-रेश्मा राईकवार
करोनाने जगाला पछाडल्यानंतरच्या पहिल्या काही महिन्यांतच ‘ओव्हर द टॉप’ (ओटीटी) नावाने आलेली, जगभरातील आशय (कन्टेंट) वेबमालिका या नव्या प्रकारातून लोकांपर्यंत पोहोचवणारी माध्यमे घरोघरी लोकप्रिय झाली. भारतात तर मालिका-चित्रपट बंद झाल्यामुळे ओटीटी हेच एकमेव मनोरंजनाचे माध्यम लोकांकडे होते. त्यामुळे एप्रिल ते जून २०२० या चारच महिन्यांत भारतातील ओटीटीवरील कन्टेंट शुल्क देऊन पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या ३१ टक्क्यांनी वाढली होती. पुढे हाच आकडा वाढता राहिला आणि आता देशभरातील प्रेक्षक केबल टीव्हीला सोडचिठ्ठी देऊन ओटीटी माध्यमाकडेच वळणार, अशा चर्चाही सुरू झाल्या. भारतात तरी अजून तसे घडले नसले तरी अमेरिकेत मात्र ओटीटीने केबल टीव्हीला मागे टाकले आहे. नील्सन कंपनीच्या अहवालानुसार, अमेरिकेतील एकूण मनोरंजन माध्यमांपैकी ओटीटी पाहणाऱ्यांचे प्रमाण ३४.८ टक्के झाले आहे. हे प्रमाण ब्रॉडकास्ट वाहिन्या आणि केबल माध्यमातून पाहिल्या जाणाऱ्या वाहिन्यांच्या प्रेक्षकसंख्येहून अधिक आहे.
ब्रॉडकास्ट, केबल आणि ओटीटी…
आपल्याकडे जशा काही विनाशुल्क वाहिन्या (फ्री टु एअर) आहेत, तशाच वाहिन्या अमेरिकेत ब्रॉडकास्ट टेलीव्हिजन म्हणून ओळखल्या जातात. या वाहिन्यांना केवळ जाहिरातीतून वा देणगीतून उत्पन्न मिळते. तर केबलवर सशुल्क वाहिन्या उपलब्ध असतात. ब्रॉडकास्ट आणि केबल वाहिन्यांवरचा कन्टेंट, शिवाय जगभरातील कन्टेंट विविध अॅपच्या माध्यमातून दाखवणाऱ्या ओटीटी वाहिन्या हे तुलनेने नवे आणि तिसरे माध्यम. मात्र सध्या हे नवे माध्यमच अमेरिकेत जुन्यांपेक्षा वरचढ ठरले आहे. नील्सनच्या अहवालानुसार ओटीटी वा डिजिटल वाहिन्या पाहण्याचे प्रमाण वाढल्यानंतर ब्रॉडकास्ट वाहिन्या पाहणे कधीच मागे पडले होते. मात्र आता केबलवर कन्टेंट पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही ओटीटीच्या प्रेक्षकसंख्येने मागे टाकले आहे. अमेरिकेत ब्रॉडकास्ट आणि केबलवर वाहिन्या पाहणाऱ्यांचे प्रमाण हे अनुक्रमे २१.६ आणि ३४.४ टक्के एवढे आहे, तर ओटीटीची प्रेक्षकसंख्या अंमळ पुढे सरकली आहे.
ओटीटी वाहिन्यांसाठी शुभवार्ता…
नील्सन कंपनीचा हा अहवाल जगभरातील प्रसिद्ध ओटीटी कंपन्यांसाठी सुखद धक्का ठरला आहे. ऑगस्ट पंधरवड्यापासून सप्टेंबरपर्यंत अनेक मोठ्या ओटीटी कंपन्यांनी आपल्या प्रसिद्ध वेबमालिका प्रदर्शित करण्याचा धडाका सुरू केला आहे. एचबीओ मॅक्सच्या ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या प्रसिद्ध वेबमालिकेचा पुढचा भाग म्हणून प्रदर्शनाआधीच चर्चेत असलेली ‘हाऊस ऑफ ड्रॅगन’ ही वेबमालिका प्रदर्शित झाली आहे. भारतात डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही मालिका पाहायला मिळणार आहे. तर १ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज : द रिंग्ज ऑफ पॉवर’ या बहुचर्चित वेबमालिकेवर प्राईम व्हिडिओची मदार आहे. मोठमोठ्या कलावंतांचा सहभाग असलेल्या, बिज बजेट आणि प्रसिद्ध मालिकांचा सिक्वल म्हणून प्रदर्शनाच्या तयारीत असलेल्या अशा नव्या मालिकांपोटी १ अब्ज डॉलर्स पणाला लागले आहेत. त्यामुळेच की काय… अमेरिकेत ओटीटीची बाजारपेठ वेगाने वाढते आहे ही बाब या कंपन्यांसाठी शुभवार्ता ठरली आहे.
