिलेली नाही. ‘आयपीएल’मधील नियमामुळे गोलंदाजांना कितपत फायदा होईल, ‘आयसीसी’ भविष्यामध्ये याबाबत निर्णय घेणार का, चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेचे महत्त्व काय याचा घेतलेला आढावा.
‘चेंडूवर लाळेच्या वापरास संमती का?
‘आयपीएल’ आगामी हंगामात चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करण्यास ‘बीसीसीआय’ने परवानगी दिली आहे. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर, लाळेच्या वापरावर घालण्यात आलेले निर्बंध उठविणारी ‘आयपीएल’ ही क्रिकेटविश्वातील पहिलीच स्पर्धा ठरली आहे. ‘आयपीएल’च्या हंगामास सुरुवात होण्यापूर्वी दहाही संघांच्या कर्णधारांची मुंबई येथे बैठक झाली. या बैठकीत कर्णधारांनी ‘बीसीसीआय’च्या प्रस्तावास मान्यता दिली. ‘‘चेंडूवर लाळेचा वापर करण्यास घालण्यात आलेली बंदी आता उठविण्यात आली आहे. ‘आयपीएल’मधील काही कर्णधार सुरुवातीस या निर्णयाच्या बाजूचे नव्हते, तर काही साशंक होते. मात्र, बहुतेक कर्णधारांनी या प्रस्तावास पाठिंबा दर्शविल्याने आता चेंडूला लकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करता येणार आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याने सांगितले. मुळात ट्वेन्टी-२० प्रारूपात फलंदाजांची मक्तेदारी अधिक दिसून येते. परिस्थिती अनुकूल असल्यासच गोलंदाजांना फायदा मिळतो. मात्र, लाळेचा वापर करणार असल्याने गोलंदाज प्रतिकुल परिस्थितीही फलंदाजांना आव्हान देऊ शकतो. त्यामुळे आगामी ‘आयपीएल’मध्ये चुरशीचे सामने पहायला मिळणे अपेक्षित आहे.
स्विंग आणि रिव्हर्स स्विंगला फायदा?
लाळेचा वापर केल्या सर्वाधिक फायदा हा वेगवान गोलंदाजांनाच होत असतो. यामुळे चेंडू चांगला स्विंग होण्यास मदत मिळते. आपण अनेक गोलंदाज व क्षेत्ररक्षक चेंडू घासताना किंवा लाळेचा वापर करताना पाहिले असेल. हे सर्वजण चेंडूची लकाकी एका बाजूला कायम राखण्यासाठी प्रयत्न करीत असतात. जेणेकरून चेंडू स्विंग होण्यास सुकर होईल. जेव्हा गोलंदाज चेंडूंच्या एका बाजूस लाळ वापरतो तेव्हा त्या बाजूला लकाकी येते. दुसरी बाजू मात्र, खडबडीत असते. जेव्हा वेगवान गोलंदाज चेंडू टाकतो तेव्हा चेंडू हवेत खडबडीत बाजूने स्विंग होतो. यालाच ‘रिव्हर्स स्विंग ’ म्हणतात. जेव्हा चेंडू नवीन असतो, तेव्हाही स्विंग होतो. तेव्हा गोलंदाज आपल्या शैलीवर चेंडू दोन्ही बाजूने स्विंग करण्यास सक्षम असतो. मात्र, चेंडू जुना झाल्यास रिव्हर्स स्विंग होण्यास मदत मिळते. ‘आयपीएल’मध्ये या नियमाचा अवलंब करण्यात येणार असल्याने अनेक गोलंदाजांना फायदा होऊ शकतो.
लाल चेंडूला अधिक फायदा?
