-अमोल परांजपे
आपला अस्थिर शेजारी पाकिस्तान माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर झालेल्या गोळीबारामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला. खान या हल्ल्यातून बचावले आणि त्यानंतर त्यांनी थेट सरकार आणि पाकिस्तान गुप्तहेर संस्था, आयएसआयवर आरोप केले. यामुळे खान यांची लोकप्रियता आणखी वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात असून नव्या आघाडी सरकारसाठी ही डोकेदुखी ठरू शकते. यातून मार्ग काढण्यासाठी आणि खान यांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शरीफ बंधूंना बरेच कष्ट घ्यावे लागतील. त्यात नव्या लष्करप्रमुखाच्या नियुक्तीवरही बरेच काही अवलंबून असेल.
खान यांच्या हल्ल्याचा राजकीय परिणाम काय?
सरकार तातडीने बरखास्त करून ‘नॅशनल असेंब्ली’च्या (पाकिस्तानचे कायदेमंडळ) मध्यावधी निवडणुका घ्या, ही मागणी करत खान यांनी काढलेल्या मोर्चादरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाला आणि ते जखमी झाले. एकीकडे त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू असतानाच त्यांच्या पक्षाने विद्यमान सरकारवर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करून टाकला. या हल्ल्याचे आदेश पंतप्रधान शहाबाज शरीफ, गृहमंत्री राणा सनौल्ला आणि आयएसआयचे वरिष्ठ अधिकारी जनरल फैजल नासीर यांनी दिल्याचे सांगितले गेले. हल्ल्याचा राजकीय फायदा उचलण्याचा खान यांचा मनसुबा पहिल्याच दिवशी उघड झाला.
हल्ल्यावर पाकिस्तानात कोणत्या राजकीय प्रतिक्रिया उमटल्या?
गोळीबाराचे वृत्त समजताच पंतप्रधानांसह बहुतांश मंत्री आणि मुख्य म्हणजे पाकिस्तानच्या लष्कराने हल्ल्याचा निषेध केला. खान हे आपले शत्रू नाहीत, तर केवळ राजकीय प्रतिस्पर्धी आहेत असे शरीफ यांनी जाहीर केले. खान या हल्ल्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर करणार, याची कल्पना सत्ताधाऱ्यांना आली असणार. त्यामुळे अटक केलेल्या हल्लेखोराच्या कबुलीजबाबाची चित्रफीत माध्यमांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्थाही केली गेली. ‘खान यांनी पाकिस्तानी जनतेची फसवणूक केल्यामुळे त्यांना ठार मारायचे होते. हल्ल्याचा निर्णय मीच घेतला. मला कुणीही आदेश दिले नाहीत,’ असे मोहम्मद नावीद हा या चित्रफितीत हल्लेखोर सांगतो. सरकारच्या आशीर्वादाशिवाय चित्रफीत माध्यमांपर्यंत पोहोचणे तसे कठीण असल्याने हल्ल्यासाठी दोषी धरले जाऊ नये, हा प्रयत्न दिसतो.
हल्ल्यानंतर इम्रान खान यांची भाषा का बदलली?
आपले सरकार पाडण्यात अमेरिकेचा हात आहे, असा आरोप करणाऱ्या खान यांची भाषा अचानक बदलली. ‘तो विषय माझ्यासाठी संपला आहे,’ असे जाहीर करून त्यांनी आधीच्या सरकारांना लक्ष्य करायला सुरुवात केली. ‘अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध मालक-नोकर किंवा मालक-गुलाम असे असून सुपारीबाज गुंडाप्रमाणे पाकिस्तानचा उपयोग केला जातो. मात्र याला अमेरिकेपेक्षा पाकिस्तानी राज्यकर्तेच अधिक जबाबदार आहेत,’ असा नवा सूर त्यांनी लावला आहे. आपल्याच पूर्वसुरींना बदनाम करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याची ही खेळी राजकारणात नवी नसली तरी आता खानांचे नाव त्या यादीत समाविष्ट झाले आहे, असे म्हणता येईल. त्यांच्या या नव्या आरोपामागे डिसेंबरमधील एक संभाव्य घटना कारणीभूत असू शकेल.
