रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या दोन दशकांहून अधिक काळ असलेल्या सत्तेला वॅग्नर गटाच्या बंडाच्या रूपाने हादरा बसला. वॅग्नर ग्रुप या खासगी सैन्याच्या बंडामुळे रशियामध्ये काही काळासाठी अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, वॅग्नर गटाचे प्रमुख येवजेनी प्रिगोझिन आणि रशियन सरकार यांच्यात समेट झाला आहे. परंतु, या बंडामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या बंडानंतर व्लादिमीर पुतिन यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर वॅग्नर ग्रुप काय आहे? हे बंड नेमके का झाले? वॅगनर ग्रुपचे पुढे काय होणार? ही बंडखोरी नेमकी कशी मिटवण्यात आली? रशियापुढे आगामी संकट कोणते असेल? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ या…

बेलारूसच्या अध्यक्षांमुळे संघर्ष टळला

२४ जून रोजी रशियामधील वॅग्नर ग्रुपने बंडखोरी केली. या ग्रुपने रशियातील रोस्तोव्ह-ऑन-डॉन हे शहर ताब्यात घेतले होते. त्यानंतर वॅग्नर ग्रुपच्या सैन्याने मॉस्को शहराकडे कूच केले होते. मात्र, बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांच्या मध्यस्थीने रशियन सरकार आणि वॅग्नर ग्रुप यांच्यातील वाद मिटवण्यात आला.

trump biden netanyahu
Israel vs Iran War: ‘इस्रायलनं सर्वात आधी इराणच्या अणुआस्थापनांवर हल्ले करावेत’, ट्रम्प यांच्या सल्ल्यामुळे चिंता वाढली
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
polio cases rising in afganistan
तालिबानने पोलिओ मोहिमेला स्थगिती दिल्याने अफगाणिस्तानमध्ये विनाशकारी परिणाम? नक्की घडतंय तरी काय? भारतावरही परिणाम होणार का?
Russia interpreted the change as a warning to the West
बदलातून पाश्चिमात्य देशांना इशारा; रशियाचे स्पष्टीकरण
Israel army chief has signaled preparations for a military incursion into Lebanon
लेबनॉनमध्ये सैन्य घुसवण्याची तयारी,इस्रायल लष्करप्रमुखांचे संकेत; हेजबोलाचा क्षेपणास्त्राने हल्ला
EY Ex Employee Exposed
EY Exposed : “४०० इमेल्स पाठवले, पण तरीही प्रमाणपत्र दिले नाहीत”, EY च्या माजी कर्मचाऱ्याचा खुलासा; म्हणाले…
bucha witches
रशियन सैन्याविरोधात युद्धात उतरणाऱ्या युक्रेनच्या ‘बुचा विचेस’ कोण आहेत?
America Britain weapons supply ukraine
विश्लेषण: अमेरिका, ब्रिटनकडून युक्रेनला शस्त्रास्त्रांची संजीवनी… रशियाविरुद्धचे युद्ध निर्णायक टप्प्यावर?

येवजेनी प्रिगोझिन यांनी बंड नेमके का केले?

वॅग्नर ग्रुपचे प्रमुख प्रिगोझिन यांचा रशियाला बराच फायदा झालेला आहे. विशेष म्हणजे सध्याच्या रशिया-युक्रेन युद्धात वॅग्नर ग्रुपने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या युद्धात वॅग्नर ग्रुपने युक्रेनमधील सोलेडार व बाखमु हे दोन प्रदेश रशियाला जिंकून दिले होते. वॅग्नर ग्रुपमुळेच प्रिगोझिन यांना रशियामध्ये प्रसिद्धी मिळाली आहे.

सर्गेई शोईगू व वालेरी गेरासिमोव यांच्याशी प्रिगोझिन यांचा वाद

मागील काही दिवसांपासून रशियाचे संरक्षण मंत्रालय खासगी सैनिकांना सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी एक विधेयक पारित केले जाणार आहे. प्रिगोझिन यांचा मात्र या विधेयकाला विरोध आहे. रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोईगू व सशस्त्र सेनाप्रमुख वालेरी गेरासिमोव यांच्याशी प्रिगोझिन यांचा दीर्घ काळापासून वाद आहे. याच कारणामुळे शोईगू व गिरोसिमोव यांची युक्रेनविरोधातील रणनीती अयोग्य असल्याचा आरोप प्रिगोझिन करतात.

खासगी सैनिकांना सरकारच्या अखत्यारीत आणण्याचा प्रयत्न

रशियन संरक्षण मंत्रालय खासगी सैन्याला स्वत:च्या अखत्यारीत आणण्यासाठी एक विधेयक आणणार आहे, असे प्रिगोझिन यांना समजले. त्यानंतर त्यांना आता काहीतरी करण्याची वेळ आली आहे, असे वाटले. त्यानंतर २४ जून रोजी
प्रिगोझिन यांनी रोस्तोव-ऑन-डॉन या शहरातील दक्षिणेकडील मुख्यालय ताब्यात घेतले. तसेच शोईगू व जनरल गिरोसिमोव यांना आमच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी प्रिगोझिन यांनी रशियन सरकारकडे केली.

