ज्ञानेश भुरे

न्यूझीलंड क्रिकेट संघ कायमच प्रतिस्पर्ध्यांसमोर कडवे आव्हान उभे करत आला आहे. मोठ्या स्पर्धेतील विजेतेपद त्यांच्या नावावर नसेल, तरी प्रतिस्पर्धी संघांमध्ये धडकी भरवण्याची क्षमता त्यांच्यात निश्चित आहे. यंदा ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या ‘अव्वल १२’ फेरीतील पहिल्याच सामन्यात त्यांनी चुणूक दाखवली. त्यांनी सलामीलाच ट्वेन्टी-२० विश्वचषकातील गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला. एकदिवसीय विजेतेपद हुकल्यानंतर न्यूझीलंडला आता ट्वेन्टी-२० विजेतेपद खुणावत आहे. कदाचित यासाठीच त्यांनी संघनिवडीत अनुभवाला अधिक भर दिला आहे.

न्यूझीलंडच्या कामगिरीचे वैशिष्ट्य काय?

विश्वचषक स्पर्धेसाठी अनुभवाला संधी देताना न्यूझीलंडने फलंदाजीची बाजू भक्कम केली आहे. मार्टिन गप्टिल, डेव्हॉन कॉन्वे, डॅरेल मिचेल आणि कर्णधार केन विल्यम्सन अशी अनुभवी फळी न्यूझीलंडने निवडली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये या प्रत्येकाने आपली छाप पाडली आहे. त्यांच्या साथीला ॲलन फिन या युवा फलंदाजाचाही न्यूझीलंडकडे पर्याय आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १६ चेंडूंत ४२ धावांची झंझावती खेळी करत आपल्यातील प्रतिभा सिद्ध केली. गोलंदाजीत टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट ही ताकद आणि त्यांना मिचेल सँटनर आणि ईश सोधीच्या फिरकीची साथ लाभली. लॉकी फर्ग्युसन हे गोलंदाजीतील त्यांचे राखीव अस्त्र. अशा प्रत्येकाचा सूर पहिल्याच सामन्यात जुळून आला आणि न्यूझीलंडने गतविजेत्यांना धक्का दिला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ बाद २०० धावा केल्या. त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव १७.१ षटकांत १११ धावांत गुंडाळला.

विश्लेषण: भारत-पाकिस्तान सामन्याला इतके महत्त्व का? राजकीय तणावाचे क्रिकेटच्या मैदानावरही पडसाद? आर्थिक गणिते काय?

ऑस्ट्रेलियावरील विजयाचे नेमके श्रेय कोणाला?

सलामीवीर फिन ॲलनने १६ चेंडूंत ४२ धावा करून न्यूझीलंडला आक्रमक सुरुवात करून दिली. त्याचबरोबर डेव्हॉन कॉन्वेने सलामीला येऊन पूर्ण २० षटके खेळपट्टीवर टिकणे न्यूझीलंडसाठी निर्णायक ठरले. कॉन्वेने ५८ चेंडूत ९२ धावांची खेळी केली. तसेच ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर फिरकीही किती उपयुक्त ठरू शकते हे सँटनरच्या (४-०-३१-३) गोलंदाजीवरून स्पष्ट झाले. साऊदीने (२.१-०-६-३) आपली अचूकता आणि भेदकता दाखवून दिली. जिमी नीशमने उत्तरार्धातील षटकातील आक्रमक फलंदाजीचा लौकिक कायम राखला.

सामन्यातील निर्णायक क्षण कोणता म्हणता येईल?

कॉन्वे आणि ॲलन यांनी पॉवर-प्लेच्या सहा षटकांत दिलेला ६५ धावांचा तडाखा सर्वांत महत्त्वाचा ठरला. न्यूझीलंडच्या डावात कॉन्वे अखेरपर्यंत टिकून राहिला. नीशामने उत्तरार्धात दाखवलेली आक्रमकता हे निर्णायक क्षण आहेत. मात्र, यानंतरही साऊदीने गोलंदाजीत राखलेली अचूकता, सँटनरने उपयुक्त फिरकी गोलंदाजाची निभावलेली भूमिकादेखील महत्त्वाची ठरली. पॉवर-प्लेमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी २८ चेंडू निर्धाव खेळून काढले. स्टोयनिस आक्रमक होत असतानाच हवेत झेपावून फिलिप्सने घेतलेला झेलही न्यूझीलडंच्या विजयात तितकाच महत्त्व राखून आहे. त्यानंतरच ऑस्ट्रेलियाची पडझड सुरू झाली.

विश्लेषण: वेस्ट इंडिजवर ट्वेन्टी-२० विश्वचषकात प्राथमिक फेरीतून बाद होण्याची वेळ का आली?

पुढील प्रवासात न्यूझीलंडसमोर कोणती आव्हाने?

वैविध्याचा काहीसा अभाव हीच न्यूझीलंडसमोरची सर्वांत मोठी अडचण आहे. दुखापतीमधून सावल्यानंतर कर्णधार केन विल्यम्सनही धावांसाठी धडपडताना दिसून येतो आहे. आयपीएल २०२२ त्याच्यासाठी खास राहिले होते. मात्र, त्यानंतर दुखापतीने विल्यम्सनला घेरले. सँटनर आणि नीशम यांच्याकडे अष्टपैलू खेळाडू म्हणून बघितले जात असले, तरी अलीकडच्या काळात त्यांच्या कामगिरीत सातत्य नाही. वेगवान गोलंदाजीसाठी लॉकी फर्ग्युसन हा उत्तम पर्याय त्यांच्याकडे आहे. मात्र, तो सातत्य राखू शकत नाही. मोक्याच्या वेळी न्यूझीलंडचा संयम ढळतो हाच आजपर्यंतचा इतिहास आहे. या वेळी हा इतिहास बदलतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

न्यूझीलंडला या वेळी किती संधी असेल?

न्यूझीलंडला कमी लेखण्याची प्रतिस्पर्धी अनेकदा चूक करतात. न्यूझीलंड संघ याचा फायदा उठविण्यात वाकबगार आहे. गेल्या दशकभरात न्यूझीलंडने ‘आयसीसी’ स्पर्धांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केलेली आहे. अनेकदा ते उपांत्य फेरीपर्यंत पोचतात. पण, त्यांचा प्रवास तेथेच थांबतो. २०१५मध्ये एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत त्यांनी आपले सर्वोत्तम क्रिकेट खेळले होते. चार वर्षांनी ते एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतही अंतिम लढत खेळले. मात्र, दोन्ही वेळेस ते उपविजेते ठरले. ‘आयसीसी’ कसोटी विजेतेपदही त्यांनी मिळविले आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये ते गेल्या स्पर्धेत उपविजेते ठरले होते. या वेळी त्यांनी सुरुवात तरी झोकात केली असून त्यांना रोखणे प्रतिस्पर्ध्यांना अवघड जाऊ शकेल.

Live Updates
Story img Loader