दिवाळीच्या दिवशी अनेक घरांमध्ये समृद्धीच्या देवीची म्हणजेच देवी लक्ष्मीची उपासना केली जाते. दोन्ही बाजूला दोन हत्ती, मध्यभागी कमळावर विराजमान लक्ष्मी असे तिचे चित्रण केले जाते, लक्ष्मीची ही प्रतिमा आपल्या प्रत्येकाच्या मनावर कोरली गेलेली आहे. राजा रवी वर्म्यांचा लक्ष्मीचे चित्रण असलेला ओलिओग्राफ तर या भारतीय देवीची जगासाठी ओळख ठरला आहे. परंतु गुप्त कालखंडात राजाच्या नाण्यावर विराजमान झालेल्या देवीच्या या रूपाचा विकास हा हल्लीचा नसून प्राचीन आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लक्ष्मी ही संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्याची देवी आहे. दिवाळीच्या दिवशी ती पृथ्वीवर अवतरते अशी धारणा आहे. दिवाळीच्या दिवशी भक्तांद्वारे तिचे घरोघरी स्वागत केले जाते. लक्ष्मी देवीचे रूप ओळखण्यास सोपे आहे. हत्तींच्या बरोबर कमळावर शांतपणे बसलेली देवी असे चित्रण केले जाते. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये, तिच्या मूर्तिशास्त्रात बदल झाले आहेत आणि कलाकारांद्वारे देवीची विविध प्रकारे कल्पनाकरून तिच्या प्रतिमेत बदल करण्यात आले आहेत. याच देवी लक्ष्मीच्या बदलत्या रूपाचा घेतलेला थोडक्यात आढावा.

इतिहासातील लक्ष्मीचे दृश्य प्रतिनिधित्व

ऋग्वेदात लक्ष्मीचा उल्लेख ‘सौभाग्याचे चिन्ह’ या संदर्भात एकदा आला आहे. अथर्ववेदाच्या काळात (इ. स. पूर्व १०००) देवीच्या रूपाचा विकास बऱ्यापैकी झाला होता. लक्ष्मीला अनेकदा ‘श्री’ म्हटले जाते आणि ‘श्री लक्ष्मी’ हा देवीचा संदर्भ आहे.

इंडॉलॉजिस्ट ए. एल. बाशम यांच्या ‘द वंडर दॅट वॉज इंडिया’मध्ये नमूद केल्याप्रमाणे लक्ष्मी देवी ही ‘सौभाग्य आणि ऐहिक आशीर्वादा’ची देवी आहे. काही दंतकथांमध्ये ‘विष्णूची सहचारिणी’ असल्याचे म्हटले जाते, परंतु इतर काही अभ्यासकांच्या मते तिचे रूप समुद्रमंथनाच्या वेळी अधिक उठावदार दिसून आले.

दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार विष्णूच्या ‘कूर्म’ (कासव) अवताराशी तिचा संबंध आहे. ‘महाप्रलयात अमृतासह अनेक मौल्यवान वस्तू नष्ट झाल्यानंतर, विष्णूने कासवाचा अवतार धारण केला आणि वैश्विक महासागराचा तळ गाठला. त्या कासवाच्या पाठीवर देवांनी मंदार पर्वत ठेवला आणि वासुकी या दैवी सर्पाला पर्वताभोवती गुंडाळून समुद्रमंथन केले… मंथन केलेल्या महासागरातून अमृत आणि देवी लक्ष्मीसह इतर विविध मौल्यवान वस्तू बाहेर आल्या…’ असे बाशम नमूद करतात.

अधिक वाचा: Diwali 2023: दिवाळीत फटाके वाजविणे ही खरंच भारतीय प्राचीन परंपरा आहे का?

