– चिन्मय पाटणकर
प्रशांत महासागरातील एल निनो हा घटक २०१६ नंतर यंदा पुन्हा सक्रिय झाला आहे. अमेरिकेतील नॅशनल ओशनिक अँड ॲटमोस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (एनओएए) या संस्थेच्या हवामान अंदाज विभागाने एल निनो सक्रिय झाल्याचे जाहीर केले. ऑगस्टपर्यंत एल निनो सक्रिय होण्याची शक्यता हवामानशास्त्रज्ञांनी या पूर्वीच वर्तवली होती. मात्र प्रत्यक्षात महिनाभर आधीच एल निनो सक्रिय झाला आहे. या पार्श्वभूमीवर एल निनो म्हणजे काय, त्याचे महत्त्व काय, त्याच्या सक्रिय होण्याचे भारतातील पर्जन्यमान, हवामानावर परिणाम काय हे समजून घेणे आवश्यक ठरते.
एल निनो कसा विकसित होतो?
एल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ आहे लिटिल बॉय म्हणजे लहान मुलगा. एन निनो हा हवामानशास्त्रीय घटक आहे. हा हवामान घटक विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सर्वसाधारणपणे दोन ते सात वर्षांनी विकसित होतो. एल निनो विकसित होणे म्हणजे, प्रशांत महासागराच्या मध्य आणि आग्नेय भागातील तापमान वाढते. एल निनो त्याच्या तटस्थ अवस्थेत असताना वारे विषुववृत्ताच्या बाजूने पश्चिमेकडे वाहतात आणि दक्षिण अमेरिकेतील उबदार पाणी आशियाकडे घेऊन जातात. मात्र एल निनो स्थितीवेळी वारे कमकुवत होतात (किंवा उलटही घडू शकते) आणि पूर्वेकडून (दक्षिण अमेरिका) पश्चिमेकडे (इंडोनेशिया) वाहतात. या स्थितीत वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहताना उबदार पाण्याचे प्रवाह मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरात जाऊन पश्चिम अमेरिकेच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचतात. अशा वेळी विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त असते.
जागतिक पातळीवर काय परिणाम होतो?
आजवरच्या इतिहासात जागतिक स्तरावर एल निनो हा घटक तीव्र उष्णतेच्या लाटा, पूर आणि दुष्काळाशी संबंधित आहे. एल निनोमुळे जगभरातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका आणि दुष्काळाचा धोका वाढू शकतो, असे एनओएएच्या हवामान अंदाज विभागाने प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
या वर्षीची एल निनोची स्थिती काय आहे?
यंदाची एल निनोची स्थिती ही २००० नंतरची पाचवी वेळ आहे. म्हणजेच चार ते पाच वर्षांनी एल निनोची स्थिती उद्भवत असल्याचे दिसून येते. चालू वर्षाच्या सुरुवातीला हवामानशास्त्रज्ञांनी ऑगस्टपर्यंत एल निनो सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवला होता. म्हणजेच एल निनोचा परिणाम भारतातील मोसमी पावसाच्या उत्तरार्धात होण्याचा अंदाज होता. मात्र हवामानशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार एल निनो विकसित झाला नाही. तर विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान हवामान प्रारूपाने वर्तवल्यापेक्षा अधिक वेगाने वाढण्याची चिन्हे आहेत. सध्या प्रशांत महासागरात सौम्य स्वरूपाचा एल निनो अस्तित्वात आहे. मे अखेरपासून प्रशांत महासागराच्या सर्वच भागातील तापमान ०.५ अंशांपेक्षा जास्त नोंदले गेले. उत्तर गोलार्धातील हिवाळ्यापर्यंत एल निनो सक्रिय राहण्याची शक्यता हवामान प्रारूपांनी वर्तवली आहे. त्यामुळे नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत एल निनोची अधिक तीव्र राहण्याची शक्यता ८४ टक्के, तर तीव्र एल निनो राहण्याची शक्यता ५६ टक्के आहे.
हेही वाचा : कुतूहल : ‘एल निनो’ आणि ‘ला निना’
एल निनो स्थिती भारतासाठी कितपत चिंतेची?
गेल्या शंभर वर्षांचा आढावा घेतल्यास भारतात १८ वर्षे दुष्काळी होती. त्यातील १३ वर्षे एल निनोशी संबंधित होती. एल निनो आणि भारतातील कमी पर्जन्यमानाचा थेट परस्परसंबंध नसला तरी एल निनो सक्रिय असतानाच्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते. १९०० ते १९५० या दरम्यान सात वर्षे एल निनो घटक सक्रिय होता. त्यानंतर १९५१ ते २०२१ या कालावधीत २०१५, २००९, २००४, २००२, १९९७, १९९१, १९८७, १९८२, १९७२, १९६९, १९६५, १९६३, १९५७, १९५३ आणि १९५१ या वर्षी एल निनो स्थिती उद्भवली होती. त्यावेळी सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला होता. त्यामुळे एल निनो स्थितीची वारंवारता वाढत असल्याचे आणि त्याचा परिणाम पावसाचे प्रमाण कमी होण्यावर झाल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या मोसमी पावसाच्या आगमनादरम्यानच एल निनो स्थिती विकसित झाली आहे. त्यामुळे मोसमी पावसाच्या संपूर्ण हंगामावर या स्थितीचा परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः पावसाच्या हंगामाच्या उत्तरार्धात पावसाचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज आहे. मात्र भारतीय हवामान विभागाने मेअखेरीस वर्तवलेल्या दीर्घकालीन अंदाजानुसार देशात सरासरीइतका पाऊस पडणार असल्याचे म्हटले आहे.
chinmay.patankar@expressindia.com