वॅग्नर ग्रुप व रशियन सरकारमध्ये समेट; नेमके काय ठरले?

वॅग्नर ग्रुपने रशियातील रोस्तोव-ऑन-डॉन शहराला ताब्यात घेतल्यानंतर रशियन सरकार सतर्क झाले. हे शहर ताब्यात घेतल्यानंतर प्रिगोझिन यांनी एक व्हिडीओ जारी केला होता. या व्हिडीओमध्ये रोस्तोव-ऑन-डॉन शहरातील विमानतळ आणि शहरातील मुख्यालय आमच्या ताब्यात आहे, असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर दक्षिण मुख्यालयात आमची रशियन सरकारशी बोलणी सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले होते. त्यादरम्यान त्यांनी शोईगू व गिरोसिमोव यांना आमच्याकडे सोपवावे, अशी मागणी केली होती. विशेष म्हणजे मागणी मान्य न झाल्यास आम्ही मॉस्को शहराकडे कूच करू, असा इशाराही प्रिगोझिन यांनी दिला होता.

बंडखोरावर योग्य ती कारवाई करू : पुतिन

प्रिगोझिन यांनी मॉस्को शहराकडे कूच करण्याचे जाहीर केल्यानंतर व्लादिमीर पुतिन यांनी लगेच टेलिव्हिजनच्या माध्यमातून रशियन नागरिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी प्रिगोझिन यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी प्रिगोझिन यांच्यावर देशद्रोहाचा आरोप केला. तसेच जो कोणी बंडखोरी करील, त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही पुतिन यांनी दिला.

… तरी वॅग्नर ग्रुपमधील सैनिकांना मॉस्कोकडे कूच करण्याचे दिले आदेश

पुतिन यांच्या या इशाऱ्याला प्रिगोझिन बधले नाहीत. त्यांनी आपल्या वॅग्नर ग्रुपमधील सैनिकांना मॉस्कोकडे कूच करण्याचे आदेश दिले. मॉस्को महामार्गावर वोरोनेझ शहर आहे. हे शहरदेखील वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांनी ओलांडले होते. हे सैनिक मॉस्को शहराच्या अवघ्या २०० किलोमीटर अंतरावर असताना बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को मध्यस्थीसाठी आले.

बेलारुसचे अध्यक्ष लुकाशेन्को यांनी केली मध्यस्थी

प्रिगोझिन यांनी बंड केल्याचे समजल्यानंतर रशियन सरकारला कोणताही रक्तपात न घडवता ही बंडखोरी मोडून काढायची होती. याच कारणामुळे वॅग्नर ग्रुपचे सैनिक कोणत्याही अडथळ्याविना मॉस्कोजवळ पोहोचले होते, असे म्हटले जात आहे. बेलारुसचे अध्यक्ष लुकाशेन्को यांच्याशी प्रिगोझिन यांचे चांगले संबंध आहेत. मागील अनेक वर्षांपासून या द्वयीमध्ये मैत्री आहे. त्यामुळे रशियाला प्रिगोझिन यांच्यासोबत वाटाघाटी करणे सोपे झाले. रशियन सरकार आणि प्रिगोझिन यांच्यात नेमका कोणता करार झाला? काय वाटाघाटी झालल्या, हे अद्याप अस्पष्ट आहे.

प्रिगोझिन यांच्यावर कोणताही खटला भरला जाणार नाही

मिळालेल्या माहितीनुसार- प्रिगोझिन यांनी आपल्या सैनिकांना मॉस्कोकडे कूच करण्यापासून थांबवले आहे. तसेच, रशियासोबत झालेल्या करारानुसार प्रिगोझिन यांना आता बेलारुसमध्ये जावे लागणार आहे. वॅग्नर ग्रुपच्या ज्या सैनिकांनी या बंडामध्ये सहभाग घेतलेला नाही, त्यांना रशियन संरक्षण मंत्रालय करारबद्ध करणार आहे. तसेच ज्या सैनिकांनी बंडामध्ये सहभाग घेतला होता, अशा सैनिकांवर कोणताही खटला भरला जाणार नाही. मात्र, त्यांना आता स्वत:च्या घरी जावे लागणार आहे. तसेच या करारांतर्गत बंडाला चालना दिल्याप्रकरणी प्रिगोझिन यांच्यावर कोणताही खटला भरला जाणार नाही. दरम्यान, बंड केल्यानंतर प्रिगोझिन यांनी शोईगू व गिरोसिमोव यांना सोपवण्याची मागणी केली होती. मात्र, त्या संदर्भात काय निर्णय घेण्यात आला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आता वॅग्नर ग्रुप युक्रेन युद्धाचा भाग असणार का?

