अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या मालकीची न्युरालिंक ही कंपनी मानवी मेंदू कॉम्प्युटरशी जोडण्याच्या प्रयत्नात आहे. या मोहिमेत न्युरालिंक कंपनीने महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. या कंपनीला अमेरिकेतील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मानवांवर चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. ही कंपनी नाण्याचा आकार असलेल्या चीपला मानवी मेंदूत टाकून मेंदूला कॉम्प्युटरशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. याच पार्श्वभूमीवर न्युरालिंक ही कंपनी नेमक्या कोणत्या प्रकल्पावर काम करत आहे? हा प्रकल्प यशस्वी झाल्यास काय फायदा मिळणार? या प्रकल्पातील संभाव्य धोके काय आहेत? हे जाणून घेऊ या…
न्युरालिंक कंपनी मेंदूमध्ये चीप टाकणार
एलॉन मस्क यांनी २०१६ साली न्युरालिंक या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीद्वारे मेंदूला एका चीपद्वारे कॉम्प्युटरशी जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजेच मानवी बुद्धीला इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या माध्यमातून सूचना देण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. अर्धांगवायू झालेल्या लोकांना त्यांचे काम पुन्हा करता यावे, अंधत्व दूर करणे, पार्किन्सन्स, स्मृतिभंश, अल्झायमर अशा मेंदूशी निगडित आजारांवर उपचार करण्याचा प्रयत्न या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी कॉम्प्युटराईज्ड चीप मानवाच्या मेंदूत टाकण्यास तसेच मानवावर चाचणी करण्यास अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पावर काम सुरू करण्याचा न्युरालिंकचा मार्ग मोगळा झाला आहे. याआधी या कंपनीने माकडांवर असे प्रयोग केलेले आहेत.
हेही वाचा >> विश्लेषण : झोपडीवासियांना अडीच लाखांत घर देणे का शक्य?
न्युरालिंकचा हा प्रयोग नेमका काय आहे?
न्युरालिंक ही कंपनी नाण्याच्या आकाराची एक चीप मानवी मेंदूत टाकणार आहे. या नाण्यासोबत इलेक्ट्रॉड असलेल्या वायरही असतील. ही चीप मेंदूत टाकून कॉम्प्युटरच्या माध्यमातून मानवी विचारांशी संवाद साधण्याचे काम करण्यात येणार आहे. या आधी मस्क यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी मेंदू यांची सांगड घालण्याबाबत भाष्य केलेले आहे. ‘डिजिटल सुपरइंटेलिजन्समुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांवर मला काम कारायचे आहे. आपण सुपर कॉम्प्युटरपेक्षा हुशार होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही सुपर कॉम्प्युटरला पराभूत करू शकत नाही. त्यामुळे सुपर कॉम्प्युटरसोबत चालायला हवे,’ असे एलॉन मस्क २०१९ मध्ये म्हणाले होते. ‘न्युरालिंक कंपनीकडून एका ब्रेन चीपची निर्मिती केली जात आहे. या चीपच्या मदतीने अपंग लोक चालू शकतील. तसेच नव्याने संवाद साधू शकतील. या चीपच्या माध्यमातून अंधत्व दूर करण्यास मदत होईल,’ असा दावा मस्क यांनी केलेला आहे.
न्युरालिंकच्या प्रयोगाबाबत एलॉन मस्क यांचे मत काय?
न्युरालिंक ही कंपनी सॅन फ्रान्सिस्को येथील समुद्रकिनारा तसेच ऑस्टिन, टेक्सास येथे असलेल्या कार्यालयात मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळे प्रयोग करत आहे. या कंपनीने याआधी प्राण्यांवर प्रयोग केलेले आहेत. तसेच मागील अनेक दिवसांपासून ते हेच प्रयोग मानवांवर करण्याची अमेरिका सरकारकडे परवानगी मागत होते. मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात न्युरालिंक कंपनीने काही निवडक लोकांसमोर त्यांच्या प्रयोगाचे सादरीकरण केले होते. या वेळी एलॉन मस्क यांनी त्यांच्या न्युरालिंक या कंपनीचे तोंडभरून कौतुक केले होते. “आम्ही करत असलेल्या प्रयोगाची अंमलबजावणी मानवांवर केली जाणार आहे. त्यामुळे सध्या या प्रकल्पाची गती मंदावलेली आहे. मात्र आम्ही ही गती वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. जेव्हा ही चीप मानवाच्या शरीरात टाकली जाईल, तेव्हा त्या चीपने उत्तम काम करायला हवे, असा आमचा हेतू आहे. याच कारणामुळे आम्ही यावर खूप काळजीपूर्वक काम करत आहोत. आम्ही संपूर्ण खबरदारी घेत आहोत,” असे तेव्हा एलॉन मस्क म्हणाले होते.
