दि. १२ जून, २०२३ रोजी नेचर जिओसायन्स जर्नलमध्ये पृथ्वीवरील दिवस १९ तासांचा होता, असे सांगणारे संशोधन प्रसिद्ध झाले. हे संशोधनपर लेखन आपल्याला आश्चर्यचकित करते. याच अनुषंगाने जिओसायन्स जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेले संशोधन जाणून घेऊ. पृथ्वीवर खरंच १९ तासांचा दिवस, सहा महिन्यांचा दिवस, सहा महिन्यांची रात्र होती का, हे जाणून घेणे रंजक ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पृथ्वीवर १९ तासांचा दिवस कधी होता ?

नेचर जिओसायन्स जर्नलने प्रसिद्ध केलेल्या संशोधनानुसार, सुमारे २.५ ते ३ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवरील दिवसाचा कालावधी १९ तास एवढा होता. पृथ्वीवरील शेवटचा १९ तासांचा दिवस ५४३ अब्ज वर्षांपूर्वी संपला, असे या संशोधनामध्ये म्हटले आहे. दिवसाचा कालावधी कमी असण्याचे एक कारण म्हणजे चंद्र. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह तेव्हा पृथ्वीच्या अधिक जवळ होता. चंद्र उपग्रहाच्या प्रभावाची गती समुद्राच्या भरतीला कारण ठरते. चंद्राच्या गतीमुळे महासागरात भरती येण्याचा वेग हा २.५ अब्ज वर्षांपूर्वी कमी होता. दरम्यान, सौरतापमान हे अत्याधिक असल्याने ‘थर्मल टाइड’चे प्रमाणही जास्त होते. ‘थर्मल टाइड’ म्हणजे अतिउष्णतेमुळे तापमानाची होणारी वाढ. ही वाढ प्रामुख्याने समुद्रीय भागात होते. शास्त्रज्ञांच्या मते, या अतिउष्णतेमुळे पृथ्वीचे परिभ्रमण वाढते. तसेच २.५ अब्ज वर्षांपूर्वी सौरतापमान वाढीमुळे होणारी स्थित्यंतरे अधिक परिणामकारक होती. त्यामुळे त्या काळात पृथ्वी नेहमीच्या तुलनेत अधिक वेगाने फिरत होती. तसेच याच संशोधनात असे नमूद केले आहे की, चंद्राचा पृथ्वीवर प्रभाव होताच. परंतु, त्याच वेळी सूर्याचाही पृथ्वीवर प्रभाव पडत होता. या दोन्ही परिणामांमुळे पृथ्वीचे परिभ्रमण १९ तासांवर स्थिरावले होते.

प्राचीन काळातील दिवसांचा कालावधी कसा मोजला जातो ?

गेल्या काही दशकांपासून संशोधक समुद्रातील दगडांचा अभ्यास करीत आहेत. समुद्रातील गाळात रुतलेल्या या दगडांवर अतिशय सूक्ष्म थर आहेत. हे थर वर्षानुवर्षे आलेल्या समुद्राच्या भरती-ओहोटीच्या लाटा चिन्हांकित करतात. या सूक्ष्म थरांमध्ये नदीतील गाळ, किनाऱ्यावरील वाळू यांचे अवशेष आहेत. दर महिन्याला भरती-ओहोटीच्या चढउतारांमुळे तयार होणाऱ्या गाळाच्या थरांची संख्या प्राचीन काळातील तासांच्या संख्येइतकी असते, असे या संशोधनात म्हटले आहे. या गाळाच्या खडकातील नोंदी वापरून शास्त्रज्ञांनी प्राचीन काळातील दिवसांची लांबी मोजली आहे.

हेही वाचा : स्त्रियांची भाषा म्हणजे काय ? ‘स्त्री’चे भाषिक योगदान

‘सायक्लोस्ट्रॅटिग्राफी’ आणि ‘मिलानकोव्हिच सायकल’ म्हणजे काय?

प्राचीन काळातील भरतीच्या नोंदी क्वचितच आढळतात. तसेच जतन केलेल्या नोंदी विवादास्पद असू शकतात. शास्त्रज्ञ ‘सायक्लोस्ट्रॅटिग्राफी’ पद्धतीला प्राधान्य देतात. ‘सायक्लोस्ट्रॅटिग्राफी’ ही एक भौगोलिक पद्धत आहे. ‘सॅण्डीमेन्ट्री लेयर्ड रॉक’ यांचा यामध्ये अभ्यास केला जातो. या खडकांचा अभ्यास करताना ‘मिलानकोव्हिच सायकल’ पद्धतीचाही अभ्यास केला जातो. ‘मिलानकोव्हिच सायकल’ पृथ्वीचे परिभ्रमण आणि कक्षेतील बदल हवामानावर कसा परिणाम करतात, याचा अभ्यास करते. सूर्याच्या सापेक्ष पृथ्वीच्या स्थितीतील बदलांचे दीर्घकालीन, सामूहिक परिणाम हे पृथ्वीच्या हवामानावर दीर्घकालीन परिणाम करतात. ‘नासा’ने केलेल्या व्याख्येनुसार पृथ्वीच्या या चक्रीय परिभ्रमण हालचालींना ‘मिलानकोव्हिच सायकल’असे म्हणतात. ‘मिलानकोव्हिच सायकल’मुळे पृथ्वीच्या मध्य-अक्षांशांवर येणाऱ्या पृथक्करणाच्या प्रमाणात २५ टक्क्यांपर्यंत फरक दिसून येतो.

संशोधनाचा निष्कर्ष

पृथ्वीला परिभ्रमण करण्यास २४ तास लागतात. परंतु, जिओसायन्स जर्नलने २.५ अब्ज वर्षांपूर्वी १९ तासांचा दिवस होता, असे संशोधन मांडले. पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील गुरुत्वाकर्षण शक्ती आणि सूर्याची शक्ती यांचा प्रभाव पडल्यामुळे पृथ्वीची परिभ्रमण गती बदलली. चंद्राची शक्ती समुद्राला येणारी भरती-ओहोटी निश्चित करते. तसेच वातावरणात सौरभरती असते. म्हणजेच सूर्यामुळे वाढणाऱ्या तापमानाने होणारे वातावरणातील बदल होय. यालाच ‘थर्मल टाइड’ असे म्हणतात. चंद्राची शक्ती आणि सूर्याची शक्ती या दोहोंची एकमेकांच्या विरुद्ध आहे. शास्त्रज्ञ मिशेल यांच्या मते, चंद्रामुळे येणारी भरती-ओहोटी पृथ्वीचा परिभ्रमण वेग कमी करते. तर सूर्याची शक्ती तो वेग वाढवते. २.५ अब्ज वर्षांपूर्वी चंद्रापेक्षा सौरभरती अधिक तीव्र असण्याची शक्यता आहे. यामुळे पृथ्वीचा परिभ्रमण वेग जास्त असू शकतो. यासाठी शास्त्रज्ञांनी समुद्रातील गाळाच्या दगडांचा अभ्यास केला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ancient times there was a day of 19 hours on earth what the new research says vvk
Show comments