वॅग्नर ग्रुपने रशियन सरकारविरोधात बंड केल्यामुळे आता हे खासगी सैनिक युक्रेनविरोधातील युद्धाचा भागा असणार का? असे विचारले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार- वॅग्नर ग्रुपमधील जे सैनिक बंडाचा भाग नव्हते, त्यांच्याशी एक करार केला जाईल. हे करारबद्ध सैनिक युक्रेनविरोधातील युद्धाचा भाग असतील. संपूर्ण वॅग्नर ग्रुप या युद्धात सामील नसेल. वॅग्नर ग्रुप युद्धात नसल्यामुळे रशियावर त्याचा नकारात्मक परिणाम होणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, रशियाने युक्रेन युद्धासाठी साधारण तीन लाख सैनिक तैनात केलेले आहेत. वॅग्नर ग्रुपकडे साधारण २० ते २५ हजार सैनिक आहेत. त्यामुळे या सैनिकांच्या असण्या-नसण्याने रशियावर फारसा परिणाम पडणार नाही. परंतु, वॅग्नर ग्रुपचे सैनिक धाडसी व निर्दयी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे रशियाच्या युद्धतीनीवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

या बंडामुळे पुतिन यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचू शकेल का?

येवगेनी प्रिगोझिन यांच्या बंडामुळे पुतिन यांच्या प्रतिमेला धक्का बसणार का? या बंडामुळे रशियाच्या आगामी राजकारणावर काय परिणाम होणार, असे अनेक प्रश्न उपस्थित केले हात आहेत. मात्र, रशियामध्ये अनेक जण पुतिन यांची वाहवा करत आहेत. रक्ताचा थेंबही न सांडता हे बंड शमवण्यात पुतिन यांना यश आल्याचे तेथे म्हटले जात आहे. वॅग्नर ग्रुपशी असलेला वाद मिटल्यानंतर अनेकांनी तेथे जल्लोष साजरा केला. असे असले तरी पुतिन यांची वाहवा ही अल्पजीवी असू शकते. कारण- आगामी काळात पुतिन यांच्यासारख्या मुत्सद्दी राजकारण्याच्या शासनकाळात अशा प्रकारचे बंड कसे उभे राहू शकते, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो.

पुतिन यांना सर्गेई शोईगू व वालेरी गेरासिमोव यांना पदावरून हटवायचे होते का?

वॅग्नर ग्रुपच्या या बंडाबाबत रशियन समाजमाध्यमांवर वेगवेगळे दावे केले जात आहेत. पुतिन यांना संरक्षणमंत्री सर्गेई शोईगू व सशस्त्र सेनाप्रमुख वालेरी गेरासिमोव यांना त्यांच्या पदांवरून हटवायचे होते. त्यामुळे बंडाचे कथानक पुतिन यांनीच रचले होते, असा दावा काही लोक करत आहेत. यासह प्रिगोझिन यांनी माघार घेताना ‘ठरल्यानुसार आम्ही माघार घेत आहोत’, असे विधान केले होते. त्यामुळेही वॅग्नर ग्रुपने केलेले बंड ही एक नियोजित खेळी होती, असे म्हटले जात आहे.

पुतिन दबावाखाली काम करत होते का?

सर्गेई शोईगू व वालेरी गेरासिमोव यांना त्यांच्या पदांवरून हटवण्यासाठी पुतिन यांनी कट रचला, हे सत्य असेल तर यातून त्यांची दुर्बलताच समोर येते, असे काही लोकांचे मत आहे. शोईगू यांना हटवण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर आतापर्यंत पुतिन दबावाखाली काम करत होते, हे स्पष्ट होते. दुसरी गोष्ट म्हणजे पुतिन यांच्यासारख्या सर्वोच्च नेत्याला शोईगू यांना हटवण्यासाठी त्यांच्या एखाद्या चुकीची किंवा संधीची आवश्यकता आहे का, असादेखील प्रश्न काही लोक उपस्थित करत आहेत.

भारत सरकार या प्रकरणाकडे कसे पाहते?

दरम्यान, रशियामध्ये घडत असलेल्या या घडामोडींकडे भारत सरकारचे लक्ष आहे. मॉस्कोमधील दूतावासाद्वारे भारत सरकारला तेथील सर्व परिस्थितीची माहिती मिळत आहे. सध्या मॉस्कोमधील वातावरण निवळले आहे. त्यामुळे या बंडामुळे घाबरण्याची गरज नाही, असे भारत सरकारचे मत आहे.

वॅग्नर ग्रुपचे पुढे काय होणार?

सध्या तरी वॅग्नर ग्रुप विसर्जित करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मात्र, भविष्यात या ग्रुपची अन्य नावाने पुन्हा एकदा निर्मिती केली जाऊ शकते. सीरिया, लिबिया, आफ्रिका येथील वॅग्नर ग्रुपचे काय होणार, हेदेखील अद्याप अस्पष्ट आहे. या खासगी सैन्याला पुन्हा एकदा पुनरुज्जीवित केले जाण्याची शक्यता आहे. वॅग्नर ग्रुप ही सैनिक पुरवणारी एक खासगी संस्था आहे. या ग्रुपवर रशियन सरकारने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. त्यामुळे या ग्रुपला विसर्जित केल्यामुळे रशियन सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.