हेही वाचा >> जंतर-मंतरवरील कुस्तीगीर नार्को चाचणी करण्यास तयार; पण ही चाचणी कशी केली जाते? कायदा काय सांगतो?
या प्रयोगाच्या माध्यमातून सर्वप्रथम दृष्टिहीन लोकांना दृष्टी मिळवून देणे तसेच अर्धांगवायू असलेल्या लोकांच्या स्नायूंची हालचाल घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. याबाबत बोलताना, “या प्रयोगामुळे जन्मत:च अंध असलेल्या व्यक्तीलाही दृष्टी मिळू शकते,” असे मस्क म्हणाले होते.
न्युरालिंकच्या प्रयोगाला उशीर
न्युरालिंकला त्यांच्या प्रकल्पासाठी गुरुवारी (२५ मे) अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून हिरवा झेंडा मिळाला आहे. मात्र न्युरालिंकच्या या प्रकल्पाला नेहमीच अपेक्षेपेक्षा उशीर होत आलेला आहे. २०१९ साली एलॉन मस्क यांनी या प्रकल्पासाठी अमेरिका सरकारकडून २०२० पर्यंत मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तसेच अमेरिका सरकार या चीपची मानवी शरीरावर चाचणी करण्यासाठी २०२२ पर्यंत परवानगी देईल, अशी शक्यता मस्क यांनी २०२१ साली व्यक्त केली होती. मात्र मस्क यांनी जाहीर केलेल्या मुदतीच्या आत न्युरालिंक कंपनी अमेरिका सरकारकडून चाचण्यांची परवानगी मिळवू शकली नाही. याच कारणामुळे प्रकल्पाला सातत्याने होत असलेला उशीर लक्षात घेऊन मस्क यांनी २०२२ साली सिंक्रोन या स्पर्धक कंपनीशी गुंतवणूक करण्यासाठी संपर्क साधला होता. न्युरालिंक कंपनीच्या संथ गतीने चालणाऱ्या कामावर तेव्हा मस्क यांनी नाराजी व्यक्त केली होती.
हेही वाचा >> टॅम्पॉन कर म्हणजे काय ? महिलांच्या आरोग्यासाठी टॅम्पॉन का महत्त्वाचे आहेत?
न्युरालिंकच्या तुलनेत सिंक्रोन या कंपनीने या क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. या कंपनीने मागील वर्षाच्या जुलै महिन्यात अमेरिकेत एका रुग्णाच्या शरीरात चीप टाकली होती. २०२१ सालीच अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने या कंपनीला मानवांवर प्रयोग करण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर या कंपनीने ऑस्ट्रेलियामध्ये चार लोकांवर प्रयोग करून त्यावर अभ्यास केला.
मानवी मेंदूत चीप टाकणे धोकादायक ठरू शकते का?
मानवी मेंदूत चीप टाकणे ही बाब वरवर सोपी, उत्कंठावर्धक तसेच आव्हानात्मक वाटत असली तरी यामुळे मानवी शरीरावर वेगवेगळे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. याच कारणामुळे न्युरालिंकने याआधी माकडांवर केलेले प्रयोग वादात सापडले आहेत. न्युरालिंकने या प्रकल्पाशी निगडित माकडे कॉम्प्युटरवर गेम खेळत असल्याचे दाखवले होते. या माकडांच्या मेंदूमध्ये एक चीप टाकण्यात आली होती. कोणाच्याही मदतीशिवाय ही माकडे कॉम्प्युटरवर गेम खेळत होती. मात्र न्युरालिंक ही कंपनी फक्त एक बाजू दाखवत आहे. या प्रकल्पाची दुसरी बाजू झाकून ठेवण्यात येत आहे, असे अनेक तज्ज्ञ तसेच डॉक्टरांचे मत आहे. याच कारणामुळे फिजिशियन कमिटी फॉर रिस्पॉन्सिबल मेडिसिनने युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाविरोधात खटला दाखल केला होता. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया या प्रकल्पात भागीदार होती.
