देशातील गृहनिर्माण क्षेत्रात गेली दोन वर्षे तेजीचे वारे होते. प्रमुख महानगरांत सातत्याने घरांच्या विक्रीत वाढ होत होती. विक्रीत वाढ होत असल्याने नवीन घरांच्या पुरवठ्यात आणि किमतीतही वाढ होत होती. पण आता मात्र देशभरात घरांच्या विक्रीला घरघर लागल्याचे समोर आले आहे. यंदा जुलै ते सप्टेंबर तिमाहीत देशातील प्रमुख सात महानगरांत १ लाख ७ हजार घरांची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत घरांच्या विक्रीत ११ टक्के घट झाली आहे. यामुळे गृहनिर्माण क्षेत्राच्या वाढीबाबत चिंता व्यक्त होत आहे.
नेमकी स्थिती काय?
मालमत्ता सल्लागार क्षेत्रातील अनारॉक ग्रुपने देशातील प्रमुख सात महानगरांतील घरांच्या विक्रीचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार, यंदा तिसऱ्या तिमाहीत एकूण १ लाख ७ हजार ६० घरांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत ही विक्री १ लाख २० हजार २९० होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा घरांच्या विक्रीत ११ टक्के घट झाली आहे. सर्वच महानगरांत घरांच्या विक्रीत घट नोंदविण्यात आली आहे. याच वेळी नवीन घरांच्या पुरवठ्यातही घट झाली आहे. गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत नवीन घरांच्या पुरवठा १ लाख १६ हजार २२० होता. यंदा तिसऱ्या तिमाहीत तो ९३ हजार ७५० वर घसरला आहे.
मुंबई, पुण्याची आघाडी?
देशात घरांच्या विक्रीत मुंबईचा वाटा सर्वाधिक असून, त्याखालोखाल पुण्याचा क्रमांक आहे. मुंबईत ३६ हजार १९० आणि पुण्यात १९ हजार ५० घरांची विक्री झाली आहे. देशातील एकूण घरांच्या विक्रीत या दोन्ही शहरांचा वाटा तब्बल ५२ टक्के आहे. मुंबईत गेल्या वर्षी याच तिमाहीत घरांची विक्री ३८ हजार ५०५ आणि त्यात आता ६ टक्के घट झालेली आहे. याच वेळी गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत पुण्यात २२ हजार ८८५ घरांची विक्री झाली होती आणि त्यात आता १७ टक्के घट झाली आहे. देशातील इतर महानगरांतही घरांची विक्री घटली आहे. यंदा तिसऱ्या तिमाहीत घरांची विक्री दिल्ली १५ हजार ५७०, बंगळुरू १५ हजार २५, हैदराबाद १२ हजार ७३५, चेन्नई ४ हजार ५१० आणि कोलकता ३ हजार ९८० झाली. घरांच्या विक्रीतील घट दिल्ली २ टक्के, बंगळुरू ८ टक्के, हैदराबाद २२ टक्के, चेन्नई ९ टक्के आणि कोलकता २५ टक्के अशी आहे.
नेमकी कारणे काय?
पावसाळा आणि खरेदीसाठी अशुभ समजला जाणारा काळ या बाबी प्रामुख्याने घरांची विक्री कमी होण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. पितृपक्षामुळे प्रामुख्याने नवीन वस्तूंची खरेदी केली जात नाही. त्यामुळे या कालावधीत घरे आणि वाहने यांची खरेदी कमी झाल्याचे दरवर्षी पाहायला मिळते. यामुळे घरांची विक्री कमी झालेली दिसून येत आहे. घरांची विक्री कमी होण्यास इतरही कारणे आहेत. गेल्या काही वर्षांपासून घरांच्या किमतीत वाढ सुरू असल्याने ग्राहकांकडून खरेदीसाठी आखडता हात घेतला जात आहे.
कोणत्या घरांना मागणी?
नवीन घरांच्या पुरवठ्यात दीड कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या घरांचे प्रमाण ३३ टक्के आहे. त्याखालोखाल ८० लाख ते १.५ कोटी रुपये किमतीच्या घरांचा वाटा ३० टक्के आहे. मध्यम गटातील ४० ते ८० लाख रुपये किमतीच्या घरांचे प्रमाण २३ टक्के आहे. परवडणाऱ्या घरांचे प्रमाण कमी होत असून, ते १३ टक्क्यांवर आले आहे. देशातील सात महानगरांत घरांच्या सरासरी किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत २३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. हैदराबादमध्ये ही वाढ सर्वाधिक ३२ टक्के असून, त्याखालोखाल दिल्लीत ही वाढ २९ टक्के आहे, असे अहवालात म्हटले आहे.
भविष्यातील चित्र कसे?
देशातील गृहनिर्माण क्षेत्राने यंदा पहिल्या तिमाहीत उच्चांक गाठला. त्यानंतर आता गृहनिर्माण बाजारपेठ आता सामान्य पातळीवर स्थिरावू लागली आहे. घरांच्या किमती वाढल्या असून, त्याही आता स्थिरावू लागल्या आहेत. आगामी काळ सणासुदीचा आहे. या काळात भारतीय नवीन खरेदीला प्राधान्य देतात. त्यामुळे अनेक विकासक सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सवलती जाहीर करून ग्राहकांना आकर्षित करतील. यामुळे पुढील काळात घरांच्या विक्रीत वाढ होण्याचा अंदाज आहे. असे असले तरी पुढील काही तिमाहींमध्ये घरांच्या विक्रीतील वाढ गेल्या दोन वर्षांएवढी नसेल. त्यामुळे घरांच्या विक्रीतील वाढीचा वेग पुढील काही काळ फारसा असणार नाही.
sanjay.jadhav@expressindia.com