‘हरिकेन मिल्टन’ नामक चक्रीवादळाने सध्या अमेरिकेच्या दक्षिणेकडील फ्लोरिडा राज्यात धुमाकूळ घातला आहे. या चक्रीवादळाने अवघ्या काही दिवसांमध्ये अजस्र रूप धारण केले आणि फ्लोरिडाच्या किनारी उपनगरांना झोडायला सुरुवात केली. सुरुवातीच्या दोन दिवसांतच या वादळाने १६ जणांचा बळी घेतला. ही संख्या अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशाचा विचार केल्यास जास्त आहे. नुकतेच अमेरिकेच्या आणखी काही दाक्षिणात्य राज्यांना ‘हेलीन’ चक्रीवादळाने झोडपले होते. अमेरिकेत यंदा अशा वादळांचा हंगाम सुरू झाला असला, तरी त्यांची तीव्रता आणि संख्या नेहमीपेक्षा अधिक असेल, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. वादळांचा मुद्दा निवडणूक प्रचारातही उपस्थित होऊ लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘मिल्टन’ किती विध्वसंक?

मेक्सिकोच्या आखातात निर्माण झालेले ‘मिल्टन’ चक्रीवादळ तीन क्रमांकाच्या तीव्रतेचे (कॅटॅगरी-थ्री) म्हणून नोंदवले गेले. ही तीव्रता संहारक असते. ताशी १८० किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने वारे वाहात होते. ‘मिल्टन’मुळे फ्लोरिडाच्या टेम्पे शहरातील अनेक उपनगरांमध्ये जवळपास २३ लाख नागरिकांचा वीजपुरवठा खंडित झाला. मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये सहा ते आठ फुटांपर्यंत पाणी साचले. हजारो मोटारी पाण्याखाली गेल्या. शेकडो झाडे भुईसपाट झाली. पण या वादळाची पूर्वकल्पना मिळाल्यामुळे फ्लोरिडा तसेच अमेरिकेच्या फेडरल सरकारने जय्यत तयारी केली आणि संभाव्य आपत्तीग्रस्त टापूतील हाजोरा नागरिकांना सुरक्षित स्थळी रवाना केले. फ्लोरिडा राज्याला नेहमीच वादळाचे तडाखे बसतात, त्यामुळे येथील इमारतींच्या बांधकामांच्या बाबतीत दक्षता घेणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यामुळे वादळ विध्वंसक असूनही मोठी मनुष्यहानी झाली नाही.

हेही वाचा : Internet Archive Hacked : सायबर हल्ल्यात लाखो पासवर्ड आणि ईमेलची चोरी; नेमके प्रकरण काय?

‘मिल्टन’च्या आधी ‘हेलीन’…

‘मिल्टन’ वादळाच्या दोन आठवडे आधी ‘हरिकेन हेलीन’ने फ्लोरिडा, व्हर्जिनिया, नॉर्थ कॅरोलिना, साउथ कॅरोलिना, टेनेसी, जॉर्जिया अशा अनेक राज्यांना तडाखा दिला. यात जवळपास २२५ जणांना प्राण गमवावे लागले. प्रत्येक राज्याची वादळासी सामना करण्याची तयारी वेगवेगळी होती. त्यामुळे मनुष्यहानी अधिक झाली. तसेच ‘हेलीन’ अधिक व्यापक भूभागावर फिरत होते. ‘हेलीन’ हे कॅटॅगरी-फोर म्हणजे ‘मिल्टन’पेक्षाही अधिक विध्वंसक चक्रीवादळ होते. ताशी २२० किलोमीटरने या वादळादरम्यान वारे वाहिले. अमेरिकेप्रमाणेच या वादळाने होंडुरास, मेक्सिको, कॅरेबियन टापूतील काही देशांना तडाखा दिला. ‘हरिकेन मरिना’ (२०१७), ‘हरिकेन कॅटरिना’ (२००५) यांच्यानंतरचे सर्वादिक विध्वंसक चक्रीवादळ असा लौकीक ‘हेलीन’ने मिळवला.

हरिकेन म्हणजे नेमके काय?

हरिकेन म्हणजे चक्रीवादळ. अटलांटिक महासागर आणि प्रशांत महासागरात अमेरिकेच्या किनाऱ्यांवर उठणाऱ्या चक्रीवादळांना सहसा हरिकेन असे संबोधले जाते. आशिया आणि आफ्रिकेच्या किनारी प्रदेशात हिंद महासागरात उठतात ती चक्रीवादळे म्हणजे ‘सायक्लॉन’ आणि पूर्व आशियात जपानच्या किनाऱ्याकडील प्रशांत महासागरात उठतात ती चक्रीवादळे म्हणजे ‘टायफून’ असे सर्वसाधारण संबोधले जाते. सागरांमध्ये सहसा विषुववृत्तीय भागात उष्ण हवामानामुळे सागरी पृष्ठभागावरील हवा वर उठते आणि हरिकेनची निर्मिती होते. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या क्रियेचा परिणाम होऊन ही वादळे चक्राकार दिशा घेतात. म्हणून त्यांना चक्रीवादळ म्हटले जाते. या प्रक्रियेत वारे विषुववृत्तापासून दूर जाऊ लागतात. चक्रीवादळ निर्माण होण्यासाठी सागरात कमी दाबाचा पट्टा, या टापूवर जलधारक ढगांची निर्मिती अशा आणखीही काही बाबी घडून याव्या लागतात. सागराच्या पृष्ठभागाचे तापमान २७ डिग्री सेल्शियसच्या वर असेल, तर अशी स्थिती चक्रीवादळासाठी पोषक मानली जाते.

हेही वाचा : रखरखीत सहारा वाळवंटात ऐन उन्हाळ्यात मुसळधार पाऊस कसा पडला? अवकाळी पाऊस वरदान ठरणार?

वातावरण बदलामुळे चक्रीवादळे वाढणार?

अमेरिकेत साधारण १ जूनपासून चक्रीवादळांचा हंगाम सुरू होतो. दरवर्षी नॅशनल ओश्यनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन ही सरकारी संस्था यंदा किती चक्रीवादळे येऊ शकतील, याविषयी अंदाज व्यक्त करते. यंदा १७ ते २५ चक्रीवादळे निर्माण होतील आणि त्यांतील चार ते सात अतिविध्वंसक असतील, असा अंदाज या संस्थेने व्यक्त केला आहे. १९९१ ते २०२० या काळात चक्रीवादळांची संख्या १४च्या आसपास होती आणि त्यातही प्रत्येकदा तीन मोठी चक्रीवादळे ठरली. यावरून वादळांची वारंवारिता यंदा वाढल्याचे सहज लक्षात येईल. या वाढीव संख्येमागे मुख्य कारण, अटलांटिक महासागराचे वाढलेले तापमान हे आहे. यामुळे अधिक उष्ण वाऱ्यांची निर्मिती होऊन चक्रीवादळांच्या संख्येतही वाढ संभवते. याला प्रमुख कारण वातावरण बदल किंवा तापमानवाढ हेच आहे.

अल्पावधीत अतिविध्वंसक…

अमेरिकनांच्या दृष्टीने डोकेदुखी वाढवणारी बाब म्हणजे, भाकीत वर्तवल्यानंतर आणि रडारवर दिसल्यानंतर अवघ्या दोन ते तीन दिवसांत चक्रीवादळांची व्याप्ती आणि वेग वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे किनारी प्रदेशांना सुरक्षिततेसाठी तयारी करण्याची फारशी उसंतच मिळेनाशी झाली आहे. अनेक प्रदेशांमध्ये वादळतडाख्याबद्दल विमा संरक्षण उपलब्ध नाही. त्यामुळे आर्थिक नुकसानही अतोनात होत आहे. प्रचंड वेगामुळे निव्वळ किनारी प्रदेशांत नव्हे, तर सुदूर आतील भूभागांनाही वादळाचा तडाखा बसू लागला आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In america more cyclones to hit after florida s hurricane milton cyclone print exp css