नवाझ शरीफ पाकिस्तानात परतल्यास चित्र बदलेल?
पाकिस्तानचे तीन वेळा पंतप्रधान राहिलेले नवाझ शरीफ लंडनमधील राजकीय विजनवास संपवून डिसेंबरमध्ये मायदेशी परतणार असल्याचे वृत्त आहे. याचा सत्ताधारी पक्षांना मोठा फायदा होऊ शकतो. सध्या पाकिस्तानात सर्वात लोकप्रिय नेता कोण, असे विचारले तर बोट इम्रान खान यांच्याकडेच जाते. नवाझ पाकिस्तानात परतल्यास ते खान यांच्या या लोकप्रियतेला थोडे ग्रहण लावू शकतात. शिवाय नवाझ आपला भाऊ शहाबाज यांच्यापेक्षा राजकारणात अधिक मुरलेले आहेत. त्याचा फायदा पाकिस्तान मुस्लीम लिग (नवाझ) या त्यांच्या पक्षाला होऊ शकतो. या राजकीय घडामोडींमध्ये सर्वात कळीचा मुद्दा ठरणार आहे तो नव्या लष्करप्रमुखांच्या नियुक्तीचा…
जनरल बाजवा निवृत्त होणार की मुदतवाढ घेणार?
पाकिस्तानच्या इतिहासामुळे लष्करप्रमुख पद पंतप्रधान, राष्ट्राध्यक्षांपेक्षा महत्त्वाचे बनले आहे. तिथली सरकारे लष्कराच्या आशीर्वादावरच चालत असतात. त्यामुळे लष्करप्रमुख कोण होणार, हा कळीचा मुद्दा आहे. विद्यमान लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा हे नोव्हेंबरअखेर निवृत्त होत आहेत. त्यांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत शरीफ सरकारने पत्ते उघड केलेले नाहीत. याच्या दोन शक्यता सांगितल्या जात आहेत. एक तर बाजवा पायउतार होतील आणि त्यांच्या जागी नव्या, शरीफधार्जिण्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाईल किंवा जनरल बाजवांना दुसरी मुदतवाढ मिळेल. तसे झाल्यास त्यांचा लष्करावर आणि पर्यायाने सरकारवर असलेला वचक सिद्ध होईल. मात्र लष्करप्रमुख बदलले गेल्यास मध्यावधी निवडणुकीची शक्यता अधिक वाढेल.
मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता किती?
नवाझ शरीफ निवडणुकीच्या ऐन तोंडावर पाकिस्तानात येतील, असे सांगितले जात होते. मात्र अचानक त्यांचा कार्यक्रम बदलला. त्यामुळे इम्रान खान यांच्या मागणीनुसार सरकार खरोखरच निवडणुकांना तयार होईल, अशी शक्यता आहे. पीएमएल (नवाझ) पक्षाने ही शक्यता फेटाळली असली तरी आघाडी सरकार चालवण्याची कसरत करत राहण्यापेक्षा स्थिर सरकारसाठी जनतेला सामोरे जावे, असाही एक मतप्रवाह पक्षात असू शकतो. तसे झाल्यास पाकिस्तानमध्ये इम्रान विरुद्ध नवाझ असा थेट सामना बघायला मिळेल. मात्र पाकिस्तानचा रक्तरंजित राजकीय इतिहास पाहता इतक्या सोप्या पद्धतीने तिथे निवडणुका आणि सरकारे स्थापन होत नाहीत. येत्या महिन्याभरात, लष्करप्रमुखांच्या नियुक्तीचा पेच संपल्यावर काही बाबी अधिक स्पष्ट होऊ शकतील.