पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगी सचिव म्हणून एका महिला सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. २०१४ बॅचच्या वरिष्ठ सनदी अधिकारी निधी तिवारी यांची निवड या पदासाठी करण्यात आली. २९ मार्चला पंतप्रधान कार्यालयाकडून सूचना आल्यानंतर कार्मिक विभागाकडून याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला. त्याच दिवसापासून निधी तिवारी या पदावर रुजू झाल्या आहेत.
निधी तिवारी यांचे नवीन पद वेतन मॅट्रिक्सच्या १२ व्या स्तरावर आहे. “मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून कार्यरत असलेल्या निधी तिवारी, आयएफएस (२०१४) यांची वेतन मॅट्रिक्सच्या लेव्हल १२ वर पंतप्रधानांची खासगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे”, असं कार्मिक विभागाने जारी केलेल्या अध्यादेशात म्हटलं आहे.
- जाणून घेऊ निधी तिवारी यांच्याबद्दल..
- निधी तिवारी या २०१४ बॅचच्या वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत.
- निधी तिवारी या त्यांच्या नवीन पदासाठीच्या सर्वात तरुण अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्या मूळच्या वाराणसीतील मेहमूरगंज इथल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ पासून संसदेत या ठिकाणचे प्रतिनिधित्व करत आहेत.
- आयोगाच्या परीक्षेची तयारी करत असताना त्या वाराणसीमध्ये सहाय्यक आयुक्त (व्यावसायिक कर) म्हणून कार्यरत होत्या.
- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०१३ च्या नागरी सेवा परीक्षेत त्या ९६ व्या क्रमांकावर होत्या.
- पंतप्रधान कार्यालयात रुजू होण्यापूर्वी २०२२ मध्ये परराष्ट्र विभागाच्या डिसआर्ममेंट अँड इंटरनॅशनल सेक्युरिटी अफेअर्स शाखेच्या अवर सचिव (Under secretary) म्हणून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली,
- अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसने दिली आहे.
- जानेवारी २०२३ मध्ये त्यांना पंतप्रधान कार्यालयात उपसचिव या पदावर बढती देण्यात आली.
- पंतप्रधान कार्यालयाच्या परराष्ट्र आणि सुरक्षा विभागात त्यांनी काम केले. इथे त्यांनी सुरक्षा, अणुऊर्जा आणि परराष्ट्र कामकाजात त्यांचं योगदान दिलं.
- पंतप्रधान कार्यालयात रुजू झाल्यावर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत परराष्ट्र आणि सुरक्षा विभागात काम करताना त्यांचे परराष्ट्र कामकाजाचे ज्ञान उपयोगी ठरले.
- भारताच्या G20 परिषदेच्या काळात तिवारी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. यापूर्वी विवेक कुमार आणि हार्दिक सतीशचंद्र शाह हे पंतप्रधानांचे खासगी सचिव म्हणून काम पाहत होते.
मणिपूरच्या संघर्षग्रस्त चुराचांदपूर जिल्ह्याचे माजी उपायुक्त पवन यादव यांचीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे खासगी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्तीदेखील मागील आठवड्यातच करण्यात आली.
निधी तिवारी यांची जबाबदारी काय असेल?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खासगी सचिव पदावर असताना निधी तिवारी यांच्यावर पंतप्रधानांच्या दैनंदिन कामात समन्वय राखण्याची जबाबदारी असेल. महत्त्वाच्या बैठकींचं आयोजन आणि वेगवेगळ्या सरकारी विभागांमधील ताळमेळ राखणं या काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्यादेखील त्यांच्यावर असतील.
निधी तिवारी यांनी परराष्ट्र विभागात काम करताना अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आपल्या ज्ञानाचा वापर करत स्वत:ला सिद्ध केलं आहे. सध्या घडत असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निधी तिवारी यांची नियुक्ती महत्त्वाची असल्याचं बोललं जात आहे.