बाशम पुढे लिहितात, ‘लक्ष्मी सामान्यत: प्रौढ सौंदर्यावती स्त्री म्हणून चित्रित केली जाते, ती कमळावर विराजमान असते आणि अनेकदा तिच्या हातात कमळ असते, दोन हत्ती त्यांच्या सोंडेतून तिच्यावर पाणी शिंपडतात किंवा अभिषेक करतात”. इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील गांधारकालीन नाण्यांवर लक्ष्मी दोन हत्तींच्या समवेत कमळावर उभी असल्याचे दिसून येते. अयोध्या, कौशंबी आणि उज्जयिनी येथे सापडलेल्या याच काळातील नाणी तिला ‘गजलक्ष्मी’ म्हणून दर्शवतात.

मध्य प्रदेशातील सांची स्तूपाच्या रेलिंगवर दिसणार्‍या दुसऱ्या शतकातील चित्रणामध्ये तिने कुंडले (कानातले) आणि दागिने घातलेले दिसतात. इतर ठिकाणी ती कमळावर विराजमान आहे. तिच्या बाजूचे हत्ती शक्ती आणि निष्ठा दर्शवतात. वेरूळ लेणींमध्ये, ती पती विष्णू आणि त्याचे वाहन गरुडासोबत दिसते. गुप्त काळापर्यंत (इ.स. चौथ्या ते सहाव्या शतकापर्यंत) लक्ष्मीला सर्वात जास्त आदर दिला जात असे. ती सिंहासनावर विराजमान होण्याबरोबरच आणि सिंहावर आरूढ झालेली ‘सिंह-वहिनी’ म्हणून विराजमान झालेली त्या काळातील असंख्य नाण्यांवर दिसते.

संपूर्ण भारतात लक्ष्मीचे लोकप्रिय चित्रण

लक्ष्मीला सार्वभौम रूपात सौंदर्य आणि समृद्धीचे मूर्तिमंत रूप मानले जाते आणि तिच्यासोबत कमळाचा सहवास हे देवीच्या प्रतिमाशास्त्राच्या परिभाषित वैशिष्ट्यांपैकी एक आहे. कमळ हे शुद्धता आणि ज्ञानाचे प्रतीक म्हणून येते. आज देवीचे सर्वात व्यापक प्रतिनिधित्व गजलक्ष्मी, कमळावर बसलेली किंवा उभी असलेली आणि/ किंवा तिच्या हातात कमळ आणि हत्तींसह आहे. उत्तर भारतात तिच्या चार हातांपैकी एका हातातून नाणी खाली पडताना दिसतात, ही नाणी भौतिक आणि आध्यात्मिक संपत्ती दर्शवतात. पश्चिम बंगालमध्ये तिची पूजा विजयादशमीच्या काही दिवसांनंतर केली जाते (बंगालमध्ये दिवाळीत काली पूजा करतात), येथे देवी सहसा तिचे ‘वाहन’ असलेल्या बर्फाळ घुबडासह दिसते.

संपूर्ण पूर्व भारतात, लक्ष्मी आठ विशिष्ट प्रकारचे आशीर्वाद देते, ज्यांना एकत्रितपणे अष्टलक्ष्मी म्हणून ओळखले जाते. यामध्ये आदीलक्ष्मीचा समावेश होतो, जी लोकांना संपत्तीद्वारे त्यांचे ध्येय पूर्ण करण्यास मदत करते; वीरा लक्ष्मी जी शौर्याचे प्रतीक म्हणून चक्र, धनुष्य, बाण आणि तलवार धारण करते; आणि संतान लक्ष्मीने प्रजननक्षमतेचे प्रतीक म्हणून ती लहान बाळासोबत दिसते. दक्षिण भारतात, तंजावूर पेंटिंग्जमध्ये बहुतेकदा तिला सोन्याच्या चौरंगावर कमळ आणि गजांसोबत विराजमान दर्शविले जाते.

अधिक वाचा: भारतातील शक्ती पूजेचा (देवी) सर्वात प्राचीन पुरावा कोणत्या शतकातील? 

कॅलेंडर आर्टचे आगमन आणि त्यातील चित्रण

भारतात मुद्रणालयाच्या स्थापनेनंतर, लक्ष्मीची प्रतिमा अधिक व्यापकपणे प्रसारित झाली. कारण चित्रे आणि मूर्तींच्या तुलनेत घरातील वेदीसाठी तिच्या प्रिंट्स खरेदी करणे अधिक परवडणारे ठरले होते. राजा रविवर्मा (१८४८-१९०६) यांनी ओलिओग्राफ म्हणून छापलेल्या पूर्वीच्या देवतांपैकी लक्ष्मी ही एक होती. या ओलिओग्राफची छपाई तैलचित्रासारखी दिसते, जी भारतीय देवी-देवतांच्या वास्तववादी चित्रणाच्या विस्तृत श्रेणीसाठी प्रसिद्ध आहे. या चित्रांच्या शिळाप्रेसची स्थापना १८९४ मध्ये झाली आणि त्याच्या सर्वात लोकप्रिय छाप्यांपैकी एकामध्ये, लक्ष्मी एका नदी प्रवाहाच्या मध्यभागी कमळावर उभी आहे. पार्श्वभूमीस पर्वत आणि समृद्ध जंगल पाहायला मिळते.

तिने फिकट गुलाबी ब्लाउज आणि गुलाबी साडी परिधान केली आहे आणि ती माफक प्रमाणात सुशोभितही आहे. तिच्या दोन बाजूंना पारंपारिकपणे दिसणार्‍या दोन हत्तींऐवजी राजा वर्मा यांनी फक्त एकच हत्ती रंगवला आहे, त्याच्या सोंडेत फुलमाळा आहे. देवीच्या चार हातांपैकी दोन हातात कमळे आहेत. ती मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाल्यानंतर, वर्मा यांनी साकारलेली लक्ष्मीची प्रतिमा विपणन आणि जाहिरातींमध्ये वापरली गेली, ज्यात ‘टायटॅनिक’ला प्रसिद्ध उत्पादने पुरविणाऱ्या विनोलिया साबण कंपनीने प्रकाशित केलेल्या कॅलेंडरचाही समावेश होता.

समकालीन भारतीय कलेतील देवी लक्ष्मी

लक्ष्मी अनेक दशकांहून अधिक काळ कलाकारांसाठी एक अद्भुत विषय आहे, तिची प्रतिमा नेहमीच कलाकारांच्या कलेत ठळकपणे दिसून येते. १९९० च्या अॅक्रेलिक ऑन कॅनव्हासमध्ये, एम एफ हुसेन यांनी तिला गणेश, लक्ष्मी आणि सरस्वती या पवित्र त्रिमूर्तीचा भाग म्हणून चित्रित केले; हुसेन यांच्या दुसर्‍या एका चित्रात तिने गणेशाला तिच्या मांडीवर घेऊन अधिक घनरूप धारण केले. एन पुष्पमाला यांनी ‘नेटिव्ह वुमन ऑफ साउथ इंडिया: मॅनर्स अँड कस्टम्स’ (२०००-२००४) फोटो-परफॉर्मन्स प्रोजेक्टचा भाग म्हणून, राजा रवी वर्मा यांच्या लक्ष्मीची लोकप्रिय प्रतिमा पुन्हा तयार केली, यावेळी तिला लाल साडीत दर्शविण्यात आले. अतुल दोडिया यांनी २००२ च्या आर्ट इन्स्टॉलेशनमध्ये देवी महालक्ष्मीच्या रूपात रंगवली होती. फोल्ड करण्यायोग्य दुकानाच्या शटरवर चित्रित केलेले, दोडिया यांचे चित्रण हुंड्यासारख्या वाईट गोष्टींविरुद्ध सामाजिक संदेश देणारे होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iconigraphy of lakshmi in indian culture the changing image of goddess lakshmi in indian art and literature svs
Show comments