यंदाच्या उन्हाळ्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या तापमान वाढीचा मोठा परिणाम जनजीवनावर होणार आहे. त्याविषयी…

हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

यंदाच्या उन्हाळ्यात म्हणजे मार्च ते मे या काळात देशभरात कमाल, किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील. प्रामुख्याने उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता जास्त राहणार आहे. त्यामुळे दिवसा आणि रात्रीही असह्य उकाडा जाणवण्याचा अंदाज आहे. दक्षिण भारतातील काही राज्ये वगळता महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात यंदा कडक उन्हाळ्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. प्रामुख्याने उत्तर भारत, मध्य भारतात उन्हाळा अधिक कडक जाणविण्याचा अंदाज आहे. राज्यात किनारपट्टी वगळता अन्यत्र कडक उन्हाळा आणि विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटांची शक्यता आहे. तसेच उन्हाळी पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. हा पाऊस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पडण्याचा अंदाज असल्यामुळे उन्हाळी पावसामुळे होणारे नुकसान मोठे असण्याची भीती आहे.

जागतिक स्थिती काय असेल?

प्रशांत महासागरात सध्या सक्रिय असलेला ला निना अगोदरच कमकुवत आहे. तो आणखी कमकुवत होताना दिसत आहे. एप्रिलअखेर ला निना निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. यंदा ला निना असतानाही तापमान वाढ झाल्याचे दिसून आले. कारण ला निना फारच कमकुवत होता, त्यामुळे जागतिक तापमान वाढीवर फारसा परिणाम होऊ शकला नाही. हा ला निना एप्रिलअखेर निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही काळ तटस्थ स्थिती निर्माण होणार आहे. त्यामुळे यंदाच्या नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशात महासागरात कोणतीही वातावरणीय प्रणाली सक्रिय असणार नाही. ला निना सक्रिय असेल तर चांगला पाऊस अपेक्षित असतो. तर एल निनो सक्रिय असेल तर सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता असते. यावेळी तटस्थ स्थिती असल्यामुळे भारतासह दक्षिण आशियात चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा हवामान विभागाला आहे. पण, अद्याप हवामान विभागाने अधिकृतपणे या बाबत काहीही माहिती जाहीर केलेली नाही.

फेब्रुवारीही सरासरीपेक्षा उष्ण?

यंदाचा फेब्रुवारी महिना सरासरीपेक्षा उष्ण ठरला आहे. देशात फेब्रुवारी महिन्यात कमाल तापमान सरासरी २७.५८ अंश सेल्सिअस असते, यंदा ते २९.०७ अंश सेल्सिअस होते. किमान तापमान १३.८२ अंश सेल्सिअस असते, ते १५.०२ अंश सेल्सिअस होते. सरासरीपेक्षा कमाल तापमान १.४९ तर किमान तापमान १.२० अंश सेल्सिअसने जास्त होते. १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यंदा फेब्रुवारी दुसऱ्या क्रमांकाचा उष्ण महिना ठरला आहे. २०२३ च्या फेब्रुवारीत २९.४४ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. फेब्रुवारी महिन्यात देशात सरासरी २१.८ मिलीमीटर पाऊस पडतो, यंदा तो १०.९ मिमी पडला. सरासरीपेक्षा ५०.२ टक्के कमी पाऊस झाला. हिमालयात २४ फेब्रुवारी दरम्यान पश्चिमी विक्षोप म्हणजे थंड हवेचे झोत सक्रिय झाल्यामुळे २६ ते २८ फेब्रुवारी या काळात हिमालयीन रांगांमध्ये तुफान बर्फवृष्टी झाली.

वाढत्या तापमानाचा परिणाम काय?

वाढत्या तापमानाचा सर्वात मोठा फटका गहू पिकाला बसणार आहे. यंदा देशात गहू लागवड ६३२.२७ लाख हेक्टरवर झाली आहे. गहू लागवडीत सरासरीपेक्षा साडेसात लाख हेक्टरने वाढ झाली आहे. या गव्हाची काढणी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होऊन, ती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालेल. गहू पीक पक्व होण्याचा म्हणजे दाणे भरण्याचा काळ फेब्रुवारीपासून सुरू होतो. पण, फेब्रुवारी महिनाही सरासरीपेक्षा उष्ण ठरला आहे. मार्च महिन्यातही सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याचा अंदाज आहे. तापमान वाढ झाल्यास गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होईल. गव्हाचे दाणे लहान राहून वजन कमी भरेल. त्यामुळे लागवडीत वाढ होऊनही उत्पादनात अपेक्षित वाढ होणार नाही. अशीच स्थिती मोहरी पिकाच्या बाबत होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि गुजरातमध्ये मोहरीची लागवड होते. या भागात मोहरीच्या उत्पादनात घट होऊ शकते.

पालेभाज्या, फळभाज्यांची दरवाढ?

दरवर्षी उन्हाळ्यात आणि जून, जुलैमध्ये पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या दरात वाढ होते. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे लागवडी कमी होतात. पिकांची वाढ होत नाही. उष्णतेमुळे लहान रोपे होरपळून जातात. पाण्याच्या टंचाईच्या काळात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिल्यास पालेभाज्या, फळभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे तापमान वाढीचा परिणाम म्हणून पालेभाज्या, फळभाज्यांची दरवाढ होण्याची शक्यता आहे. अलिकडे उत्पादनावर परिणाम होऊन उन्हाळ्यापेक्षा जून, जुलै, ऑगस्टमध्ये जास्त दरवाढ झाल्याचे दिसून येते. यंदाही प्रामुख्याने टोमॅटोसह पालेभाज्यांच्या उत्पादनात घट होऊन दरवाढीचा फटका बसण्याची भीती आहे.

dattatray.jadhav@expressindia.com

Story img Loader