अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांसंबंधित आर्थिक घडामोडींच्या धसक्याने जगभरातील भांडवली बाजारांमध्ये गुंतवणूकदारांनी २७ फेब्रुवारी रोजी तुफान समभाग विक्रीचा मारा केला. परिणामी देशांतर्गत भांडवली बाजारात प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी २ टक्क्यांपर्यंत घसरले. यामागची नेमकी कारणे काय आहेत, याचा वेध
नेमके काय घडले?
विक्रीच्या जोरदार लाटेचा भयंकर तडाखा बसून, सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांनी २०२५ वर्षातील सर्वात वाईट घसरगुंडी शुक्रवार, २७ फेब्रुवारी रोजी नोंदवली. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चिनी उत्पादनांवर अतिरिक्त १० टक्के शुल्क लादण्याच्या ताज्या घोषणेनंतर झालेल्या जागतिक भांडवली बाजारांतील पडझडीचे अधिक भीषण प्रतिबिंब स्थानिक बाजारात उमटताना दिसून आले. सप्ताहअखेरच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये १,४१४.३३ अंशांची म्हणजेच १.९० टक्क्यांनी घसरून ७३,१९८.१० पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने १,४७१.१६ अंश गमावत ७३,१४१.२७ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये सलग आठव्या सत्रात घसरण झाली आणि तो ४२०.३५ अंशांनी (१.८६ टक्के) घसरून २२,१२४.७० पातळीवर बंद झाला.
व्यापार धसका, मिळकत मरगळ
जागतिक व्यापार विश्वातील तणाव आणि अनिश्चितता एकीकडे वाढली आहे. दुसरीकडे, देशांतर्गत कंपन्यांच्या तिमाही मिळकत कामगिरीने केलेली निराशा आणि ग्राहक मागणीतील मरगळ तसेच खासगी क्षेत्रातून आटलेली गुंतवणूकही निरुत्साह वाढविणारी आहे. विदेशी गुंतवणूकदारांच्या निरंतर विक्रीमागेही हीच प्रमुख कारणे आहेत. तीव्रपणे झडत असलेले रुपयाचे मूल्य या विक्रीला अधिकच उत्तेजन देणारे ठरले आहे, असे असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सद्यःस्थितीचे निरीक्षण नोंदविले.
पडझडीत किती नुकसान?
शुक्रवारच्या सत्रातील पडझडीने गुंतवणूकदारांचे सुमारे ७.४६ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. सेन्सेक्समध्ये १४०० अंशांची घसरण झाली आहे. तर निफ्टीने २२,१५० अशांची पातळी मोडत २२,१०४.८५ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला. जागतिक शेअर बाजारातील मंदीचा कल आणि व्यापार युद्धाच्या भीतीने देशांतर्गत भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा सपाटा लावला. परिणामी एका सत्रात गुंतवणूकदारांचे ७.४६ लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले. तीव्र घसरणीनंतर, मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ८.९ लाख कोटी रुपयांनी घसरून ३८४.२२ लाख कोटी (४.४२ ट्रिलियन अमेरिकन डॉलर) रुपयांपर्यंत खाली आले आहे.
ट्रम्प यांच्या टॅरिफबद्दल अनिश्चितता?
कॅनडा आणि मेक्सिकोमधून आयातीवरील २५ टक्के शुल्क आता २ एप्रिलऐवजी ४ मार्चपासून लागू होईल, अशी घोषणा अमेरिकी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. याव्यतिरिक्त, त्यांनी चिनी वस्तूंवर १० टक्के कर लादला आणि युरोपियन युनियनमधून येणाऱ्या निर्यातीवर २५ टक्के कर लावण्याचे सूतोवाच केले आहे. व्यापार धोरणांभोवती असलेल्या या अनिश्चिततेमुळे जगभरातील बाजारांमधील अस्थिरतेत वाढ झाली आहे. कॅनडा आणि मेक्सिकोमधून येणाऱ्या अमेरिकेच्या आयातीवर २५ टक्के कर लागू होण्याची भीती असल्याने ही घसरण झाली. ही दरवाढ पुढील आठवड्यात लागू होणार आहे आणि त्याचबरोबर चिनी वस्तूंवर १० टक्के अतिरिक्त कर लावला जाईल. यामुळे जागतिक व्यापार तोल बिघडण्याची शक्यता असून पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक उदयोन्मुख देशांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
आयटी समाभागांवर दबाव का?
शुक्रवारी जागतिक शेअर बाजार प्रमुख कंपन्यांचे समभाग चार आठवड्यांतील नीचांकी पातळीवर घसरले. जागतिक चिपमेकर कंपनी एनव्हीडिया आणि इतर तथाकथित ‘मॅग्निफिसेंट सेव्हन’ अर्थात वॉल स्ट्रीटवरील मोठ्या कंपन्यांमधील तीव्र समभाग विक्री झाल्यानंतर माहिती तंत्रज्ञानसंबंधित समभागांमध्ये पडझड झाली. जागतिक पातळीवरील आयटी कंपन्यांच्या समभाग घसरणीचे पडसाद देशांतर्गत आघाडीवर उमटले. परिणामी निफ्टी आयटी इंडेक्स ४.२ टक्क्यांनी घसरला, ज्यामध्ये टेक महिंद्र, विप्रो आणि एम्फसिस यांचे समभाग ५ टक्क्यांहून अधिक घसरले.
