देशातील महानगरांमध्ये घरांच्या आकारात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. करोना संकटापासून ग्राहकांची मोठ्या घरांना असलेली मागणी कायम आहे. ग्राहकांकडून मागणी असल्याने विकासकांकडून मोठ्या घरांचे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात मोठ्या घरांचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये कायम वाढत आहे. देशातील महानगरांमध्ये घरांचा आकार वाढत असताना याला एखादे महानगर अपवादही आहे. काही ठिकाणी घरांचा सरासरी आकार कमी होत आहे. देशात घरांचा सरासरी आकार गेल्या सहा वर्षांत ३४ टक्क्यांनी वाढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकी स्थिती काय?

देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल अनारॉक ग्रुपने जाहीर केला आहे. त्यानुसार, देशातील प्रमुख सात महानगरांत घरांचा सरासरी आकार २०१९ मध्ये १ हजार १४५ चौरस फूट होता. नंतर वाढत जाऊन हा आकार २०२३ मध्ये १ हजार ४२० चौरस फूट झाला. तो गेल्या वर्षी (२०२४) वाढून १ हजार ५४० चौरस फुटांवर पोहोचला. देशात गेल्या वर्षी घरांच्या आकारात ८ टक्के वार्षिक वाढ नोंदविण्यात आली आहे. ग्राहकांकडून मोठ्या घरांना मागणी वाढत आहे आणि त्यानुसार विकासक पुरवठा करीत आहेत. त्यामुळे घरांच्या किमतीतही वाढ होत आहे.

सर्वांत मोठी घरे कुठे?

दिल्लीत घरांचा सरासरी आकार सर्वाधिक मोठा आहे. याचबरोबर घरांच्या आकारात २९ टक्के वार्षिक वाढही दिल्लीत नोंदविण्यात आली आहे. दिल्लीत २०२३ मध्ये घरांचा आकार १ हजार ८९० चौरस फूट होता. तो २०२४ मध्ये २ हजार ४३५ चौरस फुटांवर पोहोचला. दिल्लीत आलिशान घरांना मागणी वाढली आहे. त्यामुळे नवीन पुरवठ्यात १.५ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या घरांचे प्रमाणही वाढले आहे. दिल्लीत २०२३ मध्ये एकूण घरांच्या पुरवठ्यात आलिशान घरांचे प्रमाण ४० टक्के होते. हे प्रमाण २०२४ मध्ये वाढून ७० टक्क्यांवर पोहोचले. दिल्लीत नवीन पुरवठ्यात परवडणाऱ्या घरांचे प्रमाण २०२३ मध्ये २४ टक्के होते आणि ते २०२४ मध्ये कमी होऊन केवळ ११ टक्क्यांवर आले.

सर्वांत छोटी घरे कुठे?

देशात मुंबई महानगरामध्ये घरांचा सरासरी आकार कमी आहे. मुंबईत जागेची टंचाई असल्याने गेल्या ६ वर्षांत घरांच्या आकारात सर्वांत कमी वाढ नोंदविण्यात आली आहे. येथे २०१९ मध्ये घरांचा आकार ७८४ चौरस फूट होता. तो २०२४ मध्ये ८४९ चौरस फूट झाला आहे. मुंबईत ६ वर्षांचा घरांचा आकार केवळ ८ टक्क्यांनी वाढला आहे. मुंबईतील घरांचा आकार २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये ७ टक्क्यांनी वाढला आहे.

अपवाद कोणते महानगर?

देशातील घरांचा आकार कमी होत असलेले हैदराबाद हे एकमेव महानगर ठरले आहे. हैदराबादमध्ये गेल्या ६ वर्षांत घरांचा आकार २४ टक्क्यांनी वाढला आहे. मात्र, २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये घरांचा आकार ९ टक्क्यांनी कमी झाला आहे. हैदराबादमध्ये घरांचा सरासरी आकार २०१९ मध्ये १ हजार ७०० चौरस फूट होता. तो २०२४ मध्ये वाढून २ हजार १०३ चौरस फुटांवर पोहोचला. मात्र, हा २०२३ आणि २०२४ मध्ये घरांचा आकार कमी झालेला दिसून आला आहे. त्यामुळे हैदराबादमध्ये घरांचा आकार वाढणे थांबले असून, आता तो कमी होण्याचे चक्र सुरू झाले आहे.

इतर महानगरांमध्ये काय स्थिती?

पुण्यात गेल्या ६ वर्षांत घरांचा आकार ९१० चौरस फुटांवरून १ हजार १३५ चौरस फुटांवर पोहोचला आहे. त्यात गेल्या ६ वर्षांत २५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षी पुण्यात घरांच्या आकारात ४ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. बंगळुरूमध्ये ६ वर्षांत घरांचा आकार १ हजार २८० चौरस फुटांवरून १ हजार ६६० चौरस फुटांवर पोहोचला आहे. घरांच्या आकारात ६ वर्षांत ३० टक्के वाढ झाली असून, गेल्या वर्षी १२ टक्के वाढ झाली आहे. कोलकत्यात ६ वर्षांत घरांचा आकार १ हजार चौरस फुटांवरून १ हजार १४९ चौरस फूट झाला असून, ही १५ टक्के वाढ झालेली आहे. मात्र, गेल्या वर्षी घरांच्या आकारात केवळ २ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. चेन्नईत ६ वर्षांत घरांचा आकार १ हजार १०० चौरस फुटांवरून वाढून १ हजार ४४५ चौरस फुटांवर पोहोचला आहे. गेल्या ६ वर्षांत ३१ टक्के वाढ झाली आहे. चेन्नईत केवळ गेल्या वर्षीचा विचार करता १५ टक्के वार्षिक वाढ दिसून आली आहे.
sanjay.jadhav@expressindia.com