– ऋषिकेश बामणे
यजमान न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्याद्वारे शुक्रवारपासून महिलांच्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या रणधुमाळीला प्रारंभ झाला. झळाळत्या कारकीर्दीचा शेवट विश्वचषक विजयाने करण्यासाठी भारताची कर्णधार मिताली राज उत्सुक आहे. मात्र असंख्य आव्हानांना सामोरे गतउपविजेता भारतीय संघ पहिले विश्वविजेतेपद जिंकणार का? विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाची बलस्थाने, कच्चे दुवे तसेच विश्वचषकातील अन्य बाबींचा घेतलेला हा सखोल आढावा.
विश्वचषकाचे स्वरूप कसे? नियमांत बदल कोणते?
नियोजित वेळापत्रकाप्रमाणे गतवर्षी विश्वचषक होणे अपेक्षित होते. परंतु करोनामुळे विश्वचषक वर्षभराने लांबणीवर पडला. २०१९मध्ये इंग्लंडला झालेल्या पुरुषांच्या विश्वचषकाप्रमाणे यंदा महिलांचाही विश्वचषक राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळवण्यात येत आहे. १९७३पासून सुरू झालेल्या विश्वचषकाचे यंदा १२वे पर्व आहे. आठ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत प्रत्येक संघ सात सामने खेळणार आहे. विजयासाठी २, बरोबरीत अथवा रद्द करण्यात आलेल्या लढतीसाठी १ गुण संघांना बहाल करण्यात येईल. साखळी सामने बरोबरीत सुटले तर सुपर-ओव्हर खेळवण्यात येणार नाही. उपांत्य फेरीपासून मात्र सुपर-ओव्हरचा पर्याय उपलब्ध असेल. साखळी फेरीच्या अखेरीस गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. ३० आणि ३१ मार्च रोजी उपांत्य फेरीचे सामने रंगतील. ख्राइस्टचर्च येथे ३ एप्रिलला महाअंतिम फेरी होईल.
जैव-सुरक्षेच्या पिंजऱ्यातून सूट; ‘रिव्ह्यू’ही उपलब्ध
स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यासाठी फक्त २० टक्के प्रेक्षकांनाच स्टेडियममध्ये प्रवेश असेल. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन प्रेक्षकसंख्या वाढवण्यात येईल. मात्र खेळाडूंचे मानसिक आरोग्य लक्षात घेता जैव-सुरक्षेच्या नियमांत काहीशी सूट देण्यात आली आहे. खेळाडूंना दररोज करोना चाचणी करण्याचे बंधन नसून त्यांना हाॅटेलमध्येही मुक्तपणे फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याशिवाय महिला विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच सर्व सामन्यांसाठी पंच निर्णय आढावा प्रणाली (डीआरएस) म्हणजेच ‘रिव्ह्यू’ची सुविधा संघांसाठी उपलब्ध असेल. यापूर्वी २०१७मध्ये इंग्लंडला झालेल्या विश्वचषकात फक्त बाद फेरींसाठी ‘रिव्ह्यू’चा वापर करण्याची परवानगी होती. तसेच गेल्या विश्वचषकाच्या तुलनेत यावेळी प्रत्येक डावात एकऐवजी दोनदा ‘रिव्ह्यू’ घेण्याची मुभा आहे.
भारताला कितपत संधी?
भारताने यापूर्वी २००५ आणि २०१७च्या विश्वचषकातील अंतिम फेरीत धडक मारली होती. परंतु दोन्ही वेळेस भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गेल्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात इंग्लंडने अवघ्या ९ धावांनी भारतावर सरशी साधली. परंतु येथूनच महिला क्रिकेटमध्ये क्रांती घडली आणि देशभरात भारतीय संघाचे कौतुक करण्यात आले. त्यातच भारताची प्रमुख फलंदाज मिताली आणि अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी यांचा हा अखेरचा विश्वचषक असेल, हे जवळपास निश्चित आहे. म्हणून भारताकडून पहिल्या जेतेपदाच्या आशा बाळगल्या जात आहेत. न्यूझीलंडविरुद्ध फेब्रुवारी महिन्यात झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताला १-४ असा दारुण पराभव पत्करावा लागला. परंतु सराव सामन्यांत भारताने अनुक्रमे दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांना नमवून अन्य संघांना इशारा दिला. महाराष्ट्राची डावखुरी सलामीवीर स्मृती मानधना आणि किशोरवयीन शफाली वर्मा यांच्यावर भारताचे भवितव्य अवलंबून आहे. स्मृतीने २०२१ या वर्षात सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला. तसेच मधल्या फळीत हरमनप्रीत कौरला सूर गवसल्याने भारताची चिंता कमी झाली आहे. गोलंदाजीत झुलनसह पूनम यादव, पूजा वस्त्रकार यांची कामगिरी निर्णायक ठरेल. युवा रिचा घोष, दीप्ती शर्मा भारतासाठी हुकुमी एक्का ठरू शकतात. रविवार, ६ मार्च रोजी भारताची सलामीच्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी गाठ पडेल. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताल सातपैकी किमान पाच लढती तरी जिंकाव्याच लागतील. अन्यथा त्यांना अन्य निकालांवर अवलंबून राहावे लागेल.
भारताच्या मार्गात अडथळा कोणाचा?
मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाला यंदाही जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक सहा वेळा जगज्जेतेपद मिळवले आहे. तसेच चार वेळा विश्वचषक उंचावणाऱ्या इंग्लंडला कमी लेखणे चुकीचे ठरेल. यजमान न्यूझीलंडचे पारडेही जड आहे. दक्षिण आफ्रिकेने गेल्या वर्षी भारताला एकदिवसीय मालिकेत नमवले. त्यामुळे त्यांच्याकडूनही भारताला कडवी झुंज मिळेल.
या विक्रमांवर नजर
विश्वचषकात भारतीय चाहत्यांच्या दृष्टीने असंख्य विक्रम रचले जाण्याची शक्यता आहे. त्यांपैकी एक म्हणजे भारताची कर्णधार मितालीला (११३९) विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरण्यासाठी ३६३ धावांची गरज आहे. न्यूझीलंडच्या माजी क्रिकेटपटू डेबी हाॅक्ले (१५०१) या यादीत अग्रस्थानी आहेत. त्याशिवाय झुलन गोस्वामीला (३६) विश्वचषकात सर्वाधिक बळी मिळवणारी गोलंदाज बनण्यासाठी अवघ्या चार बळींची आवश्यकता आहे. ऑस्ट्रेलियाच्या निवृत्त क्रिकेटपटू लॅन फुल्स्टाॅन ३९ बळींसह पहिल्या क्रमांकावर आहेत. मिताली सलग सहाव्या विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करेल, हासुद्धा एक विक्रमच. त्यामुळे एकंदरच हा विश्वचषक भारतातील महिला क्रिकेटला अधिक उंचीवर नेण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, यात शंका नाही.
आतापर्यंतचे विजेते
१९७३ : इंग्लंड
१९७८ : ऑस्ट्रेलिया
१९८२ : ऑस्ट्रेलिया
१९८८ : ऑस्ट्रेलिया
१९९३ : इंग्लंड
१९९७ : ऑस्ट्रेलिया
२००० : न्यूझीलंड
२००५ : ऑस्ट्रेलिया
२००९ : इंग्लंड
२०१३ : ऑस्ट्रेलिया
२०१७ : इंग्लंड