इतर प्रमुख कारणे कोणती?
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, परकीय गुंतवणूकदारांच्या निधीचे निर्गमन, कंपन्यांची सरलेल्या तिमाहीतील निराशाजनक कामगिरी आणि वाढत्या महागाईमुळे बाजारातील मंदीछाया तीव्र झाली आहे. त्यातच डॉलरच्या बळकटीकरणामुळे जागतिक स्तरावर उदयोन्मुख बाजारातील मालमत्तांवर ताण वाढला आहे. बाजारात अलीकडच्या तीव्र तेजीनंतर, समभागांचे महागलेले मूल्यांकन आणि त्या तुलनेत कंपन्यांची सरलेल्या डिसेंबर तिमाही कामगिरी समाधानकारक नसल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी समभाग विक्रीचा मारा सुरूच ठेवला आहे. अशात, अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांसंबंधित नवनवीन घटनांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. ट्रम्प यांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुनरागमन झाल्याने अमेरिकी डॉलर मजबूत होत असून रुपया कमकुवत होत आहे. परिणामी, रुपयादेखील ८७.५३ प्रति डॉलर असा गाळात गेला आहे. ट्रम्प यांच्या ‘अमेरिका प्रथम’ धोरणाचा परदेशी गुंतवणूक आणि व्यापारावर काय परिणाम होऊ शकतो, याबद्दल अद्याप अनिश्चितता आहे.
परदेशी गुंतवणूकदारांकडून किती विक्री?
आघाडीची रोखे भांडार असलेल्या एनएसडीएलच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये आतापर्यंत परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी १,१३,७२१ कोटी रुपये मूल्याचे समभाग विक्री केले आहेत. फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सुमारे ४७,३४९ कोटी रुपये मूल्याचे समभाग विकले आहेत. मात्र या पडझडीत देशांतर्गत गुंतवणूकदारांनी समभागांची खरेदी सुरू ठेवल्याने बाजारातील घसरण मर्यादित राहिली. देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी फेब्रुवारी महिन्यात ५२,५४४ कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली आहे.
परदेशी गुंतवणूकदारांचे पलायन कशामुळे?
अमेरिकी रोखे ही जगातील सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. सध्या १० वर्षे मुदतीच्या अमेरिकी रोख्यांवरील परताव्याचा दर हा ५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. परिणामी, भारतासह उदयोन्मुख बाजारपेठेत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) चौफेर समभाग विक्रीचा मारा सुरू ठेवला आहे. देशांतर्गत बाजारातून निधी काढून स्वदेशात निधी नेण्यास प्राधान्य देत आहेत. अमेरिकी रोख्यांवरील परतावा दर आणि डॉलर निर्देशांक असाच वर राहिल्यास भारतासह उदयोन्मुख देशांच्या भांडवली बाजारात परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग विक्री तीव्र होण्याची भीती आहे. येत्या काळात अमेरिकी बाजार अधिक आकर्षक राहण्याची शक्यता असून देशांतर्गत आघाडीवर परदेशी गुंतवणूकदारांकडून समभाग विक्री अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
वाढता डॉलर इंडेक्स किती कारणीभूत?
वाढत्या व्यापार युद्धाच्या चिंतेमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण असून प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकी डॉलर अनेक आठवड्यांच्या उच्चांकाच्या जवळ पोहोचला. सहा चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक शुक्रवारी ०.०८ टक्क्यांनी वाढून १०७.३६ वर पोहोचला. भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांसाठी मजबूत होणार डॉलर नकारात्मक आहे. कारण त्यामुळे परकीय गुंतवणूक अधिक महाग होते आणि भांडवल उभारणी करणे देखील जिकरीचे होऊन बसते. डॉलरच्या तुलनेत रुपया ८८ च्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरमध्ये होणारी वाढ आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या अविरत बहिर्गमनामुळे देशांतर्गत चलनातील घसरणीला हातभार लागला आहे. याशिवाय, अमेरिकेच्या व्यापार शुल्काबाबत अनिश्चिततेमुळे महिन्याच्या अखेरीस आयातदारांकडून डॉलरची मागणी वाढल्याने अमेरिकन चलनाचे मूल्य वाढले.
जीडीपी दिलासा देणार?
उत्पादन आणि खाण क्षेत्रांच्या सुमार कामगिरीमुळे आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीत देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन दर (जीडीपी) ६.२ टक्के नोंदवला गेला. या आधी दुसऱ्या तिमाहीतील जीडीपीच्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे. गेल्या सप्टेंबर तिमाहीत जीडीपी वाढ ५.४ टक्के अशी सात तिमाहीतील नीचांकी पातळीवर घसरली होती. मात्र गेल्या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीतील ९.५ टक्क्यांच्या विकासदराच्या तुलनेत यंदा मोठी घसरण झाली आहे. ‘एनएसओ’ने २०२४-२५ या संपूर्ण आर्थिक वर्षासाठी देशाचा विकास दर ६.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे. जानेवारी २०२५ मध्ये जाहीर झालेल्या पहिल्या अग्रिम अंदाजात चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था ६.४ टक्के दराने वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता.