पाकिस्तनातील इस्लामाबादमध्ये सुरू असलेले आंदोलन हिंसक स्वरूप घेताना दिसत आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेची मागणी करीत हजारोंच्या संख्येने इम्रान यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. पाकिस्तानातील लष्कर आणि आंदोलकांमध्ये संघर्ष सुरू आहे. या रक्तरंजित संघर्षात आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांची पत्नी बुशरा बीबी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे सदस्य, इतर नेते आणि पाकिस्तानातील इम्रान खान यांचे हजारो समर्थक रविवारपासून इस्लामाबादकडे मार्गक्रमण करीत आहेत. ते खान यांची तुरुंगातून सुटका करण्याची, तसेच नुकत्याच झालेल्या निवडणुका रद्द करण्याची मागणी करीत आहे. परंतु, इम्रान खानसमर्थक यांच्याकडून व्यक्त केल्या जाणाऱ्या निषेधाचे कारण काय? पाकिस्तानमध्ये नक्की काय घडत आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिंसक आंदोलन

‘सीएनएन’नुसार, मंगळवारी सकाळी इस्लामाबादमधील झिरो पॉईंटवर आंदोलक जमले. ‘इंडिया टुडे’च्या वृत्तानुसार, आंदोलकांनी डी-चौकाकडे आपला मोर्चा वळवला आहे. डी-चौकाला अनेकदा लोकशाही चौक किंवा गाझा चौक म्हणून ओळखले जाते. या चौकाजवळ इस्लामाबादमधील अनेक महत्त्वाच्या सरकारी इमारती आहेत. ‘अल जझिरा’नुसार, खान यांचे समर्थक डी-चौकापासून १० किलोमीटरहून कमी अंतरावर आहेत. पाकिस्तानी रेंजर्सना संरक्षणासाठी तैनात करण्यात आले आहे. ‘अल जझिरा’तील वार्ताहर कमल हैदर यांनी परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण असल्याचे म्हटले आहे. “आंदोलक आता शहरात आहेत. पोलीस आंदोलकांना रोखण्यासाठी हिंसक पावले उचलत आहेत, ही मोठी चिंतेची बाब आहे,” असे हैदर म्हणाले. हैदर पुढे म्हणाले की, आंदोलक डी-चौकात पोहोचण्यासाठी अनेक प्रयत्न करीत आहेत.

माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेची मागणी करीत हजारोंच्या संख्येने इम्रान यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एका भारतीयावर सोपवली मोठी जबाबदारी; कोण आहेत जय भट्टाचार्य?

“इथेच ते आपल्या मागण्या सरकारकडे मांडणार आहेत. त्यामुळे खरोखरच परिसरात भीषण तणाव आहे,” असे ते पुढे म्हणाले. ‘सीएनएन’ने ‘पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’च्या डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सांगितले की, चार सुरक्षा अधिकारी आणि एका नागरिकासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक सूत्रांनी सांगितले की, एक कारही आंदोलकांवर चढवण्यात आली होती. ‘डॉन’च्या वृत्तानुसार गृहमंत्री मोहसीन नकवी यांनी शहीद झालेल्या चार रेंजर्स जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. परंतु, चार सैनिक मारले गेले असले तरी त्यांची ओळख पटलेली नाही. आम्ही शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे आहोत आणि सदैव त्यांच्याबरोबर राहू, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. एकट्या पंजाब प्रांतात, एका पोलिस अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले आणि किमान ११९ जण जखमी झाले. इस्लामाबादबाहेर आणि इतरत्र झालेल्या चकमकींमध्ये २२ पोलिस वाहने जाळण्यात आली, असे प्रांतीय पोलिस प्रमुख उस्मान अन्वर यांनी सांगितले. दोन अधिकाऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले. खान यांच्या पक्षाने सांगितले की, त्यांचे अनेक कार्यकर्तेदेखील जखमी झाले आहेत.

आंदोलनाचे कारण काय?