कसोटी क्रिकेटमध्ये वापरण्यात येणारा लाल चेंडू हा सफेद चेंडूच्या तुलनेने चांगला स्विंग व स्पिन होतो. त्यामुळे गोलंदाजी भक्कम असणाऱ्या संघांना फायदा मिळतो. लाल चेंडू लवकर खराब होत नाही. दुसरीकडे, सफेद चेंडू हा सुरुवातीला चांगल्या पद्धतीने स्विंग होतो. त्यानंतर मात्र, वेगवान गोलंदाजांना फारशी मदत मिळत नाही. सफेद चेंडू रिव्हर्स स्विंगही फार होत नाही. त्यातच दोन्ही चेंडू तयार करण्याच्या पद्धतीमुळेही फरक पहायला मिळू शकतो. भारतात एसजी चेंडू वापरला जातो. एसजी चेंडूची शिलाई ही हाताने तयार करण्यात येत. त्याचा फायदा गोलंदाजांना अधिक काळ मिळतो. पण, सामने रात्री होत असल्याने दवाचा परिणामही गोलंदाजीवर होईल. त्यामुळे हा नियम गोलंदाजांसाठी महत्त्वाचा असला तरी, तो कितपत प्रभावी ठरतो हे अस्पष्ट आहे.
‘आयसीसी’ फेरविचार करेल का?
‘आयपीएल’च्या गेल्या हंगामात चेंडूवर लाळेचा वापर करण्याबाबत कठोर नियम होता. कोणताही खेळाडू चेंडूवर तीनदा लाळेचा वापर करताना दिसला, तर सामन्याच्या मानधनाची २५ टक्के रक्कम दंड म्हणून आकारण्यात येत होती. तसेच, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या कर्णधाराला सूचना केली जात असे. तिनदा नियमाचा भंग झाल्यास सामनाधिकाऱ्याकडूण खेळाडू किंवा संघाच्या कर्णधारावर दंडात्मक कारवाई केली जात असे. मात्र, या हंगामापासून लाळेचा वापर करण्यास मिळणार असल्याने गोलंदाजांना अडचणी कमी होणार आहेत. सध्या ‘आयसीसी’च्या अध्यक्षपदी ‘बीसीसीआय’चे माजी सचिव जय शहा आहेत. ‘बीसीसीआय’ने आयपीएलमधून हा नियम वगळल्यानंतर आगामी काळात ‘आयसीसी’च्या निर्णयाकडे लक्ष असेल. ‘आयसीसी’वर नेहमीच ‘बीसीसीआय’चा प्रभाव राहिला आहे. सर्वाधिक निधीही त्यांना भारतीय बोर्डाकडून मिळत असतो, त्यामुळे नेहमीच ‘आयसीसी’ ‘बीसीसीआय’ ला झुकते माप देते अशी चर्चा इतर बोर्डांमध्ये असते. जून महिन्यापासून जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (डब्ल्यूटीसी) नवीन टप्प्याला सुरुवात होणार आहे आणि यामधील पहिला मालिका भारत व इंग्लंड यांच्यातच होणार आहे. मेरिलीबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) क्रिकेटचे नियम तयार करतात आणि त्या नियमाबाबत चर्चा करुन नंतरच त्याची अंमलबजावणी ‘आयसीसी’कडून केली जाते. त्यामुळे ‘आयसीसी’ या नियमाबाबत काय भूमिका घेते हे पाहणे उत्सुकतेचे असेल.
कोणते गोलंदाज प्रभावी ठरतील?
‘आयपीएल’मध्ये जगातील अनेल दिग्गज वेगवान गोलंदाज खेळतात. त्यामुळे लाळेचा वापर करण्याची परवानगी दिल्याने ते आपला प्रभाव पाडू शकतील. यामध्ये मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. हे गोलंदाज चेंडू स्विंग करण्यात सक्षम आहे. यासह आनरिक नॉर्किए, कगिसो रबाडा, मार्को यान्सन, ट्रेंट बोल्ट, दीपक चाहर, संदीप शर्मा, मिचेल स्टार्क यांच्यावरही विशेष लक्ष असेल. यापूर्वी लाळेचा वापर करण्याबाबत विचार करण्याची विनंती शमीकडून करण्यात आली होती. सध्यातरी त्याची ही मागणी ‘आयपीएल’साठी तरी पूर्ण झालेली दिसते. नवीन नियमामुळे चेंडूला स्विंग होण्यास मदत मिळेल, असे सिराज म्हणाला. शमीसह टीम साऊदी, व्हरनॉन फिलँडर यांनीही ‘आयसीसी’ने या नियमाचा विचार करावा असे म्हटले होते.
© The Indian Express (P) Ltd