मेट्रो ३ मार्गिकेतील आरे कारशेडच्या जागेचा आणि आरेतील वृक्षतोडीचा वाद अनेक वर्षे सुरू होता. रात्रीच्या वेळी झाडांवर कुऱ्हाड चालविल्यानंतर मुंबईत जनआक्रोश झाला होता. आरे कारशेड हटविण्यासाठी जनआंदोलनही झाले होते. आता डोंगरी कारशेडचा वादही निर्माण होण्याची शक्यता आहे. मेट्रो ९ मार्गिकेतील डोंगरी कारशेडसाठी १४०६ झाडे कापण्यात येणार असून त्याला पर्यावरणतज्ज्ञ, पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. नेमका हा विषय काय आहे याचा हा आढावा…
मेट्रो मार्गिकेतील कारशेड म्हणजे काय?
मेट्रो प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कारशेड. कारशेडशिवाय कोणतीच मेट्रो मार्गिका पूर्ण होऊ शकत नाही. कारशेड म्हणजे मेट्रो गाड्या उभ्या करण्याचे ठिकाण. मात्र कारशेडचा अर्थ इतकाच मर्यादित नसून मेट्रो प्रकल्पात तो खूपच व्यापक आहे. कारशेडमध्ये मेट्रो गाड्या ठेवण्याबरोबरच गाड्यांची देखभाल, दुरुस्ती केली जाते. एका मोठ्या यंत्रणेच्या माध्यमातून कारशेडचे काम चालते.
हेही वाचा : विश्लेषण : थेट विदेशी गुंतवणुकीचे उच्चांकी शिखर; जगाला भारताचे आकर्षण कशामुळे?
मेट्रो आणि कारशेड वाद समीकरण…
मेट्रो मार्गिकेच्या परिचालनासाठी कारशेड अत्यावश्यक आहे. त्याशिवाय मेट्रो वाहतूक सेवेत दाखल करताच येत नाही. त्यामुळे मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमीचे मेट्रो प्रकल्प राबविताना सर्वात आधी कारशेडची जागा निश्चित करून तिचे काम मेट्रो मार्गिकेच्या कामाच्या बरोबरीने हाती घेणे गरजेचे होते. पण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) कारशेडबाबतचे योग्य नियोजन करण्यात आले नाही. कारशेडच्या जागा निश्चित केल्या, पण जागा ताब्यात येण्याआधीच मेट्रो मार्गिकेच्या कामास सुरुवात करण्यात आली. त्यात मेट्रो ४, ४ अ, ९, ६ आणि मेट्रो ३ मार्गिकेतील कारशेडच्या जागा वादात अडकल्या. मेट्रो ३ च्या कारशेडवरून मोठा वाद निर्माण झाला. आरे जंगलात कारशेड उभारण्यास पर्यावरणप्रेम, स्थानिकांनी जोरदार विरोध करत जनआंदोलन उभे केले. न्यायालयीन लढाई सुरू केली. महाविकास आघाडीच्या काळात या लढाईला यश आले आणि आरे कारशेड रद्द करून ती कांजूरमार्ग येथे हलविण्यात आली. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच त्यांनी कांजुरमार्ग येथून पुन्हा कारशेड आरेमध्ये हलविली. त्यानंतर आरे कारशेडच्या कामाला सुरुवात झाली आणि आज काम पूर्णही झाले आहे. असे असले तरी आरे कारशेडविरोधातील जनआंदोलन हे आतापर्यंतचे मुंबईतील महत्त्वाचे आणि मोठे जनआंदोलन मानले जात आहे. रात्री आरेतील झाडे तोडल्यानंतर झालेला जनआक्रोश मुंबईकर कधीही विसरणार नाहीत. एकीकडे आरे कारशेडचा वाद सुरू असतानाच दुसरीकडे मोघरपाडा, कांजुरमार्ग, राई-मुर्धा-मोर्वा येथील कारशेडलाही विरोध झाला. कांजुरमार्ग कारशेड अद्यापही वादात असून मोघरपाड्याची जमीन एमएमआरडीएला अद्याप मिळालेली नाही. एकूणच कारशेड आणि वाद असे समीकरण सध्या पाहायला मिळत आहे. आता मेट्रो ९ मार्गिकेतील डोंगरी कारशेडवरून वाद वाढण्याची शक्यता आहे.
मेट्रो ९ मार्गिका आहे कशी?
