भारतीय क्रिकेट संघाने बॉर्डर-गावस्कर करंडकावरील आपली पकड गमावली. ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकताना तब्बल दहा वर्षांनी हा प्रतिष्ठेचा करंडक उंचावला. २०१५ नंतर प्रथमच भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध अपयशाचा सामना करावा लागला. या मालिकेत भारतीय संघ व्यवस्थापनाचे अनेक निर्णय चुकीचे ठरले. याचा भारताला मोठा फटका बसला. जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेतील भारताचे आव्हानही संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील अपयशामागे सहा कोणती कारणे होती, याचा आढावा.
विराट, रोहितकडून निराशा
या अत्यंत खडतर कसोटी मालिकेत भारताचे सर्वांत अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा हे लयीत नसल्याचा फटका भारतीय संघाला बसला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी त्यांच्या फलंदाजीतील उणिवा उघड्या पाडल्या. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मालिकेत पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला होता. त्या मालिकेतही रोहितची बॅट शांतच राहिली. बॉर्डर-गावस्कर करंडकातही रोहितने निराशा केली. त्याला पाच डावांत मिळून केवळ ३१ धावाच करता आल्या. या कामगिरीमुळे अखेरच्या कसोटीसाठी रोहितने स्वत:हून संघाबाहेर राहणे पसंत केले. पहिल्या कसोटीसाठी रोहित उपलब्ध नव्हता. यानंतर तो मध्यक्रमात फलंदाजीस आला. तिथे त्याला धावा करण्यात अपयश आले. मेलबर्न कसोटीसाठी तो पुन्हा सलामीला परतला, पण निराशा कायम राहिली. त्याच्यापेक्षा अधिक धावा जसप्रीत बुमरा आणि आकाश दीप यांनी काढल्या. विराटने या मालिकेत १९० धावा केल्या. यामध्ये पर्थ कसोटीतील शतक वगळता त्याला अजिबात छाप पाडता आली नाही. नेहमीप्रमाणे ‘ऑफ स्टम्प’बाहेरील चेंडू खेळताना वारंवार तो बाद होताना दिसला. अखेरच्या सामन्यापर्यंतही त्याच्या खेळात सुधारणा पाहायला मिळाली नाही.
हे ही वाचा… उच्च शिक्षण आयोगाचे काय झाले? स्थापनेस विलंब का?
रोहित नेतृत्वातही कमी पडला
पहिल्या कसोटीत रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराने नेतृत्व केले आणि भारताने या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी करत विजय साकारला. मात्र, पुढील सामन्यापासून रोहितने कर्णधारपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर हाच संघ ऑस्ट्रेलियाच्या एक पाऊल मागे पाहायला मिळाला. भारताला रोहितच्या बचावात्मक दृष्टिकोनाचा फटका बसला. मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाला झटपट गुंडाळून सामन्यात पुनरागमन करण्याची भारताकडे संधी होती. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांना रोखण्यात भारताला अपयश आले. ब्रिस्बेनमध्येही ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथला रोखण्यासाठी योग्य रणनीती आखण्यात रोहित कमी पडला.
फलंदाजांचे अपयश
पर्थ येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज लयीत दिसले. तरी उर्वरित सामन्यांमध्ये त्यांना फारशी चमक दाखवता आली नाही. या मालिकेच्या नऊ डावांत भारताला केवळ एकदाच ३०० धावांचा टप्पा पार करता आला. ऑस्ट्रेलियाने तीनदा ३०० धावांची मजल मारली. भारताकडून यशस्वी जैस्वाल (३९१ धावा) आणि आपली पहिली कसोटी मालिका खेळणारा नितीश कुमार रेड्डी (२९८ धावा) यांनी सर्वाधिक धावा केल्या. मात्र, अन्य फलंदाजांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव होता. ॲडलेड आणि मेलबर्न कसोटीत भारताचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. ब्रिस्बेन कसोटीत पावसाचा व्यत्यय आला नसता, तर भारतीय संघ पराभवाच्या छायेत होता. त्यातच अनेकदा फलंदाजांच्या क्रमात केलेल्या बदलाचा फटकाही भारताला बसला. एका सामन्यात रोहित सलामीला आला, तर दोन सामन्यांत रोहित आणि शुभमन गिलला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले नाही.
