दररोजचा धकाधकीचा प्रवास, लोकलमध्ये होणारी प्रचंड गर्दी, विलंबाने धावणाऱ्या लोकल, प्रवाशांची वाढती संख्या आणि अपुऱ्या लोकल यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना निरनिराळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गर्दीमुळे त्रस्त प्रवाशांचे डोळे नव्या वेळापत्रकाकडे लागले होते. मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या पदरी निराशा पाडली आहे. रात्रीच्या कसारा, कर्जत लोकल नियमित वेळेच्या ६ ते १२ मिनिटे आधी सुटण्याचे नियोजन वेळापत्रकात केले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणारे कष्टकरी, नोकरदार वर्ग नव्या वेळापत्रकावर प्रचंड नाराज आहेत.

नव्या वेळापत्रकात कोणते बदल झाले?

मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावरून २४ अप आणि डाऊन लोकल फेऱ्या परळपर्यंत विस्तारित करण्यात आल्या आहेत. याशिवाय सीएसएमटी – ठाणे दरम्यान चालविण्यात येणाऱ्या ६ अप आणि डाऊन लोकल फेऱ्या कल्याणपर्यंत विस्तारित करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी येथील गर्दी विभाजित करण्यासाठी २२ अप आणि डाऊन जलद लोकल फेऱ्या दादरपर्यंत चालवण्यात येतील आणि दादरवरूनच डाऊन दिशेला रवाना होतील. दादर येथील नवीन फलाट क्रमांक ११ वरून या लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. तसेच गर्दीच्या वेळी जलद लोकलला कळवा, मुंब्रा येथे थांबा देण्यात आला आहे. कळवा येथे गर्दीच्या वेळी सकाळी ८.५६ वाजता आणि मुंब्रा येथे सकाळी ९.२३ वाजता जलद लोकल थांबणार आहेत. तर, कळवा येथे गर्दीच्या वेळी सायंकाळी ७.२९ वाजता आणि मुंब्रा येथे सायंकाळी ७.४७ वाजता जलद लोकलचे अतिरिक्त थांबे निश्चित करण्यात आले आहेत. सकाळी ६.०३ च्या कुर्ला – कल्याण लोकलचे रूपांतर वातानुकूलित लोकलमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे ही लोकल ५ ऑक्टोबरपासून सकाळी ६.०५ वाजता कुर्ला स्थानकातून सुटेल आणि कल्याण येथे सकाळी ७.०४ वाजता पोहचेल.

हेही वाचा : विश्लेषण: तारांगण संकल्पनेच्या शतकपूर्तीमुळे खगोलीय जिज्ञासा वाढेल?

कसारा, कर्जत लोकल वेळापत्रकात काय बदल?

मध्य रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सुधारित वेळापत्रकानुसार लोकल सेवांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. सीएसएमटी – कसारा लोकल दररोज रात्री १२.१४ वाजता सुटायची. तर, सीएसएमटी – कर्जत लोकल दररोज रात्री १२.२४ वाजता सुटायची. मात्र, ५ ऑक्टोबरपासून सीएसएमटी – कसारा लोकल रात्री १२.०८ वाजता सुटते. तर, सीएसएमटी – कर्जत लोकल रात्री १२.१२ वाजता सोडण्यात येते. या दोन्ही लोकल अनुक्रमे ६ आणि १२ मिनिटे आधीच सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कसारा, कर्जत लोकल पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

शेवटच्या लोकल प्रवाशांसाठी का महत्त्वाच्या?

विविध शैक्षणिक व दळणवळणाच्या सुविधा, बाजारपेठा, शासकीय कार्यालयांसाठी कर्जत तालुका प्रसिद्ध आहे. तसेच मुंबई – पुण्याला जोडणारे कर्जत हे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्यामुळे कर्जतमध्ये नागरी वस्ती वाढत आहे. त्याचबरोबर या मार्गावरील विठ्ठलवाडी, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ येथे मोठी लोकवस्ती असून, वांगणी, नेरळ या भागात लोकवस्ती विस्तारत आहे. तर, कसाऱ्याच्या दिशेकडील शहाड, आंबिवली, टिटवाळ्याला मोठ्या नगरांचे स्वरूप प्राप्त झाले असून वाशिंद, खडवली, आसनगाव आणि कसारा येथेही नागरी वस्ती वाढली आहे. त्या भागातून मुंबईला येणाऱ्या कष्टकरी, श्रमिक, नोकरदार वर्गाची संख्या मोठी आहे. त्यामुळे रात्री परतीचा प्रवास करणाऱ्यांसाठी शेवटची लोकल महत्त्वाची ठरते.

हेही वाचा : जगातील सर्वांत घातक विषाणूमुळे आतापर्यंत १२ लोकांचा मृत्यू; काय आहे मारबर्ग व्हायरस? त्याची लक्षणं काय?

तीन वर्षांत लोकल फेऱ्यांमध्ये वाढच नाही…

मध्य रेल्वेवरून १९९८-९९ मध्ये १,०७७, तर २०१९-२० मध्ये १,७७४ लोकल फेऱ्या धावत होत्या. त्यानंतर ठाणे – दिवा पाचवी – सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर २०२१ – २२ मध्ये ३६ फेऱ्यांची भर पडली आणि एकूण लोकल फेऱ्या १,८१० वर पोहोचल्या. त्यानंतर आतापर्यंत एकही फेरी वाढविण्यात आलेली नाही.

ठाणे-दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेमुळे काय?

ठाणे आणि दिवादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या प्रकल्पाला २००७-२००८ मध्ये मंजुरी मिळाली होती. मात्र, या प्रकल्पाच्या कामाला २०१५ नंतर गती मिळाली. तब्बल १४ वर्षांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये मध्य रेल्वेवरील ठाणे – दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाले. या प्रकल्पात चार मार्गिका उपनगरीय लोकलसाठी आणि दोन मार्गिका मेल, एक्स्प्रेससाठी तयार करण्यात आल्या. त्यामुळे सुमारे ८० लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन होते. मात्र, केवळ ३६ लोकल फेऱ्या वाढण्यात आल्या. परिणामी, मोठ्या अपेक्षेने हा प्रकल्प पूर्ण होण्याची वाट पाहणाऱ्या प्रवाशांचा हिरमोड झाला.

हेही वाचा : विश्लेषण : हरियाणात भाजपने अनपेक्षितरित्या विजयाची हॅटट्रिक कशी साधली?

तरच फायदा होईल…

सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी चार अप आणि डाऊन जलद लोकलला कळवा आणि मुंब्रा स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. मात्र, मुळात डोंबिवली येथे गर्दीच्या वेळी जलद लोकलमध्ये चढणे अवघड होते. मग मुंब्रा – कळवा स्थानकांवर जलद लोकलमध्ये प्रवासी कसे चढू शकतील. याचा सारासार विचारच करण्यात आलेला नाही. त्याऐवजी ठाणे – कल्याण, दिवा – सीएसएमटी लोकल सुरू केल्यास प्रवाशांना फायदा होईल.

सीएसएमटी, भायखळा प्रवाशांचे हाल होणार?

सीएसएमटी स्थानकावरून सुटणाऱ्या २२ जलद अप आणि डाऊन लोकल दादरवरून सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सीएसएमटी, भायखळा येथून डाऊन लोकल पकडणाऱ्या प्रवाशांच्या ११ लोकल कमी झाल्या आहेत. परिणामी, शासकीय, खासगी नोकरदार वर्गाचे हाल होणार आहेत.