“हा शांततापूर्ण निषेध नाही. हा अतिरेक आहे,” असे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी त्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. चुकीचा राजकीय अजेंडा साध्य करण्याच्या उद्देशाने हा रक्तपात घडवून आणला जात आहे. हा अराजकता पसरविण्याचा प्रयत्न आहे, असे ते पुढे म्हणाले. खान यांची पत्नी बुशरा बीबी आणि खैबर पख्तुनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांनी मंगळवारी पहाटे राजधानीत मोर्चा काढला. इस्लामाबादमधील प्रमुख रस्ते रोखण्यासाठी सरकारने शिपिंग कंटेनरचा वापर केला आहे. तसेच परिसरात पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांची गस्त आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आंदोलकांना दूर ठेवण्यासाठी सर्व सार्वजनिक वाहतूकदेखील बंद करण्यात आली आहे.

पाकिस्तानातील लष्कर आणि आंदोलकांमध्ये संघर्ष सुरू आहे. या रक्तरंजित संघर्षात आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू झाला आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

प्रांतीय माहिती मंत्री उज्मा बुखारी यांनी सांगितले की, खान यांच्या सुमारे ८० समर्थकांना अटक करण्यात आली आहे. संरक्षणमंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी स्थानिक ‘जिओ न्यूज टीव्ही’ला सांगितले की, परिस्थिती शांत करण्यासाठी सरकारने खान यांच्या पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. ते म्हणाले, “हा एक प्रामाणिक प्रयत्न होता; पण त्याचा काही परिणाम झाला नाही.” सुरक्षा दलांनी आंदोलकांना तोंड देताना अत्यंत संयम दाखवला. पोलिसांनी फक्त रबर बुलेटचा वापर केला आणि ज्यापैकी काहींनी थेट गोळीबार केल्याचे त्यांनी सांगितले.

आंदोलकांना रोखण्यासाठी हिंसक पावले

इम्रान खान यांच्या पक्षाने सरकारवर आंदोलकांना रोखण्यासाठी अत्याधिक हिंसाचाराचा वापर केल्याचा आरोप केला आहे आणि शेकडो कामगार व नेत्यांना अटक करण्यात आल्याचे सांगितले. “ते थेट गोळ्या झाडत आहेत,” असे खान यांचे एक सहकारी शौकत युसुफझाई यांनी ‘जिओ न्यूज’ला सांगितले. रॉयटर्स टीव्ही आणि स्थानिक टीव्ही फुटेजमध्ये पोलिसांनी खान यांच्या समर्थकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याचे दृश्यात दिसून येते. तसेच आंदोलक पोलिसांवर दगड आणि विटांनी हल्ले करीत असल्याचेही पाहायला मिळत आहे. इस्लामाबादच्या अगदी बाहेर मुख्य मोर्चात वाहने आणि झाडे जळत असल्याचे व्हिडीओंमध्ये दिसून आले आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तानुसार, सोशल मीडियावरील व्हिडीओमध्ये खान यांच्या समर्थकांनी गॅस मास्क आणि संरक्षणात्मक गॉगल घातल्याचे दिसून आले. ज्येष्ठ नेते कामरान बंगश यांनी सांगितले की, हे निर्धारित आहे आणि आम्ही इस्लामाबादला पोहोचू. “आम्ही एकेक करून सर्व अडथळ्यांवर मात करू,” असे बंगश पुढे म्हणाले.

हेही वाचा : आता उपचारासाठी इंजेक्शनची गरज नाही? शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या कॅप्सूल काय आहेत? त्या कशा उपयुक्त ठरणार?

“कलम २४५ अंतर्गत, पाकिस्तानी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे,” असे ‘रेडिओ पाकिस्तान’ने म्हटले आहे. “दुष्कृत्ये आणि त्रास देणाऱ्यांना दिसता क्षणीच गोळ्या घालण्याचे स्पष्ट आदेशही जारी करण्यात आले आहेत,” असे त्यात म्हटले आहे. सुरक्षा स्रोतांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरेकी घटकांद्वारे दहशतवादी कारवायांना सामोरे जाण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव इस्लामाबादमधील सर्व शैक्षणिक सुविधा बंद करण्यात आल्याचे ‘ब्लूमबर्ग’ने म्हटले आहे. राजधानीच्या काही भागांतील इंटरनेट सेवाही खंडित करण्यात आली आहे आणि पाचपेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imran khans supporters have left islamabad in chaos rac