दहिसर – मिरारोड अंतर कमी करून या परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी १०.५ किमी लांबीच्या मेट्रो ९ मार्गिकेचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हाती घेतले आहे. या मार्गिकेचे काम सध्या वेगात सुरू आहे. या १० किमी लांबच्या मार्गिकेत आठ स्थानकांचा समावेश आहे. पण आता मात्र ही मार्गिका उत्तन, डोंगरीपर्यंत ५.५ किमीने विस्तारित करण्यात आली आहे. त्यामुळे आता ही मार्गिका दहिसर – डोंगरी, उत्तन मार्गिका म्हणून ओळखली जाणार असून ही मार्गिका अंदाजे १५ किमी लांबीची असण्याची शक्यता आहे. या मार्गिकेवर आणखी एक वा दोन स्थानकांची भर पडणार आहे.
हेही वाचा : ८६० वर्षे जुने कॅथेड्रल… ५ वर्षे दुरुस्ती… पॅरिसमधील ‘नोत्र दाम’ पुन्हा सुरू होणे का महत्त्वाचे?
मेट्रो ९ मार्गिकेवरील कारशेडवरून पूर्वीही वाद?
एमएमआरडीएने मेट्रो ९ मार्गिकेसाठी राई, मुर्धा, मोर्वा गावात कारशेड प्रस्तावित केली होती. या गावातील ३२ हेक्टर जागेवर कारशेड बांधण्यात येणार होती. कारशेडच्या कामासाठी येथील काही घरांचे विस्थापन करण्यात येणार होते तर शेतजमिनीही मोठ्या प्रमाणावर बाधित होणार होती. त्यामुळे स्थानिकांनी या कारशेडला जोरदार विरोध केला. यासंबंधी मोठ्या संख्येने सूचना-हरकती नोंदविल्या, तर दुसरीकडे आंदोलनही केले. स्थानिकांचा विरोध आणि कारशेडला होणार विलंब लक्षात घेता शेवटी एमएमआरडीएने राज्य सरकारच्या निर्देशानुसार राई, मुर्धा, मोर्वा येथील प्रस्तावित कारशेड रद्द करून ती इतरत्र हलविली आणि कारशेडचा वाद संपुष्टात आला. पण आता मात्र पुन्हा मेट्रो ९ च्या कारशेडचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.
पुन्हा मेट्रो ९ मार्गिकेतील कारशेडचा वाद?
राई, मुर्धा, मोर्वा कारशेडचा वाद संपुष्टात आल्यानंतर आता नवीन जागेत कारशेड मार्गी लागणार असे वाटत होते. परंतु पुन्हा एकदा मेट्रो ९ च्या कारशेडचा वाद निर्माण झाला आहे. एमएमआरडीएने ही कारशेड उत्तन येथील डोंगरी येथे उभारण्याचा निर्णय घेतला. हा डोंगराळ भाग असल्याने येथे भूसंपादनाचा प्रश्न नव्हता. त्यामुळे ही जागा सहज एमएमआरडीएला मिळाली. जागा मिळाल्यानंतर एमएमआरडीएने कारशेडच्या कामाला सुरुवात करण्याची तयारी केली. त्यानुसार कारशेडच्या कामासाठी १४०६ झाडे कापण्यासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिकेला प्रस्ताव पाठविला आहे. या प्रस्तावानुसार महापालिकेने १४०६ झाडांच्या कत्तलीसाठी नागरिकांकडून सूचना-हरकती मागविल्या आहेत. या झाडांच्या कत्तलीला पर्यावरणप्रेमी, पर्यावरणतज्ज्ञांनी विरोध केला असून कोणत्याही परिस्थितीत झाडांची कत्तल होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता डोंगरी कारशेडवरूनही वाद उफाळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : ‘Sapiosexuality’ म्हणजे काय? बुद्धिमत्तेच्या आकर्षणाचं विज्ञान आणि वाद नेमका काय आहे?
डोंगरी कारशेडला विरोध का?
कारशेडसाठी निवडण्यात आलेला डोंगरी परिसर डोंगराळ आणि हिरवळीचा भाग आहे. मिरा-भाईंदर परिसरातील हाच एकमेव मोठा हरित पट्टा मानला जातो. या हरित पट्ट्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जात आहे, असे पर्यावरणप्रेमी, पर्यावरणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. शहरात विकासाच्या नावाखाली मोठ्या संख्येने झाडे कापून पर्यावरणाचा ऱ्हास करण्यात आला आहे. त्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येत आहे, प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना आता हिरवळीचा भाग विकासाच्या नावाखाली नष्ट केला जात असल्याचा आरोप करत मिरा-भाईंदरमधील पर्यावरणप्रेमी, पर्यावरणतज्ज्ञ आणि स्थानिकांनी येथील झाडांच्या कत्तलीस विरोध करण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही परिस्थितीत झाडे कापू दिली जाणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पालिकेकडे अधिकाधिक सूचना-हरकती नोंदविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे डोंगरी कारशेडवरून एमएमआरडीए विरूद्ध स्थानिक, पर्यावरणप्रेमी, पर्यावरणतज्ज्ञ असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत.