समुद्राची वाढती पातळी, किनारपट्टीची धूप आणि हवामानातील बदल यामुळे निसर्गाचे संरक्षण करणे कठीण झाले आहे. अनेकदा समुद्राच्या पाण्यात भराव टाकून सागरी हद्दच बदलली जाते. पण यामुळे जगभर अतिवृष्टीदरम्यान पाण्याचा निचरा न झाल्याने शहरांना, गावांना पुराचे तडाखे बसले आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी दहा वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये एक प्रयोग राबवण्यात आला. यात समुद्राला जमीन परत देण्यात आली. म्हणजेच समुद्राच्या आजूबाजूला जी शेती किंवा गवती कुरणे आहेत ती मोकळी करण्यात आली. त्यासाठी जमीन मालकाला मोबदला देण्यात आला. या प्रयोगाचे सकारात्मक परिणाम समोर आले. त्याठिकाणी तयार झालेल्या दलदलीमुळे मोठ्या प्रमाणात पुरावर नियंत्रण मिळवता आले.
२०१४ मध्ये कोणता प्रयोग करण्यात आला?
२०१४ मध्ये इंग्लंडच्या नैर्ऋत्येला सॉमरसेट येथील स्टीअर्ट द्वीपकल्पात भरतीच्या पाण्याला वाट मोकळी करून देण्यात आली. समुद्राचा सांडवा रोखण्याऐवजी त्याला जमीन ‘बहाल’ करण्यात आली. जितकी जमीन पुरात जात आहे ती जाऊ देण्यात आली. या प्रकल्पावर देखरेख करणाऱ्या संवर्धक ॲलिस लेव्हर यांच्यामते ‘दलदलीची निर्मिती’ हा एक मोठा वैज्ञानिक प्रयोग होता. तब्बल २० दशलक्ष पौंड खर्चाचा हा प्रकल्प होता. ‘वाइल्डफाऊल अँड वेटलँड ट्रस्ट’ व ‘एन्व्हायर्नमेंट एजन्सी’ यांचा तो संयुक्त प्रकल्प होता. स्थानिक समुदायाशी चर्चा करून तो विकसित करण्यात आला होता. या प्रयोगात स्थानिक लोकांचा विश्वास जिंकणे महत्त्वाचे होते.
हेही वाचा : National Ayurveda Day 2024:धन्वंतरी कोण आहेत? आयुर्वेद दिवस आणि धनत्रयोदशी यांचा नेमका संबंध काय?
लोकांना या प्रयोगासाठी कसे तयार केले?
‘वाइल्डफाऊल आणि वेटलँड ट्रस्ट’ ही इंग्लंडची जमीन आणि किनारपट्टी संरक्षित करण्यासाठी एक जबाबदार सरकारी संस्था आहे. संस्थेच्या ॲलिस लेव्हर यांनी या प्रयोगाला आकार दिला होता. शेतजमिनींना मिठाच्या दलदलीत बदलण्याची कल्पना होती. ही एक प्राचीन परिसंस्था आहे जी समुद्राची भरती आल्यावर पाणी शोषून घेते आणि ओहोटीच्या वेळी ते सोडते. त्यासाठी समुद्राजवळ असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर अक्षरशः पाणी सोडावे लागणार होते. मात्र हे सहज शक्य नव्हते. त्यासाठी शेतकऱ्यांना प्रति एकरप्रमाणे पैसे देण्यात आले. प्रत्येक शेतकरी यासाठी तयार झाला असे नव्हे. मात्र, पाण्यापासून पारंपरिक संरक्षण मजबूत व्हावे असेच अनेकांना वाटत होते आणि शेवटी आपली जमीन देण्यासाठी ते तयार झाले.
प्रयोगाचे सकारात्मक परिणाम कोणते?
‘वाइल्डफाऊल आणि वेटलँड ट्रस्ट’ या संस्थेच्या या प्रयोगाकडे सुरुवातीला नकारात्मक दृष्टीने पाहण्यात आले. काहींनी हा प्रयोग हास्यास्पद आहे म्हणून निंदादेखील केली. मात्र, त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. ज्या द्वीपकल्पाच्या परिसरात या प्रयोगाची सुरुवात करण्यात आली, त्या परिसरातील गावांमध्ये पूर आला नाही. एवढेच नाही तर दलदलीतून जाणारे मार्गही रहदारीयोग्य राहिले. आता त्याठिकाणी जुन्या पुराच्या भिंतीपेक्षा लक्षणीय उंच आणि गवताने झाकलेला तट आहे. संरक्षक आणि स्थानिक लोक यांच्यातील युतीमुळे प्रकल्पावरील सुरुवातीच्या आक्षेपांवर मात करण्यात मदत झाली आहे. संवर्धक ॲलिस लेव्हर या संपूर्ण प्रकल्पाची धुरा सांभाळत आहेत.
हेही वाचा : इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या ‘पॅलेस्टाइन निर्वासित संस्थे’वर बंदी का घातली?
निसर्गाचे देणे निसर्गाकडे?
माणसांनी अतिक्रमित केलेली निसर्गाची जागा त्याला परत दिली तरच शाश्वत विकास साधता येईल. कारण निसर्गावर केलेल्या अतिक्रमणाचे मूल्य तपासले आणि ते मोजले तर होणारी हानी अतिशय जास्त आहे. पार्थ दासगुप्ता आणि पवन सुखदेव या दोन्ही तज्ज्ञांचे हेच मत आहे. अर्थशास्त्रात जोपर्यंत निसर्गाचा विचार केला जाणार नाही, तोपर्यंत पर्यावरणाचे मूल्य कळणार नाही. निसर्गाचे रक्षण करण्यासाठी विचार करण्याची, कार्य करण्याची आणि आर्थिक यश मोजण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. शाश्वत आर्थिक विकास म्हणजे निसर्गाच्या वस्तू आणि सेवांची मागणी आणि त्यांचा पुरवठा करण्याची क्षमता यांच्यात संतुलन निर्माण करणे आहे.
हेही वाचा : हायबॉक्स गुंतवणूक घोटाळ्यात भारती सिंगसह एल्विश यादवचे नाव; काय आहे हा १००० कोटी रुपयांचा घोटाळा?
जगभर कोणत्या पद्धती?
युरोपातील इतर काही देश, अमेरिका, इंग्लंड यांसारख्या भागांमध्ये निसर्गाशी एकरूप होण्यासाठी मोहीम सुरू झाली आहे. युरोपमध्ये अनेक ठिकाणी उड्डाणपूल पाडले जात आहेत. कारण या उड्डाणपुलांपेक्षा रस्ते चांगले आणि मोठे असणे जास्त आवश्यक आहे, असे तिथल्या सरकारचे म्हणणे आहे. अमेरिकेत धरणे पाडण्यास सुरुवात झाली आहे. कारण धरणाच्या माध्यमातून पाणी अडवून आपण निसर्गाचे नुकसानच करत असल्याची भावना त्याठिकाणी आहे. तर इंग्लंडमध्येही कोळसा खाणी बंद करून जंगले विकसित केली जात आहेत.
rakhi.chavhan@expressindia.com