देशभरात घरांची मागणी आणि पुरवठ्यातील तफावत यंदा जानेवारी ते मार्च तिमाहीत प्रकर्षाने समोर आली आहे. ग्राहकांची नेमकी मागणी कशाला आणि विकासकांकडून पुरवठा कशाचा होतोय, यात विरोधाभासाचे चित्र दिसत आहे. देशातील सात महानगरांत परवडणाऱ्या घरांचा मागणीपेक्षा पुरवठा कमी झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या तिमाहीत विक्री न झालेल्या परवडणाऱ्या घरांच्या साठ्यात १९ टक्के घट झाली आहे. याचवेळी विक्री न झालेल्या आलिशान घरांचा साठा तब्बल २४ टक्क्यांनी वाढला आहे.
नेमकी स्थिती काय?
अनारॉक ग्रुपने देशातील सात महानगरांतील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. यात मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता यांचा समावेश आहे. या अहवालानुसार, विकासकांकडून मध्यम आणि आलिशान प्रकारच्या घरांच्या प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येत आहे. आता या घरांचा पुरवठा जास्त असताना मागणी घटत आहे. याच वेळी परवडणाऱ्या घरांचा पुरवठा कमी असताना मागणी वाढत आहे. मध्यम घरांचाही मागणीपेक्षा पुरवठा कमी होत असल्याचे चित्र आहे.
देशभरात चित्र कसे?
देशातील सात महानगरांत सर्व प्रकारच्या विक्री न झालेल्या घरांचा साठा यंदा पहिल्या तिमाहीत ५ लाख ५९ हजार ८८१ आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ५ लाख ८१ हजार होता. त्यात यंदा ४ टक्के घसरण झाली आहे. यंदा पहिल्या तिमाहीत परवडणाऱ्या घरांचा (किंमत ४० लाख रुपयांपेक्षा कमी) साठा १ लाख १३ हजार, मध्यम गटातील घरांचा (किंमत ४० ते ८० लाख रुपये) साठा १ लाख ५८ हजार आणि आलिशान घरांचा (किंमत १.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त) साठा १ लाख १३ हजार आहे.
परवडणाऱ्या घरांमध्ये घट का?
यंदा पहिल्या तिमाहीत विक्री न झालेल्या परवडणाऱ्या घरांचा साठा १ लाख १३ हजारांवर आला असून, त्यात यंदा १९ टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो १ लाख ४० हजार होता. बंगळुरूमध्ये परवडणाऱ्या घरांच्या साठ्यात सर्वाधिक ५१ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. त्याखालोखाल चेन्नई ४४ टक्के, पुणे २८ टक्के, दिल्ली २२ टक्के, कोलकाता २० टक्के आणि मुंबई ११ टक्के अशी घट आहे. हैदराबादमध्ये मात्र परवडणाऱ्या घरांच्या साठ्यात ९ टक्के वाढ झाली आहे. देशभरात गेल्या काही वर्षांत घरांच्या किमतीत सातत्याने वाढ सुरू आहे. यामुळे घरे परडवणारी ठरत नसल्याने ग्राहक खरेदीचा निर्णय लांबणीवर टाकत आहेत.
आलिशान घरांमध्ये वाढ का?
यंदा पहिल्या तिमाहीत विक्री न झालेल्या आलिशान घरांचा साठा १ लाख १३ हजारांवर पोहोचला असून, त्यात यंदा २४ टक्के वाढ नोंदविण्यात आली. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ९१ हजार १२५ होता. कोलकात्यात आलिशान घरांच्या साठ्यात सर्वाधिक ९६ टक्के वाढ झाली आहे. त्याखालोखाल दिल्ली ७८ टक्के, बंगळुरू ५७ टक्के, मुंबई आणि हैदराबादमध्ये प्रत्येकी ६ टक्के वाढ झालेली आहे. याचवेळी चेन्नई आणि पुण्यात आलिशान घरांच्या साठ्यात अनुक्रमे ४ व ११ टक्के घट झालेली आहे. जागतिक पातळीवरील अनिश्चिततेमुळे खासगी क्षेत्राला फटका बसत आहे. त्यातून आलिशान घरांच्या मागणीत घट होत आहे.
कारणे कोणती?
कोविड संकटानंतर परवडणाऱ्या घरांच्या मागणीत घट होण्यास सुरुवात झाली. यामुळे अशा घरांचा पुरवठा कमी झाला. या घरांच्या साठ्यात आता मोठी घट झाली असताना त्यांना मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. एकूण घरांच्या विक्रीत परवडणाऱ्या घरांचे २०१९ मध्ये ३८ टक्के असलेले प्रमाण कमी होऊन २०२४ मध्ये १८ टक्क्यांवर आले. याचवेळी गेल्या काही वर्षांत आलिशान घरांना मागणी वाढल्याने त्यांचा पुरवठा वाढला. एकूण घरांच्या विक्रीत आलिशान घरांचे २०१९ मध्ये ७ टक्के असलेले प्रमाण वाढून २०२४ मध्ये २६ टक्क्यांवर पोहोचले. सध्या जागतिक पातळीवर आर्थिक अनिश्चिततेचे वारे आहे. यामुळे ग्राहकांकडून आलिशान घरांना मागणी घटली आहे, असे अनारॉक ग्रुपचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी स्पष्ट केले.
sanjay.jadhav@expressindia.com