संदीप नलावडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोठ्या प्रमाणात आणि नियमबाह्य पद्धतीने करण्यात येत असलेल्या मासेमारीमुळे सागरी जैवविविधता धोक्यात आली आहे. मासेमारी क्षेत्रात बड्या कंपन्या उतरल्या असल्याने पारंपरिक मासेमारी नष्ट होऊन चुकीच्या पद्धतीने मासेमारी केली जात असल्याचे दिसून आले आहे. यासाठी जागतिक स्तरावरील प्रसिद्ध सागरी जैवशास्त्रज्ञ आणि मत्स्यसंशोधक डॅनियल पॉली आणि त्यांचे सहकारी रशीद सुमैला यांनी एक याेजना आणली आहे. संयुक्त राष्ट्रांनी सागरी संरक्षित क्षेत्र घोषित करावे, जिथे व्यावसायिक मासेमारीवर पूर्णपणे बंदी असेल. सागरी वन्यजीवांच्या संरक्षणासाठी नियमावली तयार करण्यात यावी, अशी मागणीही या तज्ज्ञांनी संयुक्त राष्ट्रांकडे केली आहे. सागरी जैवविविधता वाचविण्यासाठी तज्ज्ञ करत असलेल्या या प्रयत्नांविषयी…

डॅनियल पॉली कोण आहेत?

डॅनियल पॉली हे एक सागरी जैवशास्त्रज्ञ आहेत. मूळचे फ्रान्स येथील असलेले डॅनियल यांनी जागतिक मासेमारीचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यांवर संशोधन केले आहे. मासेमारी विज्ञानातील तज्ज्ञ असलेल्या डॅनियल यांनी मासेमारीसंबंधित विविध प्रकल्पांवर काम केले आहे. ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ आणि ‘इन्स्टिट्यूट फॉर द ओशन ॲण्ड फिशरी’ यांच्या सागरी मासेमारी प्रकल्पावर ते काम करत आहेत. जागतिक मत्स्य व्यवसायाची तुलना ते एखाद्या चिटफंड किंवा ‘पॉन्झी योजने’शी करतात. पॉन्झी योजनेत प्रवर्तक फसवणूक करण्यासाठी नवीन गुंतवणूकदार शोधतात, त्याप्रमाणेच जागतिक मासेमारी क्षेत्रातील धनाढ्य मंडळी फसवणूक करत आहेत, असे पॉली सांगतात. जुन्या पद्धतीची आणि नियमांना धरून केलेली मासेमारीच सागरी जैवविविधता टिकवून ठेवू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. गेल्याच महिन्यात पॉली आणि त्यांचे सहकारी रशीद सुमैला यांना पर्यावरण क्षेत्रातील नोबेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘टेलर पारितोषिका’ने गौरविण्यात आले.

विश्लेषण: मुंबईतील नालेसफाईचा मुद्दा नेहमी वादात का सापडतो? ही प्रक्रिया भौगोलिक आणि राजकीयदृष्ट्या का महत्त्वाची?

सागरी जैवविविधता वाचविण्यासाठी पॉली यांनी संयुक्त राष्ट्रांना काय निवेदन दिले आहे?

नियमबाह्य पद्धतीने आणि भरमसाट प्रमाणात करण्यात येणाऱ्या मासेमारीचे टीकाकार म्हणून पॉली प्रसिद्ध आहेत. पॉली आणि सुमैला यांनी फेब्रुवारीमध्ये संयुक्त राष्ट्रांना एक निवेदन दिले असून सागरी जैवविविवधता वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे. खोल समुद्राला संयुक्त राष्ट्रे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावे, जिथे व्यावसायिक मासेमारीला पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, असे या निवेदनात म्हटले आहे. मासेमारी योग्य पद्धतीने होण्यासाठी संयुक्त राष्ट्रांकडून पर्यावरणविषयक नियमावली तयार करण्यात यावी, जादा मासेमारीला प्रोत्साहन देणाऱ्या अनुदानांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. जहाज इंधन स्वस्त करणाऱ्या आणि बाजारातील किमती कृत्रिमरीत्या जास्त ठेवणाऱ्या योजनांवर बंदी घालण्यात यावी, असेही त्यांनी संयुक्त राष्ट्रांना सांगितले आहे.

