आजकाल प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात नॉन-स्टिक भांडी पाहायला मिळतात. नॉन-स्टिक भाड्यांमध्ये एखादा पदार्थ करायचा असेल तर तो कमी तेलात तयार होतो. त्यामुळे असा अनेकांचा समज आहे की, नॉन-स्टिक भांडी वापरणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. पण, खरंच असे आहे का? देशातील सर्वोच्च आरोग्य संस्था असणार्या इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ने नुकतंच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये नॉन-स्टिक भांड्यांच्या वापराविषयी सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे.
त्याऐवजी आयसीएमआरने लोकांना इको-फ्रेंडली भांडी वापरण्याचा सल्ला दिला आहे. इको-फ्रेंडली भांड्यांमध्ये मातीची भांडी आणि कोटिंग नसलेली ग्रॅनाइट दगडाच्या भांड्यांचा समावेश आहे. या संशोधनात संप्रेरकांचे असंतुलन (हार्मोनल इम्बॅलन्स), कर्करोग यांसारख्या संबंधित संभाव्य आरोग्य धोक्यांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या मार्गदर्शक तत्वांमध्ये नक्की काय? नॉन-स्टिक भांडी शरीरासाठी किती घातक आहे? नॉन-स्टिक भांड्यांऐवजी कोणती भांडी वापरावी? याबद्दल जाणून घेऊ या.
हेही वाचा : हवामान बदलामुळे उष्णतेची लाट पुन्हा उसळणार? उष्णतेच्या लाटांचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो?
आयसीएमआर अंतर्गत येणार्या हैदराबादस्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन (एनआयएन) वैज्ञानिक निष्कर्ष आणि बदलती आहार पद्धती लक्षात घेऊन बर्याच वर्षांपासून वापरल्या जाणार्या या भांड्यांच्या वापरासंबंधित धोके निदर्शनास आणून दिले.
नॉन-स्टिक भांडी कशामुळे धोकादायक असतात?
गेल्या अनेक वर्षांपासून भारतीयांच्या स्वयंपाकघरात नॉन-स्टिक भांड्यांचा वापर होत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे गेल्या काही वर्षांत बाजारपेठेत या भांड्यांची विक्री लक्षणीयरीत्या वाढली आहे. ही भांडी तयार करताना वापरण्यात आलेल्या रसायनाला Polytetrafluoroethylene (PTFE) म्हणजेच टेफ्लॉन म्हणून ओळखले जाते. हे कार्बन आणि फ्लोरिन अणूंचा समावेश असलेले कृत्रिम रसायन आहे. हे रसायन पहिल्यांदा १९३० च्या दशकात तयार केले गेले होते. हे रसायन भांड्यांना नॉन-रिॲक्टिव्ह आणि नॉनस्टिक करते. ही भांडी स्वयंपाक करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी अधिक सोयीस्कर असतात आणि थोडे तेल वापरावे लागल्यामुळे लोक नॉन-स्टिक भांडी घेण्यास प्राधान्य देतात. परंतु, या भांड्यांमुळे आरोग्याला हानी होत असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे.
उत्पादनादरम्यान यात वापरण्यात येणार्या perfluorooctanoic acid (PFOA)बद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती. २०१३ मध्ये कूकवेअर उद्योगात या रसायनावर बंदी घालण्यात आली. या रसायनामुळे कर्करोग, थायरॉईडच्या समस्या आणि इतर अनेक आरोग्य समस्या उदभवत होत्या.
नॉन-स्टिक भांड्यांचा वापर पूर्णपणे बंद करावा का?
नॉन-स्टिक वापरण्यास सुरक्षित आहेत, पण त्यावर एखादा चरा पडल्यास त्यात शिजवल्या जाणार्या पदार्थातून घातक रसायन शरीरात जाऊ शकते. टेफ्लॉन भांड्यांमध्ये चरा पडल्यास आणि त्यातील अन्न १७० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात शिजवल्यावर जास्त प्रमाणात विषारी धुके आणि हानिकारक रसायने अन्नामध्ये जाऊ शकतात, असे आयसीएमआर म्हणते. हे हानिकारक रसायन फुफ्फुसावर घातक परिणाम करू शकते. यामुळे पॉलिमर फ्यूम फिव्हर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फ्लूसारखी लक्षणे उद्भवू शकतात. २०२२ मध्ये ‘सायन्स ऑफ द टोटल एन्व्हायर्नमेंट’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या ऑस्ट्रेलियन अभ्यासात असे दिसून आले आहे की, टेफ्लॉनची भांडी ९,१०० मायक्रोप्लास्टिक कण अन्नात सोडू शकते.
“नॉन-स्टिक पॅनवर पडलेल्या चर्यांमधून आपल्या अन्नामध्ये लाखो मायक्रोप्लास्टिक्स जाऊ शकतात. मायक्रोप्लास्टिकमुळे संप्रेरक असंतुलन (हार्मोनल इम्बॅलन्स), प्रजनन समस्या आणि कर्करोगाचा धोकादेखील वाढतो.” असे न्यूयॉर्कस्थित डॉक्टर पूनम देसाई यांनी एका इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये चेतावणी दिली. आयसीएमआरने ॲल्युमिनियम आणि लोखंडी भांड्यांमध्ये आम्लयुक्त आणि गरम अन्नपदार्थ ठेवू नये, असादेखील सल्ला दिला आहे. पितळ आणि तांब्याची भांडी याला अपवाद आहेत.
नॉन-स्टिक भांड्यांऐवजी कोणती भांडी वापरावी?
तज्ज्ञांनी मातीची भांडी वापरण्याचा सल्ला दिला आहे. अन्नपदार्थ शिजवण्यासाठी मातीची भांडी सर्वात सुरक्षित असल्याचे त्यांचे सांगणे आहे. या भांड्यांमध्ये कमी तेलात स्वयंपाक होतो आणि या भांड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नाचे पौष्टिक संतुलन राखले जाते. आयसीएमआरने ग्रॅनाईट दगडी भांडी वापरण्याचादेखील सल्ला दिला आहे. मात्र त्यावर रासायनिक आवरण नसावे याचीही काळजी घेण्यास सांगितले आहे. ग्रॅनाइटची भांडी उष्णता टिकवून ठेवतात.
आयसीएमआर नुसार, स्टेनलेस स्टीलमध्ये शिजवलेले अन्न देखील एक सुरक्षित पर्याय आहे. स्टेनलेस स्टीलची भांडी टिकाऊ असतात आणि त्यांना स्वच्छ करणेदेखील सोपे असते. सिरॅमिक कूकवेअर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवल्यास तेदेखील सुरक्षित असतात.
हेही वाचा : केजरीवालांचा आप पक्ष मनी मनी लाँडरिंग प्रकरणात आरोपी; राजकीय पक्षाला आरोपी ठरवलं जाऊ शकतं का?
नॉन-स्टिक्स भांडी कशी वापरावी?
हेल्थलाइननुसार, नॉन-स्टिक पॅन आधीच गरम करू नका म्हणजेच प्रीहीट करू नका. प्रीहीटची आवश्यकता असेल तर तेल वापरा. दुसरे म्हणजे, कोटिंगचे नुकसान होऊ नये, यासाठी लाकडी किंवा सिलिकॉनची घासणी वापरा. कोटींगचे नुकसान झाल्यास आणि त्यावर चरे पडल्यास या भांड्यांचा वापर टाळा.