‘स्ट्रेंजर थिंग्ज’ने तारले…
ओटीटी वाहिन्यांची संख्याही जगभरात झपाट्याने वाढत असली तरी काही प्रमुख कंपन्यांमधील चुरस या माध्यमाच्या वेगवान वाटचालीसाठी महत्त्वाची ठरते आहे. आत्तापर्यंत अधिकाधिक प्रेक्षकसंख्या खेचून घेणाऱ्या ओटीटी वाहिन्यांमध्ये प्राईम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, हुलु आणि युट्यूब यांचा सहभाग अधिक राहिला आहे. नेटफ्लिक्सला मध्यंतरी अनेक समस्यांचा सामना करावा लागला असला तरी इतर सगळ्या वाहिन्यांपेक्षा नेटफ्लिक्स पाहणाऱ्यांची संख्या अजूनही सर्वाधिक म्हणजे ८ टक्के इतकी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘स्ट्रेंजर थिंग्ज’ या वेबमालिकेने नेटफ्लिक्सचे प्रेक्षक परत आणले, असे हा अहवाल सांगतो. ओटीटी पाहण्याचा वेळही जुलै महिन्यात सर्वाधिक म्हणजे १९१ अब्ज मिनिट्स इतका होता. हे प्रमाण इतके झपाट्याने वाढते आहे की एकेकाळी केवळ खेळांचे प्रसारण दाखवून लोकप्रिय झालेल्या क्रीडा वाहिन्यांचा प्रेक्षकही ओटीटी माध्यमांनी आपल्याकडे वळवून घेतला असल्याची माहिती नील्सन कंपनीच्या अहवालात देण्यात आली आहे.
भारतात अजून तरी ओटीटीला पर्याय कायम…
भारतात ओटीटीचा प्रेक्षक झपाट्याने वाढतो आहे आणि ही बाब याआधीच केबल कंपन्या – डीटीएच सेवा पुरवठादारांसाठी डोकेदुखी झाली आहे. केपीएमजीच्या अहवालानुसार २०२३ पर्यंत भारतात ५० कोटींहून अधिक प्रेक्षक हे ओटीटी ग्राहक असतील. त्याचा परिणाम साहजिकच केबल आणि डीटीएच सेवांच्या ग्राहकांवर झाला आहे. सध्या ५५ टक्के भारतीय प्रेक्षक हे डीटीएच सेवांपेक्षा ओटीटीला प्राधान्य देताना दिसतात. पुढच्या वर्षभरात आणखी ४४ टक्के भारतीय केबल सेवा खंडित करून ओटीटीकडे वळतील, असा अंदाज वर्तवला जातो आहे. हे सगळे खरे असले तरी डीटीएच सेवा आणि केबल सेवा पूर्णपणे बंद होऊन केवळ ओटीटी हेच प्रेक्षकांचे मनोरंजनाचे साधन असेल हे चित्र भारतात तरी अवघड आहे. डीटीएच सेवा आल्या तरी केबल पूर्णपणे बंद झाल्या नाहीत, उलट अनेक ठिकाणी दोघांनी एकमेकांशी हातमिळवणी करत आपापले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. ओटीटी आणि डीटीएच सेवा या दोन्हीही डिजिटल आशय देणाऱ्या, सशुल्क सेवा आहेत. अनेक डीटीएच सेवांद्वारे ओटीटी वाहिन्या पाहिल्या जाऊ शकतात. त्यामुळे डीटीएच सेवांचे अस्तित्वच संपवण्यापेक्षा या दोन्ही सेवा भारतात कमीअधिक प्रमाणात कार्यरत राहतील. अजूनही देशात अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा पोहोचलेली नाही, कित्येक ठिकाणी या सेवेचा दर्जा चांगला नाही. अशा अनेक बाबी अडथळे बनून ओटीटी कंपन्यांसमोर आहेत. त्यामुळे भारतात अजून तरी ओटीटी माध्यमेच इतर सेवांपेक्षा वरचढ ठरतील हे चित्र दिसणार नाही, असं मनोरंजन उद्योगातील जाणकार सांगतात.