मत्स्यपालन दस्तऐवजीकरण…

पारंपरिक आणि जुन्या पद्धतीच्या मासेमारीचा अभ्यास करण्यासाठी आणि एकूण किती मासेमारी होत आहे हे पाहण्यासाठी या जोडगोळीने मत्स्यपालन दस्तऐवजीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरवर्षी एफएओ (संयुक्त राष्ट्रांची अन्न आणि कृषी संघटना) त्यांच्या सदस्य देशांकडून त्यांच्या मत्स्यपालनाबद्दलची आकडेवारी प्रकाशित करते. परंतु त्यांच्याकडे अचूक आकडेवारी नसते. काही राष्ट्रे नोंदणी नसलेल्या मासेमारीची आकडेवारी पाठवत नाहीत. केवळ छंद म्हणून केली जाणारी मासेमारी, खासगी मासेमारी यांबाबत निश्चित आकडेवारी मिळत नाही. प्रशांत महासागरातील अनेक बेटराष्ट्रे स्थानिक मच्छीमारांनी केलेल्या मासेमारीची नोंद ठेवत नाहीत. दैनंदिन आहारासाठी दररोज मासेमारी करणाऱ्यांचीही नोंद केली जात नाही त्यामुळे ही आकडेवारी अपूर्ण मिळते. मत्स्यपालन दस्तऐवजीकरण करण्यासाठी परिपूर्ण आकडेवारी मिळविण्यासाठी हे शास्त्रज्ञ प्रयत्न करत असून त्यामुळे सागरी पर्यावरणासंदर्भात काम करता येईल, असे या शास्त्रज्ञांना वाटते.

पंतप्रधान मोदी यांच्या पदवीची माहिती उघड का करता येत नाही? केजरीवाल यांना गुजरात उच्च न्यायालयाने दंड का ठोठावला?

सागर संरक्षित क्षेत्रे घोषित केल्याने काय फायदा होणार?

ज्या ठिकाणी मासेमारी कायदेशीररीत्या प्रतिबंधित आहे किंवा पूर्णपणे बंद आहे, अशा क्षेत्रांना सागरी संरक्षित क्षेत्रे म्हणतात. जर एखाद्या विशिष्ट भागात मासेमारी केली तर माशांची संख्या कमी होते. जर अधिक मासेमारी केली तर मत्स्यसंख्या आणखी कमी होते. जर मासेमारी केली नाही, तरीही मत्स्यसंख्येवर परिणाम होतो. त्यामुळे काही ठिकाणे सागर संरक्षित क्षेत्रे घोषित केली तर त्याचा फायदा होत आहे. ही क्षेत्रे घोषित करण्यापूर्वी त्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणात सागर संरक्षित क्षेत्रे घोषित करणेही योग्य नसल्याचे या मत्स्यविज्ञान शास्त्रज्ञांनी सांगितले. डिसेंबर २०२२ मध्ये, १९० हून अधिक राष्ट्रांनी २०३० पर्यंत ३० टक्के जमीन आणि ३० टक्के महासागर संरक्षित करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र त्यासाठी या राष्ट्रांकडून योग्य प्रयत्न केले जाणे आवश्यक आहे. कारण काही राष्ट्रे संरक्षित क्षेत्रे घोषित करतात. मात्र ते कागदावरच असते. तिथे भरमसाट मासेमारी केली जात असल्याचे आढळून आल्याचे पॉली म्हणतात.

पॉली यांच्या योजनेचा जागतिक फायदा काय?

सध्या हवामान बदल आणि पर्यावरणाचा ऱ्हास या समस्यांना जगातील अनेक देशांना सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम सागरी पर्यावरणावरही झाला आहे. माशांसाठी महासागर अधिकाधिक समस्याग्रस्त होत चालला आहे, कारण महासागर हळूहळू डीऑक्सिजेनेटेड होत आहे. जसेजसे पाणी गरम होते, तशी माशांना अधिक ऑक्सिजनची आवश्यकता भासते. हरितगृह वायू उत्सर्जनाची समस्या सोडवली नाही तर ही समस्या अधिक गडद होईल. मत्स्यपालन आणि मासेमारी ही संस्कृती असली तरी त्यासाठी महासागर ओरबाडण्याची गरज नाही. प्रमाणात आणि नियमांचे पालन करून मासेमारी करणे पर्यावरणासाठी योग्य असल्याचे पॉली यांचा अहवाल सांगतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Importance of marine bio diversity conservation restrictions on fishing print exp pmw
Show comments