हेही वाचा >> विश्लेषण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या राजदंडावर नंदीसोबत लक्ष्मी कशासाठी?
प्रयोग केल्यानंतर माकडांचे मानसिक आरोग्य ढासळले
या प्रकल्पाशी निगडित उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार प्रयोग करण्यात आलेल्या माकडांना वेगवेगळी इन्फेक्शन्स झाली होती. तसेच या प्राण्यांमध्ये अर्धांगवायू, शरीराच्या आत रक्तस्राव, मानसिक आरोग्य ढासळणे अशी लक्षणे दिसून आली होती. दोन वेगवेगळ्या प्रयोगांमध्ये माकडांच्या कवटीमध्ये पाडलेली छिद्रे बुजवण्यासाठी मान्यता नसलेल्या पदार्थाचा उपयोग करण्यात आला. पुढे हाच पदार्थ मेंदूपर्यंत गेल्याचे आढळले. यातील एका माकडाच्या मेंदूतून रक्तस्राव झाला. तसेच या माकडाला उलट्या झाल्या. यासह या माकडाच्या अन्ननलिकेमध्ये फोड आल्याचेही आढळले.
माकडाच्या अंगाला खाज, आठवड्यानंतर मृत्यू
अॅनिमल-११ नावाच्या दहा वर्षीय माकडावरही अशाच प्रकारचा प्रयोग करण्यात आला होता. या माकडाच्या डोक्यात छित्र पाडण्याचे काम तब्बल सहा तास चालले होते. त्यानंतर या माकडाच्या मेंदूत इलेक्ट्रॉड्स बसवण्यात आले होते. पुढे हे इलेक्ट्रॉड्स संक्रमित झाले. तसेच माकडाची त्वचा झिजू लागली. यासह इलेक्ट्रॉड्समुळे माकडाच्या अंगाला खाज येत होती. पुढे साधारण आठवड्यानंतर या अॅनिमल-११ माकडाचा मृत्यू झाला.
हेही वाचा >> नव्या संसदेत स्थापित केल्या जाणाऱ्या ‘सेंगोल’ राजदंडाला एवढे महत्त्व का? पंडित नेहरूंशी काय संबंध? जाणून घ्या ऐतिहासिक संदर्भ
न्युरालिंक कंपनीकडून केल्या जाणाऱ्या या प्रयोगांवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. रिसर्च अॅडव्होकसीचे संचालक रेयान मेर्कली यांनी मस्क यांना आधुनिक ‘पीटी बारनम’ अशी उपमा दिली आहे. “एलॉन मस्क हे मोठी मोठी आश्वासने देतात. मात्र ते त्यांच्या प्रकल्पांची भयावह माहिती लपवून ठेवतात. आम्ही हीच माहिती बाहेर आणण्याचे काम करत आहोत,” अशी प्रतिक्रिया रेयाम मेर्कली यांनी दिली आहे.
न्युरालिंकच्या प्रयोगाबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात?
न्युरालिंकच्या प्रयोगाबद्दल अनेक तज्ज्ञांची वेगवेगळी मते आहेत. न्यू कॅसल युनिव्हर्सिटीचे न्यूरोसायंटिस्ट प्राध्यापक अँड्र्यू जॅक्सन यांनी २०२० साली याबाबत मत मांडले होते. “मेंदू काम कसे करतो, याबाबत आपल्याला जुजबी माहिती आहे. मेंदूत एखादी चीप टाकणे हे अशक्य आहे, असे म्हणता येणार नाही. मात्र न्युरोसायन्समधील अनेक गोष्टी या अस्पष्ट आहेत,” असे जॅक्सन म्हणाले होते. तसेच अँड्र्यू हॅरिस या प्राध्यापकांनी मानवी मेंदूला कृत्रिम बुद्धिमत्तेशी जोडणे ही कल्पनारम्य बाब आहे, असे मत मांडले आहे. त्यामुळे आगामी काळात एलॉन मस्क यांचा हा प्रयोग किती यशस्वी ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.