संघनिवडीत चुका
भारतीय संघ पहिल्या कसोटीत तीन वेगवान गोलंदाज आणि दोन अष्टपैलू खेळाडूंसह मैदानात उतरला. याचा भारताला फायदा झाला. भारताने ऑस्ट्रेलियाला २९५ धावांनी पराभूत करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. परंतु मालिका जशी पुढे गेली, तसे भारताच्या संघ संयोजनात बदल पाहायला मिळाला. त्यामध्ये अनेक बदल करण्यात आले. विशेषत: ॲडलेड येथे ‘दिवस-रात्र’ झालेल्या दुसऱ्या कसोटीत स्विंग गोलंदाजी करणाऱ्या आकाश दीपपेक्षा हर्षित राणाला पसंती देण्याचा निर्णय आश्चर्यकारक ठरला. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल ही सलामीची जोडी जमलेली असताना चौथ्या कसोटीसाठी अचानक रोहित सलामीला आला. त्यामुळे राहुलची लय बिघडली. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने संघात फार बदल करणे टाळले. त्यांनी सलामीला सॅम कोन्सटासला आणून भारतीय गोलंदाजीवर दबाव निर्माण केला. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडला मालिकेदरम्यान जायबंदी झाला. त्याची जागा स्कॉट बोलँडने घेतली आणि दमदार कामगिरी केली. भारतीय संघ व्यवस्थापनाच्या निर्णयांना मात्र असे यश मिळाले नाही.
हे ही वाचा… मराठा विरुद्ध वंजारी… भाजप असो वा राष्ट्रवादी, बीडचे राजकारण जातींभोवती!
बुमराला अपुरे सहकार्य
भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने या मालिकेतील आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. तो ऑस्ट्रेलियन भूमीवर भारताचा आजवरचा सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने पाच कसोटी सामन्यांत सर्वाधिक ३२ बळी मिळवले. यामध्ये त्याने तीन वेळा डावात पाच बळी मिळवले. त्याची मालिकेतील सरासरी १३.०६ अशी राहिली. मात्र, बुमराला भारताच्या इतर गोलंदाजांकडून पुरेशी साथ मिळाली नाही. मोहम्मद सिराजने पाच सामन्यांत ३१.१५च्या सरासरीने २० गडी बाद केले. आकाश दीप (५ बळी), हर्षित राणा (४ बळी) आणि नितीश कुमार रेड्डी (५ बळी) यांना आपल्या पहिल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फारशी चमक दाखवता आली नाही. प्रसिध कृष्णाला अखेरच्या सामन्यात संधी देण्यात आली. त्याने दोन डावांत मिळून सहा बळी मिळवले. मात्र, तो भारताचा पराभव टाळू शकला नाही. त्यातच संघात फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू राहावा याकरता कधी वॉशिंग्टन सुंदर, कधी रविचंद्रन अश्विन, तर कधी रवींद्र जडेजा यांना संघात स्थान देण्यात आले. मात्र, ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही.
गंभीरची अतिप्रयोगशील वृत्ती
राहुल द्रविडनंतर गौतम गंभीरकडून प्रशिक्षक म्हणून खूप अपेक्षा होत्या. मात्र, अजून तरी त्याच्या मार्गदर्शनाखाली भारताला चमक दाखवता आलेली नाही. भारताला केवळ बांगलादेशविरुद्ध घरच्या कसोटी मालिकेत विजय मिळवता आला. यानंतर न्यूझीलंड आणि आता ऑस्ट्रेलियाकडून भारताला पराभूत व्हावे लागले. चांगल्या स्थितीत असतानाही भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यासाठी पात्रता मिळवता आली नाही. गंभीरने प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळल्यानंतर ‘बीसीसीआय’कडून त्याला स्वातंत्र्य देण्यात आले. मात्र, आता संघाच्या कामगिरीमुळे त्याच्यावरही टीका होत आहे. त्याचे अनेक प्रयोग संघाच्या पथ्यावर पडले नाहीत. त्यामुळे भारतीय संघात अस्थिरता निर्माण झाली आहे. पुढच्या ‘डब्ल्यूटीसी’ पर्वाला जूनमध्ये इंग्लंडच्या दौऱ्याने सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी भारताने आपल्या सर्व उणिवा दूर करण्यावर भर देणे गरजेचे आहे.