ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजांना झुकते माप मिळत असल्याचे अनेकदा बोलले जाते. क्रिकेटच्या या प्रारूपात सर्वच फलंदाज वैविध्यपूर्ण आणि अवाक करणारे फटके खेळतात. त्यासाठी त्यांच्याकडून चांगल्या बॅटचा वापर करतात. मात्र, आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) फलंदाजांच्या बॅटवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. यासाठी फलंदाज मैदानात आला की प्रथमच पंचांकडून त्याच्या बॅटची तपासणी केली जाते. यामागे नक्की हेतू काय आणि या संदर्भातील नियम काय सांगतो, याचा आढावा.

बॅटची तपासणी करण्याचे कारण काय?

फलंदाजांनी अधिक वजनाची बॅट वापरू नये याकरिता त्याची तपासणी पंचांकडून केली जात आहे. फलंदाजांच्या बॅटच्या आकाराची यापूर्वीही तपासणी केली जात होती, पण ही प्रक्रिया पूर्वी ड्रेसिंग रूमच्या आत राबवली जात होती. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आता फलंदाजांच्या आक्रमक फटकेबाजीच्या युगात अधिक सतर्क राहण्यासाठी सामनाधिकाऱ्यांना आवश्यक पडल्यास मैदानावरही बॅटची तपासणी करण्याची परवानगी दिली आहे. यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये षटकारांची आतषबाजी पाहायला मिळत आहे. पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्सच्या (१५ एप्रिल) सामन्यापूर्वी ५३८ षटकार मारले गेले. निकोलस पूरन याने एकट्याने ३१ षटकारांची आतषबाजी केली आहे.

पंचांची भूमिका काय?

‘आयपीएल’मध्ये १००हून अधिक आणि अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचाची जबाबदारी पार पाडलेल्या ‘बीसीसीआय’च्या माजी पंचांनी या घटनाक्रमावर आश्चर्य व्यक्त केले. ‘‘बॅटचे आकार मोजण्यासाठी पंचांकडे ‘बॅट गेज’ हे उपकरण असते. बॅट ही गेजमधून व्यवस्थित गेल्यास ती योग्य असल्याचे मानले जाते. आम्ही सर्वांनी ड्रेसिंग रूममध्ये डावाची सुरुवात होण्यापूर्वी बॅटची तपासणी केली आहे,’’ असे माजी पंच म्हणाले. ‘‘एखाद्या खेळाडूने तपासणीला वेगळी बॅट आणि खेळण्यासाठी दुसरी बॅट वापरली का, हा प्रश्न आता उपस्थित होतो. तसे असल्यास मैदानावर होणारी तपासणी योग्य आहे. खेळाडूंकडे सहसा चार-पाच बॅट असताना आणि प्रत्येक बॅटचे वजन वेगवेगळे असू शकते. मात्र, त्याची लांबी, जाडी (बॅटचा पुढील भाग), बॅटच्या किनाऱ्याची जाडी किंवा बॅटचा मधील भाग हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आखून दिलेल्या नियामांतर्गत असले पाहिजे,’’ असे माजी पंचांनी सांगितले.

बॅट संदर्भात नियम काय सांगतो?

नियमानुसार, बॅटची रुंदी ४.२५ इंचांहून (१०.७९ सेंटीमीटर) अधिक असता कामा नये. बॅटच्या मध्यभागाची जाडी २.६४ इंचाहून (६.७ सेंटीमीटर) अधिक असू नये. बॅटच्या कडांची रुंदी ही १.५६ इंचाच्या (चार सेंटीमीटर) आतच असली पाहिजे. बॅटची उंची ही हँडलपासून शेवटपर्यंत ३८ इंच (९६.४ सेंटीमीटर) याहून अधिक असू शकत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये राजस्थान रॉयल्सचा शिम्रॉन हेटमायर, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा फिल सॉल्ट आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या यांच्या बॅटची सामन्यादरम्यान तपासणी करण्यात आली. यासाठी पंचांकडून ‘बॅट गेज’चा वापर केला जातो. या तपासणीत सर्व फलंदाजांच्या बॅटचे आकार योग्य असल्याचे समोर आले आहे.

‘आयपीएल’ अध्यक्ष काय म्हणाले?

‘‘निष्पक्षपणे सामना व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘बीसीसीआय‘ आणि ‘आयपीएल’ने नेहमीच या दिशेने पुढाकार घेतला आहेत. सर्व निर्णयांचे पुनरावलोकन करता येईल याची खात्री करण्यासाठी आम्ही अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. खेळभावनाही राखण्याची जबाबदारी आमची आहे,’’ असे ‘आयपीएल’चे अध्यक्ष अरुण धुमल यांनी सांगितले.

यापूर्वी बॅटसंदर्भात घडलेल्या घटना…

सनथ जयसूर्या आणि रिकी पॉन्टिंग हे दोघेही ९०च्या दशकातील आक्रमक फलंदाज. हे फलंदाज आपल्या कारकीर्दीत कुकाबुरा क्रिकेट बॅटने खेळले. पॉन्टिंगने वापरलेल्या कार्बन-ग्रॅफाइट बॅटवरून वाद निर्माण झाला होता आणि त्यात स्प्रिंग असल्याचा दावा केला जात होता, परंतु नंतर समोर काही आले नाही. जयसूर्यानेही कुकाबुरा बॅटचा वापर केला होता. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडनने २०१०च्या ‘आयपीएल’ हंगामात मुंगूस बॅटचा वापर केला होता. सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट बॅटचे वजन हे जवळपास १.४२ किलो ते १.४७ किलो दरम्यान होते. हे वजन सरासरी वापरल्या जाणाऱ्या बॅटपेक्षा अधिक होते. दक्षिण आफ्रिकेचा नामांकित अष्टपैलू लान्स क्लूसनर हा १.५३ किलो वजनाची बॅट वापरायचा. ख्रिस गेलच्या बॅटचे वजनही १.३६ किलो होते. बॅटचे वजन किती असलेल पाहिजे याबाबत स्पष्ट असा नियम नाही.